टर्कीला सिरियावर हल्ला करण्याला आमची मान्यता नाही - अमेरिका

रणगाडा Image copyright Getty Images

टर्कीच्या फौजांनी सीरियाच्या उत्तर भागावर हल्ले चढवले आहेत. टर्कीचे पंतप्रधान रेसप तय्यब अर्दोआन यांनी ही माहिती दिली आहे.

सीरियाच्या कुर्दीशबहुल भागात हा हल्ला करण्यात आला आहे.

या हल्ल्यांमागे अमेरिकेचा हात आहे का? अशी शंका व्यक्त करण्यात आली होती पण या हल्ल्याशी आपला काही संबंध नसल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माइक पॉंपिओ यांनी सांगितलं की ईशान्य सीरियामध्ये टर्कीने जो हल्ला केला आहे त्याला आम्ही हिरवा कंदिल दिला नाही. या हल्ल्याला आमची मान्यता नाही असं पाँपिओ यांनी म्हटलं.

ईशान्य सीरियातून आपलं सैन्य मागे घेण्याचा निर्णय अमेरिकेनी घेतला आहे. या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. पॉंपिओ यांनी या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

टर्कीमध्ये असलेल्या जवळपास 36 लाख सीरियन शरणार्थींसाठी निवारा उभारता येईल असा 'सेफ झोन' बनवण्याचा टर्कीचा विचार आहे.

टर्की अशी काहीतरी कारवाई करणार, याचे संकेत काही दिवसांपासून मिळत होते. त्यामुळे कालच अमेरिकेने उत्तर सीरियातून आपलं सैन्य माघारी बोलावलं होतं.

Image copyright Reuters

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सैन्य माघारी बोलावलं असलं तरी हल्ला केल्यास टर्कीला आर्थिक परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता.

सीरियामध्ये ISचा बिमोड करण्यात या कुर्द फौजांची अमेरिकेला साथ मिळाली होती.

त्यामुळेच सीरियाच्या सीमाभागातून सैन्य माघारी बोलवण्याची अध्यक्ष ट्रंप यांची कृती म्हणजे कुर्दांच्या नेतृत्वाखालील सीरियन डेमोक्रेटिक फौजांच्या 'पाठीत खंजीर खुपसण्यासारखं' असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे स्वतः रिपब्लिकन पक्षातल्या काही नेत्यांनी या कृतीचा विरोध केला आहे.

चहुबाजूंनी होणाऱ्या या टीकेनंतर ट्रंप यांनी टर्कीने आपली मर्यादा ओलांडली तर टर्कीच्या अर्थव्यस्थेला 'पांगळं' करू, असा दम दिला होता. टर्कीने 'अमानवीय असं काहीही करू नये', असंही ट्रंप यांनी म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)