चिली: राष्ट्राध्यक्ष बॅस्टियन पिनइरा यांनी केलं मंत्रिमंडळ बरखास्त

चिली, लॅटिन अमेरिका Image copyright AFP
प्रतिमा मथळा चिलीत आंदोलनं, मोर्चे सुरू आहेत.

चिलीचे राष्ट्राध्यक्ष सेबॅस्टियन पिनइरा यांनी कॅबिनेट बरखास्तीचा आदेश दिला आहे. त्यांनी नवं सरकार स्थापनेचे आदेशही दिले आहेत.

सामाजिक सुधारणा करण्यासंदर्भात त्यांनी घोषणा केली. सामाजिक सुधारणांच्या मागणीसाठी चिलीत प्रचंड आंदोलन धुमसतं आहे.

'रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या मागण्या मी ऐकल्या आहेत. आम्ही एका नव्या परिस्थितीला सामोरे जात आहोत. एका आठवड्यापूर्वी चिली हा देश आणि आताचा चिली देश यामध्ये फरक आहे', असं पिनइरा यांनी सांगितलं.

चिलीच्या अनेक शहरांमध्ये लागू करण्यात आलेला कर्फ्यू हटवण्यात आल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

सुधारणांची मागणी करत चिलीची राजधानी सँटियागो शहरात 10 लाख लोक शुक्रवारी रस्त्यावर उतरले होते. सरकारने असमानतेच्या मुद्याकडे लक्ष द्यावं असं मोर्चात सहभागी नागरिकांचं म्हणणं होतं.

मोर्चेकऱ्यांनी अनेक किलोमीटर चालत घोषणाबाजी केली. त्यांनी झेंड्यांच्या तसंच विविध भांड्याचा दणदणाट करत आपल्या मागण्या मांडल्या.

हा ऐतिहासिक क्षण असल्याचं सँटियागोच्या गर्व्हनर यांनी म्हटलं होतं. गेले काही दिवस सातत्याने मोर्चे निघत आहेत.

आपण सगळे बदलत आहोत. आपला देश अधिक एकत्र पद्धतीने एकत्र यावा यासाठी चिलीच्या नागरिकांनी शांततामय आणि खेळीमेळीच्या वातावरणात मोर्चा काढला. यामुळे चांगल्या भवितव्यासाठी पाया रचला गेला आहे असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

शुक्रवारी राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांना काँग्रेस बिल्डिंगमधून बंदोबस्तात बाहेर यावं लागलं. कारण सरकारविरोधी आंदोलकांनी त्यांचा मार्ग रोखला होता.

मोर्चात काय झालं?

दहा लाख लोक म्हणजे चिलीच्या लोकसंख्येच्या पाच टक्के अधिक प्रमाणात नागरिक शनिवारी निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्याचं सँटियागोचे गव्हर्नर कार्ला रुबिलार यांनी सांगितलं.

आंदोलकांनी नव्या चिलीचं स्वप्न जपलं आहे असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा चिलीत वातावरण पेटलं आहे.

आंदोलकांनी चिलीतील सर्व प्रमुख शहरांमध्ये मोर्चा काढला.

न्याय, खरेपणा तसंच पारदर्शक आणि नीतीमूल्याचं सरकार अशा आमच्या मागण्या असल्याचं 38 वर्षीय फ्रान्सिस्को अँनगिटार यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

राष्ट्राध्यक्ष पिनइरा यांनी राजीनामा द्यावा असं अनेक आंदोलकांचं म्हणणं आहे.

मोर्चाची पार्श्वभूमी काय?

मेट्रोच्या दरात वाढ केल्यामुळे आंदोलनाची ठिणगी पडली. त्यानंतर मेट्रोच्या वाढीव दरांना स्थगिती देण्यात आली. सुरुवातीला मेट्रोच्या दरांभोवती केंद्रित मोर्च्यांची कारणं बदलली. महागाई आणि असमानतेविरोधात ही निदर्शनं झाली.

आंदोलनाच्या काळात लूटमार आणि जाळपोळीचे प्रकारही घडले.

आठवडाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडोजण जखमी झाले आहेत. 7,000 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा सँटियागो शहराला लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे.

चिलीच्या लष्कराने सँटियागो शहराचं नियंत्रण ताब्यात घेतलं आहे. शहरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस कर्फ्यू लागू करण्यात येतो. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात असावी यासाठी 20,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

लॅटिन अमेरिकेतल्या सधन देशांपैकी चिली एक आहे. मात्र चिलीत मोठ्या प्रमाणावर असमानता आहे. OECD अर्थात ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट या संघटनेशी संलग्न 36 देशांमध्ये चिलीत असमानतेचं प्रमाण सर्वाधिक आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा चिलीचे राष्ट्राध्यक्ष पिनइरा

राष्ट्राध्यक्ष पिनइरा यांनी बुधवारी काही सुधारणांची घोषणा केली जेणेकरून मोर्चे थांबतील. पेन्शनची रक्कम वाढवावी, किमान वेतनात वाढ यासंदर्भात बदल करण्यात आले. मात्र या सुधारणांच्या घोषणेचा मोर्चेकऱ्यांवर काहीच परिणाम झाला नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)