पाकिस्तानात गरूड उडत गेलं नि रशियन शास्त्रज्ञांना आलं मोठ्ठं बिल

गरुड

फोटो स्रोत, Getty Images

रशियन शास्त्रज्ञ स्थलांतर करणाऱ्या गरुडांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होते. पण काही गरुड इराण आणि पाकिस्तानमध्ये उडत गेल्यानं त्याचा मोठा आर्थिक फटका रशियाला बसला आहे.

पक्षी स्थलांतरित होत असताना शास्त्रज्ञ SMSद्वारे त्यांचा मागोवा घेतात आणि पक्षी सुरक्षित ठिकाणी पोहोचले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी सॅटेलाईट फोटोंचा वापर करतात. या सिमकार्ड्समधून वेळोवेळी SMS संशोधन केंद्रांना पाठवले जातात, ज्यामुळे पक्षांची ताजी माहिती मिळत असते.

रशियन शास्त्रज्ञ सध्या 13 गरुडांचा मागोवा घेत आहेत. सायबेरिया आणि कझाकस्तानमध्ये गरूड प्रजनन करतात, मात्र हिवाळा सुरू झाला की दक्षिण आशियात स्थलांतरित होतात.

या गरुडांनी दक्षिण रशिया आणि कझाकिस्तानमधून झेप घेतली होती. मात्र यापैकी एक मिन नावाच्या गरुडाचं उड्डाण खूपच महागात पडलं, कारण ते कझाकिस्तानातून इराणमध्ये उडत गेलं.

कझाकिस्तानमध्ये उन्हाळ्यात मिननं काही मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मोबाईल नेटवर्क नसल्यानं शेकडो मेसेज गेले नाहीत आणि तिथेच तुंबून राहिले.

मग हे गरूड उडत थेट इराणमध्ये गेल्यावर त्याच्या सिमकार्डला रेंज आली आणि अनेक मेसेज एकामागोमाग एक पोहोचले.

मात्र हे पक्षी आंतरराष्ट्रीय रोमिंग क्षेत्राबाहेर गेल्यामुळे या रशियन संशोधकांना मोठ्या प्रमाणात रोमिंग शुल्क आकारण्यात आलंय.

ही बाब जेव्हा संबंधित 'मेगाफोन' या रशियन टेलिकॉम कंपनीच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी या सर्व सिमकार्ड्सला स्वस्त स्कीममध्ये रूपांतरित केलं. तरीही या शास्त्रज्ञांच्या टीमनं आता मोबाईलचं हे बिल भरण्यासाठी सोशल मीडियावरून क्राऊड फंडिंगचा पर्याय निवडलाय.

फोटो स्रोत, RRRCN SCREENSHOT

कझाकिस्तानमध्ये एका SMSची किंमत 15 रुबल्स (म्हणजेच 16-17 रुपये) आहे, तर इराणमध्ये 49 रुबल्स (म्हणजे साधारण 54-55 रुपये) इतकी आहे.

सर्व गरुडांच्या मागोव्यासाठी रशियन शास्त्रज्ञांना देण्यात आलेली रक्कम एकट्या मिन गरुडांनं संपवून टाकली.

रशियन शास्त्रज्ञ वाईल्ड अॅनिमल रिहॅबिलेशन सेंटरशी जोडलेले आहेत. त्यांच्या "Top up the eagle's mobile" या लोकवर्गणीच्या आवाहनानं एक लाख रुबल्स देण्यात आले आहेत.

स्टेप गरूड या प्रजातीला रशिया आण मध्य आशियामधील विजेच्या तारांचा विशेष धोका असतो.

RIA नोवोस्ती न्यूजनुसार, मेगाफोन कंपनीनं रशियन शास्त्रज्ञांच्या टीमची बिलं माफ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या शास्त्रज्ञांना गरुडांचा मागोवा घेण्याचं काम पुढे चालू ठेवता येणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)