हाँगकाँग आंदोलन: शी जिनपिंग यांचा इशारा, ‘खबरदार, चीनचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला तर...’

निदर्शक Image copyright Reuters

चीनचे दोन तुकडे करू पाहणाऱ्यांची 'शरीरं तुडवून हाडांचा भुगा करू', असा इशारा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. रविवारी (13 ऑक्टोबर) नेपाळ भेटीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केल्याचं चीनची राष्ट्रीय वाहिनी असणाऱ्या CCTVने म्हटलंय.

त्यांचा रोख हाँगकाँग आणि तिथे अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या बीजिंग विरोधी निदर्शनांकडे असला तरी त्यांनी कोणत्याही भूभागाचा विशिष्ट उल्लेख असा केला नाही.

रविवारी पुन्हा एकदा हाँगकाँगमधल्या शांततापूर्ण निदर्शनांचं रूपांतर झटापटींमध्ये झालं. त्यावेळी बीजिंगधार्जिणी दुकानं आणि सार्वनजनिक वाहतूक व्यवस्थेवरील स्टेशन्सशी नासधूस करण्यात आली.

शी जिनपिंग काय म्हणाले?

"चीनच्या कोणत्याही भूभागाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करणारा संपुष्टात येईल. त्याचं शरीर तुडवून हाडांचा भुगा करू," असं जिनपिंग यांनी म्हटल्याचं रविवारी परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय.

Image copyright Reuters

"चीनच्या विभाजनासाठी बाहेरून मदत करणाऱ्यांना चीनी लोक भरकटलेलं असल्याचं समजून त्यांच्याकडे फारसं लक्ष देणार नाहीत," ते म्हणाले.

हाँगकाँगमधल्या निदर्शनांना चार महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. तेव्हापासूनच या आंदोलनांना खतपाणी घालण्याचा दोष चीनने 'बाहेरच्या शक्तींना' दिला आहे. चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिका आणि युनायटेड किंग्डम हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही चीनकडून करण्यात आला होता.

वक्तव्य का महत्त्वाचं?

हाँगकाँगमधल्या निदर्शनांबद्दल शी जिनपिंग यांनी अद्याप कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही वा थेट वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळेच त्यांचं हे वक्तव्य कठोर मानलं जातंय.

ही निदर्शनं हाताळण्यासाठी हाँगकाँगचं पोलीस दल समर्थ असल्याचं आतापर्यंत बीजिंगने म्हटलं असलं तर तरी हाँगकाँगच्या रस्त्यांवरील ही हिंसा थांबवण्यासाठी बीजिंग लष्कर पाठवण्याची भीती आंदोलकांना वाटतेय.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा तियाननमेन स्क्वेअरमध्ये झालेल्या निदर्शनांच्या वेळी हा क्षण ऐतिहासिक ठरला होता

पण लष्कर पाठवण्याचे परिणाम का होऊ शकतात हे लक्षात घेता, असं होण्याची शक्यता नसल्याचं काहींना वाटतंय. तर 1989मध्ये बीजिंगमधल्या तियाननमेन चौकातल्या आंदोलनावर चीनने ज्या प्रकारे कारवाई केली तशीच कारवाई पुन्हा होण्याची शक्यताही काही विश्लेषकांना वाटतेय. या कारवाईमध्ये शेकडो आंदोलकांचा मृत्यू झाला होता.

हाँगकाँगमध्ये काय घडतंय?

हाँगकाँग हा चीनचा भाग असला तरी हाँगकाँगला मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता आहे. त्यांची स्वतःची कायदेप्रणाली आहे आणि चीनच्या मुख्य भूमीमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा इथल्या लोकांना भरपूर स्वातंत्र्य आहे.

गेल्या काही काळापासून हाँगकाँगमध्ये बीजिंग विरोधी भावना आहे. पण जून महिन्यापासून आंदोलनांना सुरुवात झाली.

Image copyright Getty Images

ज्यांच्यावर गुन्हेगारी आरोप आहे, अशा लोकांचं चीनच्या मुख्य भूमीत प्रत्यर्पण करण्याची मुभा देणाऱ्या कायद्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, आणि ठिणगी पडली.

मोठी आंदोलनं झाल्यावर हे विधेयक मागे घेण्यात येईल असं सरकारने म्हटलं खरं, पण तोपर्यंत आंदोलन आवाक्याबाहेर गेलं होतं.

आता आंदोलकांनी आपल्या पाच मागण्या पुढे केल्या आहेत. यामध्ये हाँगकाँगमध्ये पूर्ण प्रजासत्ताक असावं, अशी देखील एक मागणी आहे. सोबतच आंदोलकांवर पोलिस करत असलेल्या बळाच्या वापराचीही चौकशी करण्यात यावी, असं आंदोलक म्हणत आहेत.

आंदोलनांची सदयस्थिती

जून महिन्यापासून दर वीकेंडला - शनिवारी आणि रविवारी ही आंदोलनं होतात. हाँगकाँगच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही आंदोलनं होत असल्याने याने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत होतं.

या 'सिव्हिल डिसओबिडियन्स'ला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 2,300 जणांना अटक करण्यात आली आहेत. रविवारी हाँगकाँगच्या अनेक भागांमध्ये आंदोलनं झाली आणि दुपारपर्यंत हाँगकाँग मेट्रोची 27 स्टेशन्स बंद करावी लागली.

आंदोलकांना पांगवण्यासाठी 'किमान बळाचा' वापर केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. पण वीकेंडला खरेदी करणारे लोक या गदारोळात अडकल्याचं टीव्हीवरच्या दृश्यांमध्ये पहायला मिळालं. यातले काही लोक किंचाळत होते तर पोलीस शॉपिंग सेंटरमध्ये घुसल्याने काही जण जखमी झाले.

हाँगकाँगच्या माँग कॉक पोलिस स्टेशनमध्ये पेट्रोल बाँब फेकण्यात आले आणि एका पोलीस अधिकाऱ्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. या अधिकाऱ्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने म्हटलंय.

Image copyright EPA

आंदोलकांच्या एका गटाने रविवारी रात्री एका आंदोलकाचा पुतळा हाँगकाँगच्या प्रसिद्ध लायन रॉक शिखरावर उभारला. गॅस मास्क, गॉगल आणि हेल्मेट घातलेला 'लेडी लिबर्टी'चा हा पुतळा या आंदोलनांचं द्योतक बनलाय. हा पुतळा पोलिसांच्या गोळीबारामुळे डोळा गमावलेल्या जखमी आंदोलकांचं प्रतिनिधित्वं करतो.

वादळी पावसामध्ये काही डझन आंदोलक डोक्यावर टॉर्च बांधून हे 500 मीटर्सचं शिखर चढून गेले. या पुतळ्याच्या हातात असणाऱ्या बॅनरवर लिहिलंय, "आमच्या काळातली क्रांती, हाँगकाँगची मुक्ती."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)