अभिजीत बॅनर्जी: मुंबईत जन्मलेल्या अर्थतज्ज्ञाला ‘गरिबी हटाव’ प्रयोगांसाठी नोबेल

अभिजीत बॅनर्जी Image copyright MIT

भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना या वर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्यासोबत एस्थेर डूफ्लो आणि मायकल क्रिमर यांचाही या पुरस्कारात समावेश आहे.

2003 मध्ये अभिजीत बॅनर्जी आणि इतर संशोधकांनी Abdul Latif Jameel Poverty Action Lab (J-PAL) या सेंटरची स्थापना केली. गरिबी हटवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आणता येईल, यावर J-PALमध्ये संशोधन केलं जात आहे.

जगभरात गरिबी हटवण्यासाठी अभिजीत बॅनर्जी यांनी त्यांच्या दोन सहकाऱ्यांबरोबर अनेक प्रयोग केले, असं नोबेल समितीनं हा पुरस्कार जाहीर करताना म्हटलं. त्यांच्या या संशोधनामुळे गेल्या 20 वर्षांत खूप बदल घडला आहे.

Image copyright ANI

1981 साली कोलकाता विद्यापीठातून बॅनर्जी यांनी BSc केलं तर 1983मध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNUमधून MA पूर्ण केलं. JNU नंतर अभिजीत PhD साठी हार्वर्ड विद्यापीठात गेले.

BBC
अभिजीत बॅनर्जी कोण आहेत?

बॅनर्जी, एस्थेर डूफ्लो आणि मायकल क्रिमर यांना 2019चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

  • जन्ममुंबई

  • आठवाभारतीय वंशाचा नोबेल विजेता

  • सह-संस्थापकAbdul Latif Jameel Poverty Action Lab (J-PAL), 2003

  • शिक्षणJNU मधून MA, हार्व्हर्ड विद्यापीठातून PhD

  • प्राध्यापकअर्थशास्त्र, MIT, US

BBC

भारतातल्या विकलांग मुलांना चांगलं शिक्षण कसं देता येईल, यासाठी अभिजीत बॅनर्जी यांनी एक संशोधन पेपर लिहिला होता. त्याचा तब्बल 50 लाख मुलांना फायदा झाला आहे.

अभिजीत बिनायक बॅनर्जी यांचे वडील दीपक बॅनर्जी आणि आई निर्मला बॅनर्जी हे दोघेही अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. वडील कोलकाताच्या प्रेसिडेन्सी कॉलेजचे प्राध्यापक होते तर आई स्त्रीवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत.

त्यांचा जन्म मुंबईत झाला असून त्यांच्या आईचं माहेरचं नाव हे निर्मला पाटणकर. त्यांना मराठीत लिखाण करायचंय, असं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

एस्थेर डूफ्लो या अभिजीत बॅनर्जी यांच्या पार्टनर आहेत. सगळ्यात कमी वयात अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला संशोधक आहेत. 

एस्थेर यांनी पॅरीसमधल्या एकोल नॉर्माल सुपिरीऑर (École Normale Supérieure) आणि अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) इथून शिक्षण घेतलं. त्यानंतर त्या MITमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एस्थेर पत्रकार परिषदेत म्हणाल्या, "हे यश पाहून इतर महिलांनाही स्फूर्ती मिळेल. तसंच पुरुषही महिलांचा सन्मान करतील."

शुभेच्छांचा वर्षाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून अभिजीत बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.

Image copyright Twitter

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही बॅनर्जी यांच अभिनंदन करत ट्वीट केलं की, "त्यांच्या संशोधनामुळे अर्थतज्ज्ञांना भारतात आणि जगातल्या गरिबीचा सामना कसा करावा, हे चांगल्याने समजता आलं."

Image copyright TWITTER

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अभिजीत बॅनर्जी यांचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं आहे.

Image copyright Twitter

याशिवाय, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही बॅनर्जी यांचं कौतुक केलं आहे. "प्रत्येक भारतीयासाठी हा मोठा दिवस आहे. अभिजीत बॅनर्जी यांचं मनापासून अभिनंदन. दारिद्र्य निर्मूलनासाठी केलेल्या कामाचा हा सर्वोच्च सन्मान आहे," असं ते म्हणाले.

"त्यांच्या उल्लेखनीय कामाचा दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या लाखो मुलांना फायदा होतोय. 'चुनौती' या दिल्लीच्या शाळांमधील एका महत्त्वाच्या धोरणात्मक बदलामुळे सरकारी शाळांमधल्या शिक्षणात मोठा बदल घडतोय. हे बॅनर्जी यांच्याच एका प्रयोगावर आधारित आहे," असं केजरीवाल यांनी पुढे सांगितलं.

Image copyright Twitter

तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी "आणखी एका बंगाली माणसाने देशाला अभिमानाची संधी दिली आहे. आम्ही खूप उत्साहित झालोय," असं ट्वीट केलं आहे.

Image copyright Twitter

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाकांक्षी न्याय योजनेचे शिल्पकार अभिजीत बॅनर्जी होते, असं तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून सांगितलं.

Image copyright Twitter

"अभिजीत बॅनर्जी यांचं अर्थशास्त्राचं नोबेल मिळाल्याबद्दल अभिनंदन. गरिबी हटवून भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या न्याय योजनेची संकल्पना त्यांचीच होती. पण आता त्याऐवजी आपल्याकडे मोदीनॉमिक्स आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं होतंय, शिवाय गरिबीही वाढतेय," असं ते म्हणाले.

याशिवाय, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही एका प्रसिद्धीपत्रकात बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. "बॅनर्जी यांनी भारतासह जगभरात लाखो लोकांना गरिबीतून मुक्त होण्यास मदत केली आहे. त्यांचा अप्रोच आणि त्यांनी केलेले प्रयोग असामान्य आहेत. बॅनर्जी यांना नोबेल मिळणं, ही प्रत्येक भारतीयसाठी अभिमानाची बाब आहे," असं त्या म्हणाल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)