थायलंड: एकमेकांचा जीव वाचवताना मृत्यूमुखी पडलेल्या हत्तींची संख्या झाली 11

प्रतिनिधिक छायाचित्र Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रतिनिधिक छायाचित्र

धबधब्यात पडलेल्या पिल्लाला वाचवताना 11 हत्तींचा जीव गेल्याची घटना थायलंडमध्ये घडली आहे.

मध्य थायलंडच्या खाओ याई नॅशनल पार्कच्या स्थानिक अधिकाऱ्यांनुसार गेल्या आठवड्यात झालेल्या या घटनेत सुरुवातीला फक्त 6 हत्ती मृत झाल्याचं दिसलं होतं.

मात्र ड्रोनच्या माध्यमातून अजून पाच हत्तींच्या मृतदेहांचा शोध लागला आहे. ज्या ठिकाणी या हत्तींचा जीव गेला त्याला जागेला स्थानिक भाषेत 'नरकाचा धबधबा' असं म्हणतात.

समुहात राहणारा आणि एकमेकांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाणारा प्राणी अशी हत्तींची ओळख आहे. वेळप्रसंगी प्राणांची बाजी लावून हा प्राणी कळपातल्या इतर हत्तींची मदत करतो.

दक्षिण थायलंडमधल्या खाओ याई राष्ट्रीय अभयारण्यात 3 वर्षांचं हत्तीचं एक पिल्लू पाय घसरून धबधब्यात पडलं. त्याला वाचवताना या हत्तींचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हाईव नॅरॉक (नरकाचा धबधबा) असं या धबधब्याचं नाव आहे. नावावरूनच या धबधबा किती धोकादायक असेल, याची कल्पना येते. याठिकाणी यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

1992 सालीसुद्धा 8 हत्तींचा एक कळप या धबधब्यात पडून सर्वच्या सर्व हत्तींचा मृत्यू झाला होता.

Image copyright THAILAND DNP
प्रतिमा मथळा थायलॅंडमध्ये घडलेल्या दुर्घटनेत सहा हत्तींनी गमावला जीव (छायाचित्र- थायलंड नॅशनल पार्क)

शनिवारी हत्तींचा एक कळप या धबधब्याकडे जाणारा मार्ग अडवून उभे होते, तेव्हा अधिकाऱ्यंना पाचारण करण्यात आलं, अशी माहिती थायलंडच्या नॅशनल पार्क, वाईल्डलाईफ अँड प्लँट कॉन्झरव्हेशन विभागाने दिली आहे.

अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केल्यानंतर तीन तासांनी 3 वर्षांच्या हत्तीचा मृतदेह धबधब्यात आढळला आणि जवळच इतर पाच हत्तींचे मृतदेहही आढळले.

हे प्राणी संरक्षण आणि अन्न शोधण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळेच कळपात उरलेल्या हत्तींना पुढे अनेक अडचणी येतात, असं थायलंडच्या वाईल्डलाईफ फ्रेंड्स फाऊंडेशनचे संस्थापक एडविन विक यांनी सांगितलं.

शिवाय, हत्ती दुःखाची भावना दर्शवू शकतात. त्यामुळे ही घटना कळपातल्या इतर हत्तींसाठी भावनिकदृष्ट्या मोठा आघात ठरणार आहे.

विक यांनी बीबीसीला सांगितलं, "हे म्हणजे तुमचं निम्मं कुटुंब गमावण्यासारखं आहे."

ते पुढे म्हणतात, "यात तुम्ही काहीच करू शकत नाही. दुर्दैवाने हे निसर्गनिर्मित आहे."

एशियन हत्तींचं घर अशी ओळख असलेल्या थायलंडमध्ये आजघडीला केवळ 7,000 एशियन हत्ती उरले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)