शेख हसीनांचा भारत दौरा: बांगलादेश असा बनला दक्षिण आशियाचा नवा 'वाघ'

शेख हसीना Image copyright Getty Images

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या चार दिवसीय भारत दौऱ्यावर आल्या आहेत. निवडणुका जिंकल्यानंतर त्या प्रथमच भारत भेटीवर आल्या आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्तानं बांगलादेशनं गेल्या काही वर्षांत केलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेणारा हा लेख.

पाकिस्तान आकाराने बांगलादेशपेक्षा पाचपट मोठा आहे. मात्र, पाकिस्तानची परकीय गंगाजळी बांगलादेशच्या तुलनेत पाचपट कमी आहे.

पाकिस्तानची परकीय गंगाजळी 8 अब्ज डॉलर आहे. तर बांगलादेशची परकीय गंगाजळी जवळपास 35 अब्ज डॉलर आहे. त्यामुळेच बांगलादेशला दक्षिण आशियाचा नवा 'वाघ' म्हणून संबोधलं जाऊ लागलं आहे.

बांगलादेशचा विकासदर 8 टक्के आहे. तर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरून 5 टक्क्यांवर आला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्थादेखील 5 आणि 6 टक्क्यांदरम्यान हेलकावे खात आहे. बांगलादेशमध्ये प्रती व्यक्ती कर्ज 434 डॉलर आहे. तर पाकिस्तानात प्रति व्यक्ती कर्ज 974 डॉलर आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवर बांगलादेशच्या आयटी मंत्र्यांनी दावा केला आहे, की बांगलादेशातल्या 120 हून अधिक कंपन्या एक अब्ज डॉलरपेक्षाही जास्त किंमतीची माहिती-तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी जगभरातल्या 35 देशांमध्ये निर्यात करतात.

1 अब्ज डॉलरची ही रक्कम 2021 पर्यंत 5 अब्ज डॉलरवर जाईल, असाही दावा त्यांनी केला.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 2009 साली 'डिजिटल बांगलादेश' उपक्रमाची सुरुवात केली होती. या उपक्रमांतर्गत त्यांनी सरकारी सेवांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणलं. शिवाय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीचाही विस्तार केला.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 3 ऑक्टोबरपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. आर्थिक विकासाच्या ज्या क्षेत्रांमध्ये भारताचा दबदबा आहे, त्या क्षेत्रांमध्येही बांगलादेशने ठामपणे पाय रोवायला सुरुवात केली आहे.

बांगलादेश: भारताचा प्रतिस्पर्धी की मित्र?

बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सौहार्दाचे संबंध नाहीत. मात्र, भारताबरोबर सध्या उत्तम संबंध आहेत. भारत दौऱ्यापूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फोन केला होता.

पाकिस्तान काश्मिरच्या मुद्द्यावर सर्व इस्लामिक राष्ट्रांना एक करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, बांगलादेशने काश्मिरमधून कलम 370 रद्द करण्याचा विरोध केलेला नाही आणि उघडपणे समर्थनही केलेलं नाही.

Image copyright Getty Images

शेख हसीना भारत दौऱ्यात याविषयी काहीतरी बोलतील, असा अंदाज आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF नुसार बांगलादेशची अर्थव्यवस्था सध्याच्या 180 अब्ज डॉलरवरून वाढून 2021 पर्यंत 322 अब्ज डॉलरपर्यंत मजल मारेल. याचाच अर्थ बांगलादेशचं दरडोई उत्पन्न पाकिस्तानहून अधिक आहे.

आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे 1951च्या जनगणनेनुसार पूर्व पाकिस्तान म्हणजेच आजच्या बांगलादेशची लोकसंख्या 4.2 कोटी होती. तर पश्चिम पाकिस्तानची लोकसंख्या 3.37 कोटी होती. आज बांगलादेशची लोकसंख्या 16.5 कोटी आहे. तर पाकिस्तानची लोकसंख्या 20 कोटीवर पोचली आहे.

बांगलादेशने लोकसंख्येलाही आवर घातला आहे. भारत आणि पाकिस्तान दोघांनाही हे शक्य झालेलं नाही. ऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिट्युशननुसार सर्वाधिक ऑनलाईन वर्कर्स असलेला जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा देश अशी बांगलादेशची नवी ओळख आहे.

एशिया डेव्हलपमेंट बँकेनुसार दक्षिण आशियात भारताच्या दबदब्याला बांगलादेश आव्हान देत आहे.

बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेची भरभराट

बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत उद्योग क्षेत्राचा वृद्धिदर महत्त्वाचा आहे तर भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचं योगदान सर्वाधिक आहे आणि उद्योग क्षेत्राचा वृद्धिदर उणेच्या घरात आहे. भारतातला मोठा वर्ग आजही कृषी आणि त्यावर आधारित व्यवसायांवर अवलंबून आहे. मात्र, जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा कमी-कमी होत चालला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालेदा झिया आणि शेख हसिना

1974 साली आलेल्या भयंकर दुष्काळानंतर 16.6 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला बांगलादेश अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत आज स्वयंपूर्ण बनला आहे. 2009 सालापासून बांगलादेशात प्रति व्यक्ती उत्पन्न तिप्पट झालं आहे.

या वर्षी प्रति व्यक्ती उत्पन्न 1,750 डॉलवर पोचलं आहे. बांगलादेशात मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. मात्र, जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार ज्या बांगलादेशात दररोज 1.25 डॉलमध्ये एकूण 19 टक्के लोक उदरनिर्वाह करायचे. ही संख्या आता 9 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

बांगलादेशात सरासरी वयोमान 72 वर्षं आहे. भारतातलं सरासरी आयुर्मान 68 वर्षं आहे तर पाकिस्तानात 66 वर्षं. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 2017 साली बांगलादेशात ज्यांचं बँक खातं आहे त्यातल्या 34.1 टक्के लोकांनी डिजिटल देवाण-घेवाण केली आहे. दक्षिण आशियात अशा डिजिटल व्यवहाराची सरासरी 27.8 टक्के आहे.

बांगलादेशात तयार होणाऱ्या कापडाची निर्यात वार्षिक 15 ते 17 टक्क्याच्या दराने वाढत आहे. 2018 साली जून महिन्यापर्यंत कापडाची निर्यात 36.7 अब्ज डॉलरपर्यंत झाली होती.

2019 पर्यंत ही निर्यात 39 अब्ज डॉलर आणि 2021 साली जेव्हा बांगलादेश आपला 50 वा स्थापना दिन साजरा करेल तेव्हा ही निर्यात 50 अब्ज डॉलरवर नेण्याचा हसीना यांचा मानस आहे.

परिश्रमी बांगलादेशी

बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत परदेशात काम करणाऱ्या जवळपास 25 लाख बांगलादेशी नागरिकांचं योगदानही महत्त्वाचं आहे. हे लोक परदेशात कमावलेला जो पैसा बांगलादेशात पाठवतात त्यात दरवर्षी 18 टक्क्यांची वाढ होत आहे. 2018 साली 15 अब्ज डॉलर्स या परदेशात गेलेल्या बांगलादेशींनी पाठवले आहेत.

Image copyright Getty Images

मात्र, मजबूत अर्थव्यवस्थेसाठी देशात उद्योग-व्यवसायांना चालना द्यायला हवी, हे शेख हसीना जाणून आहेत. परदेशी धन आणि मदतीवर उभ्या असलेल्या, कमी गुंतवणूक असणाऱ्या उत्पादन हबमधून बाहेर पडत पुढे जाण्याची बांगलादेशची इच्छा आहे.

शेख हसीना यांनी 2009 साली 'डिजिटल बांगलादेश' उपक्रम सुरू केला. तंत्रज्ञानाला चालना देणं, हा त्यामागचा हेतू. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये आयटी क्षेत्रही हळूहळू पाय रोवत आहे. ढाकातले सीईओ भारतातल्या आयटी क्षेत्राकडून शिकून भारताला टक्कर देऊ इच्छितात.

भारत औषध निर्मितीतही खूप पुढे आहे. बांगलादेशला या क्षेत्रातही आव्हान उभं करायचं आहे. बांगलादेश देशभरात 100 विशेष आर्थिक क्षेत्राची उभारणी करू इच्छितो. यापैकी 11 तयार आहेत तर 79 एसईझेडची कामं सुरू आहेत.

बांगलादेश देश छोटा आहे. मात्र, लोकसंख्या खूप जास्त आहे. लोकसंख्येची घनता जास्त आहे.

Image copyright Getty Images

आर्थिक आघाडीवर बांगलादेशात प्रगती झाली असली तरी याचा अर्थ त्या देशासमोर आव्हानं नाहीत, असा होत नाही. बांगलादेशातल्या दोन मुख्य राजकीय पक्षांमध्ये हाडवैर आहे. बांगलादेशातल्या सत्ताकारणात दोन दिग्गज महिला शेख हसीना आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचं प्रभुत्व आहे.

ज्यावेळी बांगलादेश पाकिस्तानचा भाग होता त्यावेळी या दोघींच्या कुटुंबांचा बांगलादेश निर्मितीत मोलाचा वाटा होता. गेल्या तीन दशकात या दोन्ही महिला नेत्या सत्तेत येत-जात राहिल्या. शिवाय दोघींनीही तुरुंगवास भोगला आहे.

रेडिमड कापड उद्योग

बांगलादेशच्या यशामध्ये रेडिमेड कापड उद्योगाचा वाटा सर्वांत मोठा असल्याचं मानल जातं. हा उद्योग सर्वाधिक रोजगारनिर्मिती करतो. या उद्योगाने बांगलादेशला 40.5 लाख रोजगार दिले आहेत.

Image copyright Getty Images

2018 साली बांगलादेशातून होणाऱ्या एकूण निर्यातीत रेडिमेड कापडाचा वाटा 80% होता. 2013 साली झालेली राणा प्लाझा दुर्घटना या उद्योगासाठी मोठा धक्का होता.

कापड फॅक्ट्रीची ही इमारत पडली. या दुर्घटनेत 1,130 लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर कपड्याच्या आंतरराष्ट्रीय ब्रँडना अनेक सुधारणा कराव्या लागल्या.

2018 साली चीनने बांगलादेश स्टॉक एक्सचेंजचा 25% वाटा विकत घेतला होता. भारतानेही प्रयत्न केला होता. मात्र, चीनने जास्त रक्कम दिली आणि भारताला सौदा गमवावा लागला. पाकिस्ताननंतर चीनकडून सर्वाधिक शस्त्रास्त्र खरेदी करणारा बांगलादेश जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. चीन या भागात मोठी भूमिका बजावत असल्याचं शेख हसिनादेखील मान्य करतात.

बांगलादेशने अनेक आघाड्यांवर पाकिस्तानला मागे टाकलं आहे. एवढंच नाही तर भारतालाही तगडं आव्हान देत आहे. बालमृत्यू दर, लैंगिक समानता आणि सरासरी आयुर्मानाबाबत बांगलादेशने भारतालाही मागे टाकलं आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार 2013 साली बांगलादेशचं प्रतिव्यक्ती उत्पन्न 914 डॉलर होतं. 2016 साली ते 39.11 डॉलरवर पोचलं. या काळात भारतात प्रति व्यक्ती उत्पन्न 13.80 टक्क्यांनी वाढलं आणि 1,706 डॉलरवर पोचलं.

पाकिस्तानात याच काळात 20.62 टक्क्यांची वाढ झाली आणि प्रति व्यक्ती उत्पन्न 1,462 टक्क्यांवर पोचलं. बांगलादेशने याच वेगाने प्रगती केली तर प्रति व्यक्ती उत्पनाबाबत तो 2020 साली भारतालाही मागे टाकेल, असा अंदाज आहे.

जेनरिक औषध निर्मिती

जगभरात जेनरिक औषधांच्या निर्मितीत भारत अग्रस्थानी आहे. मात्र, या क्षेत्रातही भारताला आव्हान उभं करण्याचा बांगलादेशचा प्रयत्न आहे. अल्पविकसित देशाचा दर्जा असल्यामुळे बांगलादेशला पेटंटच्या नियमातून सूट मिळाली आहे.

या सवलतीमुळे बांगलादेश जेनरिक औषध निर्मिती क्षेत्रात भारताला आव्हान देण्याता प्रयत्न करत आहे. जनेरिक औषध निर्मितीत तो जगातला दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे आणि तब्बल 60 देशांना तो औषध निर्यात करतो.

मात्र, खराब पायाभूत रचनेमुळे बांगलादेशसमोर अनेक आव्हानं आहेत. चीन 'वन बेल्ट वन रोड' योजनेअंतर्गत अनेक आघाड्यांवर बांगलादेशला मदत करत आहे. बांगलादेशमधल्या अनेक मोठ्या प्रकल्पांसाठी चीनने आर्थिक मदत दिली आहे.

देशाच्या दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पूर्व भागांना जोडण्यासाठी चीन पद्मा नदीवर चार अब्ज डॉलर खर्च करून ब्रिज रेल्वे लाईन टाकण्याचं काम करत आहे. चीनने बांगलादेशला 38 अब्ज डॉलर कर्ज देण्याचं आश्वासन दिलं आहे.

मोठ-मोठी कर्ज देत असल्यामुळे जगभरातून चीनवर टीका होत आहे. चीन कर्ज देऊन छोट्या-छोट्या राष्ट्रांना कर्जाच्या दुष्टचक्रात अडकवत असल्याचा आरोप होत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)