अवैध वृक्षतोड थांबवायला गेले आणि त्यांची हत्याच झाली

  • स्टीफन मॅकग्रा
  • रोमेनिया
लेवेंते पीटर

फोटो स्रोत, levente peter

युरोपमध्ये सध्या शिल्लक असलेल्या प्राचीन, जुन्या जंगलांपैकी सर्वाधिक जंगलं रोमेनियात आहेत. या जंगलांमध्ये अस्वलं, कोल्हे, लिंक्स (Lynx) हा मांजराच्या प्रजातीतलाच प्राणी आणि जंगली मांजरं आढळतात.

जंगलात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीच्या माहितीवरून कारवाई करणाऱ्या रेंजर लिव्हिऊ पॉप यांची रोमेनियात गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली. गेल्या महिनाभरातली ही दुसरी रेंजर हत्या आहे.

या दोन हत्यांमुळे युरोपीयन युनियनमधल्या या देशातल्या जंगलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या रेंजर्समध्ये भीतीचं वातावरण आहे.

हे लाकूड चोरण्यासाठी हिंसाचार करण्याचीही अवैधपणे वृक्षतोड करणाऱ्यांची तयारी असल्याने याविषयी भीतीचं वातावरण आहे. युरोपामध्ये कुठेही फर्निचर किंवा कागद तयार करण्यापासून ते बांधकाम साहित्यासाठी या लाकडाचा वापर होऊ शकतो.

रोमेनियाच्या उत्तरेकडील मारामुरसच्या डोंगराळ भागामध्ये अवैधपणे जंगलतोड होत असल्याचं समजल्याने याची शहानिशा करण्यासाठी लिव्हिऊ पॉप गेले होते.

काळजीत पडलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी काही काळ उलटल्याने त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नसल्याचं स्थानिक माध्यमांतल्या बातम्यांमध्ये म्हटलंय. बुधवारी रात्री पोलिसांना या रेंजरचा मृतदेह सापडला.

रेंजर लिव्हिऊ पॉप विवाहीत होते, त्यांना तीन मुलं आहेत. या खुनाचा तपास सुरू असला तरी अजून संशयित कोण आहेत, हे स्पष्ट नसल्याचं या केसचा तपास करणाऱ्या बॉगडन गॅबर यांनी बीबीसीला सांगितलं.

रेंजर पॉप यांची त्यांच्याच बंदुकीने हत्या करण्यात आल्याची शक्यता असल्याचं गॅबर यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

लिविऊ पॉप

गेल्या महिन्यात 50 वर्षांचे रेंजर रॅडुकू गॉर्सिओया यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये आढळला होता. रोमेनियाच्या ईशान्येकडील पास्कनी जंगल भागात जिथे अवैधरीत्या जंगलतोड सुरू होती, त्याच्या जवळच या रेंजरचा मृतदेह सापडला होता.

त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव करण्यात आल्याने गंभीर जखमा झालेल्या होत्या. या प्रकरणी तिघाजणांवर संशय असून त्यापैकी दोघे हे टीनएजर्स आहेत.

'गुंडांकडून मला मारण्याचा प्रयत्न'

या अवैध जंगलतोडीशी संबंधित हिंसाचाराबद्दल गॅब्रिएल पॉन सांगतात, "या जंगल माफियांनी मला मारण्याचा अनेकदा प्रयत्न केलेला आहे."

पॉल हे 'एजंट ग्रीन' या पर्यावरणविषयक गटाचे प्रमुख आहेत. गेली अनेक दशकं ते रोमेनियातल्या जंगलांच्या संरक्षणासाठी काम करत आहेत.

"रोमेनियामधल्या अवैध जंगलतोडीचा तपास करणारे फॉरेस्ट रेंजर्स आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत असल्याने आम्हाला काळजी वाटू लागली आहे. चार वर्षांपूर्वी मी रेटेझॅट नॅशनल पार्कजवळ तपास करत असताना काही गुंडांनी माझ्यावर हल्ला करत मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्या बरगड्या मोडल्या, डोकं फोडलं, हात तोडला. कसाबसा मी तिथून निसटलो," ते सांगतात.

फोटो स्रोत, Agent Green

या प्रकरणी काहीजणांवर संशय असला तरी याचा तपास अत्यंत धीम्यागतीने होतोय. अजूनही याप्रकरणी कोणालाही दोषी ठरवण्यात आलेलं नाही. या महिन्यात या प्रकरणातल्या संशयितांना पहिल्यांदाच कोर्टात हजर व्हावं लागेल.

"या सगळ्या काळात ते मुक्त होते आणि मी माझ्या जिवाची काळजी करत होतो," ते सांगतात.

रोमेनियाची सरकारी कंपनी असणारी 'रोमसिल्व्हा' की फॉरेस्ट मॅनेजमेंट कंपनी देशातल्या एकूण जंगलांपैकी 48 टक्के जंगलांचं व्यवस्थापन पाहते. त्यांनीही या हत्यांचा निषेध केला असून जंगलांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर या 'लाकूड चोरांकडून' हल्ल्यांचं प्रमाण वाढल्याचं म्हटलं आहे.

या वर्षात आतापर्यंत असे 16 हल्ले झाले आहेत.

फोटो स्रोत, George calin

या रेंजर्सना स्वतःचा बचाव करता येत नसून गेल्या काही वर्षांत सहा जणांचा जीव गेल्याचं सिल्वा ट्रेड युनियन फेडरेशनचे प्रमुख सिल्विऊ गिनिआ यांनी म्हटलंय.

जंगल उरली लाकूड पुरवण्यापुरती

रोमेनियातल्या जंगलांची झपाट्याने तोड होतेय. आणि ही जंगलतोड रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खून होत आहेत.

ग्रीनपीस रोमेनियाने केलेल्या संशोधनानुसार दर तासाला रोमेनियात सुमारे तीन हेक्टर जमिनीवरचं जंगल तोडलं जातंय. यामध्ये देशामधल्या अतिप्राचीन जंगलभागांचाही समावेश आहे.

गेल्या महिन्यामध्ये एजंट ग्रीन, क्लायंट अर्थ आणि युरोनेचर या तीन संस्थांनी मिळीन रोमेनियन सरकारच्या विरुद्ध युरोपियन कमिशनकडे तक्रार दाखल केली. युरोपियन युनियनने निसर्ग संवर्धनासाठी ठरवलेल्या नियमांचं सरकारच्या लाकूड तोडीसाठीच्या नियमांमुळे उल्लंघन होत असल्याचं या तक्रारीत म्हटलंय.

"रोमेनियामध्येच आता अतिप्राचीन, इतिहासपूर्व काळातली जंगलं उरली असल्याने अनेक गोष्टी पणाला लागलेल्या आहेत. पण ही जंगलं आता फक्त फर्निचरसाठीचं लाकूड बनून राहिली आहेत," ग्रॅब्रिएल पॉन म्हणतात.

फोटो स्रोत, Agent green

पण ही अवैध जंगलतोड रोखण्यासाठीचे प्रयत्न आपण वाढवल्याचं बुखारेस्ट मधल्या सरकारने म्हटलंय. यासाठी कडक तपासणी करण्या येत असून, पाळत वाढवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.

मारामुरसच्या जंगलामध्ये लिव्हिऊ पॉप यांची हत्या झाल्यानंतर ग्रॅबिएल पॉन यांनी या भागाची तपासणी केली.

"परवानगीपेक्षा कितीतरी जास्त पटीने जंगल तोडण्यात आलेलं आहे. पण मुळात प्रश्न हा आहे की शेवटच्या हिमयुगाच्या नंतर तयार झालेलं हे जुनं जंगल पूर्णपणे काढून टाकायला सरकार परवानगी देतंच कसं?"

पॉन यांचा लाकूडतोड्यांनी पाठलाग करत त्यांना पळवून लावलं. यात त्यांना इजा झाली नसली तरी रोमेनियामध्ये जंगलांचं संरक्षण करणाऱ्यांच्या जिवाला धोका असल्याचं मात्र स्पष्ट झालंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)