पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळ्यांसाठी आपण तयार आहोत का?

महिला, पुरुष, प्रजोत्पादन, गरोदर, गर्भनिरोध

फोटो स्रोत, Getty Images

पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्या तयार करण्याचं काम शास्त्रज्ञ अर्ध्या शतकहून अधिक काळ करत आहेत. यासंदर्भात सकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्या, मात्र त्याचं पुढे फार काही होऊ शकलं नाही.

अर्थसहाय्याची कमतरता आणि पुरुष मंडळींची गृहित धरलेली नाखुशी यामुळे पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्यांची घाऊक प्रमाणावर निर्मितीच झालेली नाही.

गरोदर व्हायचं नाही याची जबाबदारी महिलांवर टाकली जाते. मात्र एका सर्वेक्षणानुसार, गर्भनिरोधक गोळी उपलब्ध असेल तर अनेक पुरुषांनी ती घेतली असती.

युकेतील काही पुरुषांचं यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आलं. लैंगिकदृष्ट्या सक्रिय अशा एक तृतीयांश पुरुषांनी अशा स्वरुपाची गोळी वापरायला हरकत नसल्याचं सांगितलं. युकेत सध्या एवढ्याच प्रमाणातील महिला अशा गोळ्यांचं सेवन करत आहेत.

गर्भनिरोध ही फक्त महिलेची नाही तर पुरुष आणि महिला अशा दोघांची एकत्रित जबाबदारी असायला हवी असं सर्वेक्षणातील दहापैकी आठ जणांनी सांगितलं.

दरम्यान अमेरिकेतील 18-44 वयोगटातील सेक्शुअल अॅक्टिव्ह असणाऱ्या 77 टक्के पुरुषांनी कंडोम किंवा नसबंदीपेक्षा अशा प्रकारच्या गोळ्या घेण्याला थोडाफारच प्रतिसाद दिला आहे.

पुरुषांनी गर्भनिरोधक गोळ्या घेणं पुरुषांनी स्वीकारलं तर अशा गोळ्या खरंच उपलब्ध शकतात का?

कोणत्या गर्भनिरोधक गोळ्या जगात वापरल्या जातात?

प्रजोत्पादनक्षम वयात असणारी एक तृतीयांश जोडपी कोणत्याही स्वरुपाच्या गर्भनिरोधक गोळ्या वापरत नसल्याचं संयुक्त राष्ट्राच्या एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

मात्र जेव्हा वापर होतो तेव्हा महिला गर्भनिरोधक गोळ्या वापरतात असंच चित्र आहे.

लग्न झालेल्या किंवा नातेसंबंधात असलेल्या 19 टक्के महिलांपैकी 14 टक्के कॉईल, 9 टक्के गर्भनिरोधक गोळ्यांचा तर 5 टक्के इंजेक्शनचा वापर करतात.

गर्भनिरोधक गोळ्या आणि पुरुष हे प्रमाण नगण्य म्हणण्याइतकं आहे. 8 टक्के पुरुष कंडोमचा वापर करतात तर 2 टक्के नसबंदी करून घेतात.

मात्र हे सगळ्याच बाबतीत खरं नाही.

गोळी उपलब्ध होण्यापूर्वी, पुरुषांना कंडोम वापरून गर्भनिरोध करावा लागत असे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत का?

1960च्या दशकात महिलांसाठी गर्भनिरोधक गोळ्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हायला सुरुवात झाली. तेव्हा पहिल्यांदा, साथीदाराशिवाय किंवा त्याला माहिती न देता स्त्रिया गर्भधारणेवर नियंत्रण ठेऊ लागल्या.

सध्याच्या घडीला जगभरात 100 दशलक्ष महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात. युरोप, ऑस्ट्रेलिया तसंच न्यूझीलंडमध्ये गर्भधारणा टाळण्यासाठीचा हा प्रचलित पर्याय आहे. आफ्रिका, लॅटिन अमेरिका, उत्तर अमेरिकेत दुसऱ्या क्रमांकाचा तर आशिया खंडात तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे.

या गोळीमुळे अनेक स्त्रियांना सक्तीच्या गर्भधारणेपासून मुक्ती मिळाली आहे. उच्च शिक्षण तसंच रोजगार या कारणांसाठी त्यांना गर्भधारणा पुढे ढकलायची असेल तर तशी संधी त्यांना मिळाली.

महिलांच्या हक्कांसाठीच्या लढ्यात हा गोळा महत्वपूर्ण टप्पा मानला जातो. विसाव्या शतकातील क्रांतिकारी शोधांमध्ये या गोळ्यांचा समावेश होतो.

लिंगसमानतेच्या दृष्टीने विविध समाज वाटचाल करत असतानाही, गर्भनिरोधासंदर्भातील भावनिक, सामाजिक, आर्थिक स्वरुपाच्या दडपणाचा महिलांनाच सामना करावा लागतो.

अजूनही पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी का नाही?

महिलांसाठी गर्भनिरोधक गोळ्या तयार झाल्यानंतरही त्या सर्वत्र मिळू लागण्यास दशकभराचा काळ जावा लागला. 1970 च्या दशकात पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्यांची चाचणी घेण्यात आली. मात्र त्या अद्यापही विक्रीस उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.

महिलांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्या तयार करण्याचं शास्त्र पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या तयार करण्याच्या तुलनेत गुंतागुंतीचं असल्याचं काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

पुरुषांच्या गर्भनिरोधकाच्या गोळ्या वीर्य उत्पादन थांबवण्याचं काम करतात. मात्र असं करण्यासाठी ज्या संप्रेरकांवर नियंत्रण मिळवलं जातं, त्याचे दुष्परिणाम आहेत. त्याच्याशी आर्थिक आणि सामाजिक घटकही निगडीत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या तयार झालेल्या नाहीत

प्रजोत्पादन क्षेत्राशी संदर्भात शोध, तंत्रज्ञान, औषधं, चाचण्या या सगळ्याचा केंद्रबिंदू महिलाच असतात. या प्रक्रियेत पुरुषांकडे दुर्लक्ष होतं.

उदाहरणार्थ गायनॅकॉलिजी ही वैद्यकीय शास्त्राची शाखा नेमकं काय काम करते हे बहुतांश लोकांना ठाऊक असते. मात्र पुरुषांच्या प्रजोत्पादनासंदर्भात काम करणारी अँड्रॉलॉजी नावाची शाखा असते हे अनेकांना ठाऊक नाही.

महिलांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्या तयार करायला सुरुवात झाल्यानंतर अनेक वर्षांनी पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. आर्थिक मदतीची वानवा हे त्याचं प्रमुख कारण आहे.

फार्मा कंपन्या, नियंत्रक आणि पुरुष यांना या गोळ्यांचे दुष्परिणाम ठाऊक असल्याने या गोळ्यांची निर्मिती करण्यावर भर देण्यात आलेला नाही.

महिलांच्या गर्भनिरोधक औषधांमध्ये काही लक्षणं अपेक्षित असतात. गरोदर होण्याच्या पार्श्वभूमीवर ही औषधं घेतली जातात. डील ब्रेकर्स म्हणून या औषधांकडे पाहिलं जातं.

महिलांच्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वजन वाढणं, मूड स्विंग, कामेच्छा कमी होणं असे दुष्परिणाम जाणवतात. ही औषधं कमकुवत करतात असंही समजलं जातं.

वीर्यविरहित संभोग घडवून आणणाऱ्या 'क्लीन शिट्स' गोळीवरील संशोधनानुसार, पुरुषांच्या गर्भनिरोधकांमध्ये वीर्यविरहित संभोग होत असल्यानंच त्याचा वापर होत नसल्याचं म्हटलं आहे. कारण वीर्यस्खलन हा पुरुषांच्या लैंगिकतेचा महत्त्वाचा भाग मानला जातो.

गर्भनिरोधक वापरणाऱ्या पुरूषांवर महिला विश्वास ठेवत नाहीत. मात्र, संशोधनात असं आढळलंय की, खूप वर्षांपासूनचे नातेसंबंध असतील तर महिला जोडीदारावर विश्वास ठेवतात. मात्र, अचानक संबंध असल्यास गर्भनिरोधक वापरणाऱ्या पुरुषावर त्या विश्वास ठेवत नाहीत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)