एलियुड किपचोगे: मॅरेथॉन 2 तासात पूर्ण करण्याचा विश्वविक्रम तर झाला, पण...

किपजोगे Image copyright Getty Images

मानवी विचारांना, कल्पनांना, प्रयत्नांना भौतिक बंधनांमध्ये बांधून ठेवता येत नाही. अत्युच्च अशा आविष्कारातून समस्त मानव प्रजातीला आधारभूत आणि प्रेरणादायी ठरतील असे क्षण घडतात.

शनिवारी अशाच एका सर्वोतमाचा ध्यास घेतलेल्या एका अवलिया धावपटूने अचंबित करणाऱ्या विक्रमाला गवसणी घातली. केनियाच्या एलियुड किपचोगेने मॅरेथॉन शर्यत दोन तासांच्या आत पूर्ण करण्याचा विक्रम नोंदवला.

तुम्ही म्हणाल यात काय एवढं?

आता आकड्यांच्या भाषेत एलियुडचा अविश्वसनीय विक्रम समजून घेऊया. 34 वर्षीय एलियुडने 42.2 किलोमीटरचं अंतर 1 तास, 59 मिनिटं आणि 40 सेकंदात पूर्ण केलं. आजवर कुठल्या मानवाने कुठलीच मॅरेथॉन स्पर्धा दोन तासात पूर्ण केली नाही.

मॅरेथॉन शर्यतींचा आंतरराष्ट्रीय विक्रम एलियुडच्याच नावावर आहे. एलियुडने गेल्याच वर्षी बर्लिन इथं झालेली मॅरेथॉन शर्यत 2 तास 1 मिनिट आणि 39 सेकंदात पूर्ण केली होती. अधिकृत मॅरेथॉन असल्याने इलियुडने नोंदलेली वेळ विक्रम ठरली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इलियुड किपचोग

नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला तेव्हा जगभरात लोकांना अद्भुत वाटलं होतं. उसेन बोल्टने 100 मीटर शर्यत 9.58 सेकंदात पूर्ण केली, तेव्हा लोकांचा विश्वास बसला नव्हता. त्याचप्रमाणे एलियुडने 42 किलोमीटरची दौड दोन तासाचा ठोका पूर्ण व्हायच्या आत पूर्ण केली तेव्हा जगभरातल्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.

एलियुडच्या विक्रमाची महती कळल्यावर सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

मात्र अधिकृत विक्रम म्हणून नोंद नाही

ऑस्ट्रियातील व्हिएन्ना इथल्या एका रमणीय प्रदेशात झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत एलियुडने सगळ्यात कमी वेळेत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करण्याचा इतिहास घडवला. या आनंदाची कटू बाजू म्हणजे हा विक्रम आकडेपटात नोंदला जाणार नाही. कारण ही शर्यत अधिकृत मॅरेथॉन नव्हती. ही स्पर्धा खुली स्पर्धा नव्हती.

एलियुड हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अग्रगण्य धावपटू आहे. ठराविक वेळेत शर्यत पूर्ण व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय धावपटू पेसमेकर्स सोबतीला घेऊन पळतात. ते एकमेकांच्या अंतराचा, ऊर्जेचा अंदाज घेऊन पळतात.

"आजच्या कामगिरीने विक्रमाचं कोणतंही शिखर सर करता येतं हे सिद्ध झालं. मी हे करून दाखवलं आहे. अन्य धावपटूंसाठी ही वेळ प्रेरणादायी ठरेल अशी आशा आहे," असं किपचोगेने सांगितलं.

किपचोगे विक्रमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करू शकतो, हे लक्षात आल्यावर पेसमेकर्सनी त्यांचा वेग कमी करत त्याला पुढे जाऊ दिलं. किपचोगेने शेवटची लाईन पार केल्यानंतर जल्लोष केला. किपचोगने पत्नी ग्रेसला आलिंगन देत विक्रम साजरा केला. सहकाऱ्यांनी त्याला गराडा घातला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इलियुड किपचोग

"सर रॉजर बॅनिस्टर यांनी एक मैलाचं अंतर चार मिनिटांच्या, आत पूर्ण करण्याचा विक्रम नोंदवला होता. मला चांगलं वाटतं आहे. बॅनिस्टर यांनी इतिहास रचला होता. त्यानंतर मॅरेथॉन पूर्ण करण्याच्या विक्रमासाठी 65 वर्षं जावी लागली. पण मी करून दाखवलं आहे. खेळांमधली सकारात्मकता दिसून येते. मला हा खेळ स्वच्छ आणि रंजक करायचा आहे. आपण एकत्र इतिहास घडवू शकतो," असं तो म्हणाला.

मॅरेथॉनचा विक्रम मोडण्यासाठी एलियुड 100 मीटरचं अंतर 17.08 सेकंदात ताशी 21 किलोमीटरच्या वेगाने पूर्ण केलं. किपचोगच्या बरोबर 42 पेसमेकर्सची टीम होती.

किपचोगेच्या प्रशिक्षकांनी बाईकवर त्याला पाणी आणि एनर्जी ड्रिंक पुरवलं. अधिकृत मॅरेथॉनमध्ये रस्त्याशेजारी असणाऱ्या काऊंटरवरून धावपटूला पाणी आणि एनर्जी ड्रिंक घ्यावं लागतं. आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स संघटनेच्या नियमांनुसार अशी मदत पुरवता येत नाही. ही मॅरेथॉन अधिकृत नसण्याचं हेही एक कारण आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)