क्वांटास एअरलाइन्सची ऐतिहासिक झेप, सलग 19 तासांचं उड्डाण

विमान Image copyright AFP/HANDOUT

अमेरिकेतल्या क्वांटास एअरलाइन्सच्या विमानाने प्रवाशांसह आजवरचं सर्वांत दीर्घ उड्डाण पूर्ण केलं आहे. दीर्घ उड्डाणाचा प्रवाशांवर, वैमानिकांवर आणि कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल याचा अभ्यास यामधून करण्यात आला.

बोईंगच्या 787-9 या विमानाने 49 लोकांसह न्यूयॉर्क ते सिडनी असा 19 तास 16 मिनिटांचा प्रवास सलग केला. हे अंतर 16,200 किमी म्हणजेच 10,066 मैल इतके आहे.

या कंपनीनं पुढील महिन्यात लंडन ते सिडनी असं सलग उड्डाण करण्याचं निश्चित केलं आहे.

2019च्या अखेरीपर्यंत या मार्गांवर नियमित उड्डाणं सुरू करण्याबाबत निर्णय क्वांटास घेऊ शकते. जर या प्रकारच्या उड्डाणांना असंच यश आलं तर 2022-23 पर्यंत अशा मार्गांवर व्यावसायिक उड्डाणं सुरू होतील.

आजवर प्रवासी आणि मालासह कोणत्याही व्यावसायिक विमानानं असं दीर्घ उड्डाण केलं नसल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.

इंधनासाठी थांबावं लागू नये यासाठी क्वांटास कंपनीनं या विमानात शक्य तितकं जास्त इंधन भरलं होतं. त्याचप्रमाणे प्रवासी सामानावरही वजनाचं बंधन घातलं होतं आणि कोणत्याही प्रकारचा माल या विमानात चढवला नव्हता.

Image copyright AFP/HANDOUT

प्रवाशांनी आपली विमानं सिडनीच्या वेळेनुसार लावली होती आणि जेटलॅग टाळण्यासाठी पूर्व ऑस्ट्रेलियात रात्र होईपर्यंत त्यांना जागं ठेवण्यात आलं होतं.

सहा तासांनी त्यांना भरपूर कार्बोहायड्रेट असलेलं जेवण देण्यात आलं आणि त्यांना झोप येण्यासाठी दिवे मंद करण्यात आले. वेगवेगळे टाइम झोन पार केल्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला. तसेच ब्रेनव्हेवज, मेलाटोनिनची पातळी आणि सतर्कता याचा अभ्यास करण्यात आला.

हवाई उड्डाण क्षेत्रातली ही पहिलीच घटना आहे. यामुळे जगाच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात अत्यंत वेगाने जाण्यासाठी अशा उड्डाणांचा उपयोग होईल असं मत क्वांटास ग्रुपचे सीईओ अलन जॉयस यांनी व्यक्त केले.

दूरवरच्या अंतरासाठीच्या उड्डाणांसाठी हवाई कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी दीर्घमार्ग सुरू केले आहेत. सिंगापूर एअरलाइन्सनं सिंगापूर ते न्यूयॉर्क असा 19 तासांचं उड्डाण सुरू केलं आहे. सध्याचं ते सर्वांत मोठं व्यावसायिक उड्डाण आहे.

गेल्यावर्षी क्वांटासनं पर्थ ते लंडन असं 17 तासांचं उड्डाण सुरू केलं. तर कतार एअरलाइन्सचं ऑकलंड-दोहा हे 17.5 तासांचं उड्डाण सुरू आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)