काश्मीरच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली युकेतले नेते जेरेमी कॉर्बिन यांची भेट

जेरेमी कॉर्बाईन भेट

युकेमध्यला 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस' (IOC) शिष्टमंडळाने मजूर पक्षाचे (लेबर पार्टी) नेते जेरेमी कॉर्बिन यांची 8 ऑक्टोबरला भेट घेतली.

युकेच्या संसदेत मजूर पक्षाने भारताच्या विरोधात काश्मीरविषयक ठराव मांडला होता. कॉर्बिन यांची भेट घेऊन IOCने या ठरावाबाबतची आपली नाराजी व्यक्त केली आहे.

'भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये,' असं आयओसीच्या शिष्टमंडळाने कॉर्बिन यांना सांगितलं. इंडियन ओव्हरसीज काँग्रेस (IOC) ही भारतीय काँग्रेसशी संलग्नित संस्था आहे.

IOCचे अध्यक्ष कमल धालीवाल, सुधाकर गौड यांच्यासह 8 जणांचं शिष्टमंडळ कॉर्बिन यांच्या भेटीला गेलं होतं. या बैठकीत आपण काश्मीरमधल्या मानवी हक्कांबाबत चर्चा केल्याचं जेरेमी कॉर्बिन यांनी एक फोटो ट्वीट करत म्हटलं होतं.

तर काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून त्यामध्ये बाहेरील कोणी पडू नये, अशी आपली इच्छा असल्याचं आपण कॉर्बिन यांना सांगितल्याचं IOCचे प्रवक्ते सुधाकर गौड यांनी म्हटलंय.

काश्मीरमधल्या मानवी हक्कांविषयी आम्ही चर्चा केली. इथलं हिंसा सत्र आणि गेल्या काही काळापासून इथे असणारं भीतीचं वातारवण संपुष्टात येण्याची गरज आहे, असं गौड यांनी बीबीसीला सांगितलं.

केंद्र सरकारनं भारत प्रशासित काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केलं आहे. त्यानंतर काश्मीरमध्ये जी स्थिती निर्माण झाली आहे त्याबद्दल काँग्रेसचं आणि सत्ताधारी पक्षाचे विचार समान नाहीत.

असा प्रश्न भारतात इतर कुठेही निर्माण झाला तर काँग्रेस पक्ष जबाबदारीने वागून सत्ताधाऱ्यांचा सनदशीर मार्गाने विरोध करेल. पण काँग्रेसला या प्रश्नात इतर कोणत्याही देशाचा हस्तक्षेप नकोय अशी IOCची भूमिका आहे, असं गौड सांगतात.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याची आपल्याला जाणीव आहे असं कॉर्बिन यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. पण सध्या काश्मीरमध्ये नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण ही बैठक बोलवली होती असं ते म्हणाले.

काँग्रेस-भाजपमध्ये वाद

जेरेमी कॉर्बिन यांनी या भेटीचा फोटो ट्वीट केल्यानंतर भाजपने IOC वर टीका केली. तसेच कॉर्बिन यांची भेट का घेतली याचं स्पष्टीकरण द्यावं असंही म्हटलं.

भाजपच्या या ट्वीटला काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे. काही प्रश्नांचं आधी भाजपनं उत्तर द्यावं असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.

भाजपने देशातल्या आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी, बँकिंग समस्या आणि रामेलमधल्या अनियमिततांविषयीच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नसून सत्य समोर येऊ नये म्हणून अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी पसरवण्यात येत असल्याचं काँग्रेसने म्हटलंय.

भारतीयांच्या भावना जाणून घ्यायच्या होत्या...

जेरेमी कॉर्बिन यांच्या लेबर पार्टीने काश्मीरविषयी एक 'इमर्जन्सी मोशन'- तातडीचा ठराव मांडला होता. पण असं केल्याने युकेमधल्या भारतीयांना मजूर पक्ष हा भारतविरोधी वाटू लागल्याचंही IOC नं कार्बाईन यांना सांगितलं.

युकेतल्या भारतीयांच्या याच भावना जाणून घ्यायच्या असल्याने आपण त्यांना बैठकीला आमंत्रित केल्याचं मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी म्हटलंय.

काश्मीरबद्दल मंजूर करण्यात आलेल्या या तातडीच्या ठरावाविषयी लेबर पक्षाने एक निवेदन जारी करावं अशी मागणी आता इंडियन ओव्हरसीज काँग्रेसने केली आहे.

15 ऑगस्ट रोजी लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारतीय समुदायावर झालेल्या हल्ल्याविषयीही या बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली.

मजूर पक्ष हा लोकशाही मूल्यांवर चालणारा पक्ष आहे. तो सर्वांच्या मताचा आदर राखतो असं कॉर्बिन यांनी शिष्टमंडळाला सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)