रशिया–टर्कीचा सीरिया सीमेवरून करार: मध्य पूर्वेत रशियाचा दबदबा असा वाढतोय

रशियातल्या सोचीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रसेप तय्यप एर्डोआन यांच्यात हा करार झाला. Image copyright Reuters
प्रतिमा मथळा रशियातल्या सोचीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रसेप तय्यप एर्डोआन यांच्यात हा करार झाला.

टर्की आणि रशिया यांच्यात झालेल्या बैठकांच्या सत्रानंतर आता या दोन देशांमध्ये उत्तर सीरियातल्या कुर्दांच्या विरोधातील लष्करी कारवाईविषयी एकमत झालंय. हा एक 'ऐतिहासिक करार' असल्याचं दोन्ही देशांनी म्हटलंय.

रशियातल्या सोचीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रसेप तय्यप एर्डोआन यांच्यात हा करार झाला.

टर्की आणि सीरियाच्या सीमेवर रशिया आणि टर्की या दोन्ही देशांची सैन्य तैनात आहेत. या भागातून अमेरिकेने आपलं लष्कर माघारी बोलावलंय. आता टर्की आणि सीरिया हे दोन देश एकत्र सीमेवर पॅट्रोलिंग करतील.

अमेरिकेने आपलं सैन्य माघारी बोलावल्यानंतर टर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्डोआन यांनी आक्रमक भूमिका घेत 9 ऑक्टोबरपासून सीमेपलीकडे मोहीम सुरू केली होती.

सीरियाचे राष्ट्रपती बशर अल-असद यांना रशियाचा पाठिंबा आहे. आणि टर्कीच्या आक्रमक भूमिकेमुळे रशिया आणि टर्कीत तणावाची शक्यता निर्माण झाली होती. दोन्ही देशांना ही परिस्थिती टाळायची होती.

दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये तब्बल 6 तास बैठक झाली आणि यावर तोडगा काढण्यात आला. रशियाने टर्कीला मोहीम राबवण्यासाठी दुजोरा दिला आणि दोन्ही देशांतला तणाव संपुष्टात आला.

गेल्या पाच वर्षांच्या काळामध्ये रशियाने आपला मध्य-पूर्वेतला दबदबा वाढवलेला आहे. पंचवार्षिक योजना एकेकाळी अतिशय लोकप्रिय होत्या. पाच वर्षांच्या कालावधीत एखाद्या अर्थव्यवस्थेचा कायापालट करता येऊ शकतो, अशी कम्युनिस्ट रशियाची धारणा आहे.

पण व्लादिमीर पुतीन यांच्या कार्यकाळात रशियाने या संकल्पनेला एक नवीन अर्थ दिला.

यासाठी थोडं मागे 2014मध्ये जाऊयात

रशियाने क्रीमियावर कब्जा केला होता आणि पूर्व युक्रेनमध्ये लष्करी हस्तक्षेप केला होता. यामुळे पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध घातले होते. हा देश एकटा जणूकाही वाळीत पडला होता.

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यावर टीका करण्याची पाश्चिमात्य देशांच्या नेत्यांमध्ये चढाओढ लागली होती. आपण दबाव टाकल्यास रशियाचा नूर बदलेल, असा विश्वास या सगळ्यांना होता. रशिया ही एक regional power म्हणजे फक्त एक प्रादेशिक शक्ती असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांनी म्हटलं होतं. एकेकाळी महासत्ता असणाऱ्या रशियासाठी हे अपमानजनक होतं.

Image copyright MIKHAIL SVETLOV
प्रतिमा मथळा व्लादिमीर पुतिन

आता पुन्हा येऊयात 2019मध्ये.

आज रशिया जगभरात आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजूने रशियाने अमेरिकन निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला होता. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत आपलं अस्तित्त्वही वाढवण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. शिवाय युरोपीयन देशांतल्या मतभेदांचाही फायदा घेण्याचा रशियाचा प्रयत्न आहे.

मध्य पूर्वेत मध्यस्थी

जगाच्या मध्य पूर्व भागात हा बदल अगदी स्पष्टपणे दिसतोय. रशियाने सीरियात आपली लष्करी मोहीम सुरू केल्याला 4 वर्षं उलटल्यानंतर आता या भागातील महत्त्वाचा खेळाडू आणि राजकीय वरचष्मा असणारा देश म्हणून रशियाने अमेरिकेची जागा घेतलेली आहे.

गेल्या काही दिवसांच्या कालावधीतच व्लादिमीर पुतीन यांनी तुर्कस्थानच्या अध्यक्षांशी फोनवरून बातचीत करत त्यांना मॉस्कोला यायचं निमंत्रण दिलं. इस्रायलच्या पंतप्रधानांशीही त्यांनी फोनवरून 'सुरक्षाविषयक बाबींवर'चर्चा केली होती. पुतीन यांनी सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिरातीचा (UAE) दौराही केला.

मध्य पूर्वेतला रशियाचा वाढता सहभाग यावरून दिसतो.

प्रसिद्ध रशियन टॅब्लॉईड 'मॉस्कोव्ह्सकी कॉमसोमोलेट्स'ने या बदलाविषयी म्हटलंय, "हेन्री किसिंजर आणि त्यांच्या 'जागतिक भौगोलिक-राजकीय बुद्धीबळाच्या' काळामध्ये मध्य-पूर्वेतल्या सध्याच्या परिस्थितीची कल्पनाही करता आली नसती. अमेरिका नावाच्या एका अवाढव्य राक्षसाची दिशा दिवसाढवळ्या चुकली... आणि रशियाच्या कूटनीतीने या खेळात आघाडी घेतली."

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा पुतिन यांच्या अबूधाबी भेटीदरम्यान रशियाचा झेंडा फडकावण्यात आला.

"आज रशिया एका जागतिक मध्यस्थाचं आणि राजकीय दलालाची भूमिका बजावतो आणि कोणत्याही राजकीय शक्तींना याकडे दुर्लक्ष करणं शक्य नाही."

सीरीया-टर्कीच्या सीमेवरून अमेरिकन सैन्य माघारी बोलवण्याच्या डोनाल्ड ट्रंप यांच्या निर्णयाने मॉस्कोमधले परराष्ट्र धोरणतज्ज्ञ आश्चर्यचकित झाले.

क्रेमलिनमधल्या सरकारशी जवळीक असलेले रशियन परराष्ट्र धोरण विश्लेषक फ्योदोर लुक्यानोव्ह म्हणतात, "अमेरिकन चतुर असल्याचं मानलं जातं. आणि जर अमेरिकन लोक काही मूर्खपणा करत असतील तर ते ती गोष्ट मूर्ख असल्याने करत नाहीत, तर आपल्याला त्यांचा मुख्य हेतू समजत नसल्याने आपल्याला तसं वाटतं. अमेरिकन लोक अतिशय मूर्खपणाच्या गोष्टी करू शकतात, यावर विश्वास ठेवणं अनेक रशियनांना कठीण जातं. पण खरंच ते असं करू शकतात."

सीरियात रशियला कसा मिळाला विजय

ईशान्य सीरियातल्या सध्याच्या परिस्थितीचा मॉस्कोला अनेक प्रकारे फायदा होतो.

- रशिया हा सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांचा मुख्य राजकीय आणि लष्करी साथीदार आहे. सीरियाचं जितक्या जास्त भूभागावर नियंत्रण येईल तितके ते मॉस्कोच्या फायद्याचं ठरेल.

- कुर्दांची साथ सोडल्याने या भागात अमेरिकेविषयीची विश्वासार्हता कमी झालेली आहे. मध्य पूर्वेतल्या सगळ्या देशांसमोर स्वतःला एकमेव शक्तिशाली मध्यस्थ आणि शांतता स्थापन करणारा देश म्हणून सादर करण्याची रशियाला यामुळे संधी मिळाली. सीरिया आणि तुर्कस्थानच्या सीमेवर रशियाची सुरक्षा दलं याआधीपासूनच गस्त घालत आहेत. यातून दिला जाणारा संदेश साफ आहे... या प्रदेशात शांतता हवी असेल तर रशियाशिवाय पर्याय नाही.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा रशियाचे सैनिक

- गेल्या काही वर्षांमध्ये रशियाने पाश्चिमात्य देशांच्या आघाड्या, विशेषतः युरोपियन महासंघ आणि नाटो सदस्य राष्ट्रांमधल्या अंतर्गत वादांचा फायदा घेत, कमकुवत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. टर्की आणि नाटोच्या इतर सदस्य देशांमध्ये सीरियावरून झालेल्या वादाचा फायदा रशियाला होतो, कारण मॉस्कोला नाटोमध्ये फूट पाडायची आहे. रशियन S-400 एअर डिफेन्स सिस्टीम घेतल्याबद्दल अमेरिका टर्कीवर आधीपासूनच नाराज होती.

आंतरराष्ट्रीय दहशतवादाला नेस्तनाबूत करण्याचं आपलं उद्दिष्टं असल्याचं सांगत 2015मध्ये रशियाने सीरियात लष्करी कारवाईला सुरुवात केली होती. पण मध्य-पूर्वेतला रशियाचा दबदबा वाढवण्याचा मोठा हेतू यामागे होता. सीरियाच्या पश्चिम किनारपट्टीवरील तारतुसमधल्या नौदल तळावरून रशिया सगळ्या भूमध्य सागरावर आपला लष्करी वरचष्मा गाजवू शकतो. लटाकियाच्या जवळ रशिया आपला हवाई तळ उभारत असल्याचं वृत्तही काही काळापूर्वी आलं होतं.

सत्तेचं केंद्र बदलतंय?

जागतिक पटलावर रशियाचं सामर्थ्य नेमकं त्यावेळी वाढतंय, जेव्हा पाश्चिमात्य देश हे राजकीय आत्मपरीक्षण करण्यात गर्क आहेत.

प्रतिमा मथळा नकाशा

फ्योदोर लुक्यानोव्ह म्हणतात, "गेल्या काही वर्षांपूर्वीच्या कालावधीपेक्षा सध्या अमेरिका आणि युरोपातले शक्तिशाली देश हे आत्मपरीक्षण करत आहेत. एकेकाळी रशियाला एकटं पाडण्याचा प्रयत्न करणारे रशियाचे विरोधक आज स्वतःच बऱ्यापैकी कचाट्यात सापडलेले आहेत. उलट बाहेरून येणाऱ्या या दबावाला रशियानेच अतिशय चांगल्या रीतीने तोंड देत मध्य-पूर्वेतली स्थिती कौशल्याने हाताळली."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)