अबू बक्र अल बगदादीः 15 मिनिटांची मोहीम ज्यात बगदादीचा झाला मृत्यू

अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसनी टाकलेल्या एका छाप्यात इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादीचा मृत्यू झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रविवारी स्पष्ट केलं.

अमेरिकेनं ही मोहीम कोठे केली?

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, वायव्य सीरियामध्ये अमेरिकन स्पेशल फोर्सेसनी केलेल्या एका मोहिमेत जगातल्या एक नंबरच्या दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी संध्याकाळी पाच वाजता स्पेशल फोर्सला घेऊन काही हेलकॉप्टर्स एका अज्ञात स्थळी जाण्यासाठी वॉशिंग्टनवरून रवाना झाली.

त्यावेळेस ट्रंप व्हाईट हाऊसच्या सिच्युएशन रुममध्ये इतर महत्त्वाच्या नेत्यांबरोबर होते.

रविवारी सीरियाच्या इदलिब प्रांतातील बारिशा गावाला स्पेशल फोर्सेसनी आपलं लक्ष्य बनवल्याचं अधिकाऱ्यांनी अमेरिकन माध्यमांना सांगितलं. हे गाव तुर्कस्थानच्या दक्षिण सीमेपासून केवळ 5 किमी दूर आहे.

व्हीडिओ कॅप्शन,

बगदादीला संपवण्याची मोहीम अमेरिकेनं कशी पार पाडली?

इदलिब प्रांत हा सीरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधकांचा अखेरचा बालेकिल्ला होता. जिहादी संघटनांचा ते केंद्र होतं. इथं इस्लामिक स्टेटचे शेकडो तरूण राहात असूनही या संघटना आणि इस्लामिक स्टेट यांच्यात हिंसक भांडणं होत असे. या प्रदेशात सीरियन सेना रशियाच्या मदतीने पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस तैनात आहे.

कसा टाकला छापा?

अमेरिकन गुप्तचर संस्था बगदादीचा आधीपासूनच पाठलाग करत होते आणि बगदादी जिथं लपला आहे तिथं अनेक भुयारं असल्याचं त्यांना माहिती होतं. यातल्या बहुतेक भुयारांतून बाहेर पडण्याचं दुसरं कोणतंही तोंड नव्हतं. या मोहिमेसाठी ट्रंप यांनी स्पेशल फोर्सेसच्या मोठ्या चमूला यात सहभागी करून घेतलं होतं. यामध्ये आठ हेलकॉप्टर्स, अनेक जहाजं आणि विमानं यांचा समावेश होता.

अमेरिकन हेलकॉप्टर तुर्कस्थानावरूनच गेली. तसेच ज्या प्रदेशातवर सीरिया आणि रशियन सैन्याचं नियंत्रण आहे अशा प्रदेशातून ती गेली. अमेरिकन स्पेशल फोर्सच्या मोहिमेबद्दल रशियाला माहिती नव्हतं तरीही त्यांनी हेलिकॉप्टरला परवानगी दिली असं ट्रंप यांन सांगितलं तसेच रशियानं मदत केल्याचंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, OMAR HAJ KADOUR

ट्रंप म्हणाले, ही उड्डाणं अत्यंत धोकादायक प्रदेशात घुसली आणि त्यातून बाहेरही पडली. आग लागण्याचाही धोका होताच त्यामुळे वेग कमी करायला लागायचा तर वेग भरपूर वाढवावा लागायचा. हेलिकॉप्टर्स बगदादच्या जवळ जाताच गोळीबार सुरू झाला. परंतु त्यातून बाहेर पडायला आम्हाला फारसा वेळ लागला नाही.

बारिशा गावातल्या एका व्यक्तीनं बीबीसीशी बोलताना सांगितलं, जमिनीवर उतरण्याआधी हेलिकॉप्टरमधून 30 मिनिटे गोळीबार झाला. या हेलिकॉप्टरनी दोन घरांवर मिसाईलही टाकण्यात आली. त्यात एक घर पूर्णपणे बेचिराख झालं.

ट्रंप म्हणाले, बारिशा गावात पहिल्यांदा एक हेलिकॉप्टर उतरलं. त्यानंतर अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसचे जवान उतरले. त्यांनी घराच्या भिंतींमध्ये भगदाडं पाडली.

यानंतर त्या घरामध्ये ऑपरेशन सुरू झालं. त्यामुळे बगदादी भुयाराच्या दिशेने पळून गेला. त्या भुयाराला एक्झिट नव्हती. यावेळेस बगदादी रडत होता. दयेची याचना करत होता असंही ते ट्रंप यांनी सांगितलं.

"सर्वांत आधी त्या घराचा परिसर रिकामा करण्यात आला. एकतर लोक शरण आले किंवा मारले गेले. 11 मुलांना बाहेर काढण्यात आलं. भुयारात एकटाच बगदादी होता. तो आपल्या तीन मुलांना घेऊन पळत होता. त्यांचाही मृत्यू झाला.

"भुयाराच्या दुसऱ्या टोकापर्यंत तो पोहोचला. आमचे प्रशिक्षित कुत्रे त्याचा पाठलाग करत होते. शेवटी तो खाली पडला आणि त्यानं कंबरेला बांधलेल्या स्फोटकांनी स्वतःला आणि तिन्ही मुलांना उडवलं. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. त्या स्फोटानं भुयारही उद्ध्वस्त झालं," ट्रंप म्हणाले.

या परिसराच्या फोटोंमध्ये आणि व्हीडिओमध्ये भिंतीना पडलेली भोकं आणि जळालेल्या वस्तू दिसून येतात.

बगदादीच्या मृत्यूवर अमेरिकेला इतकी खात्री कशी?

ट्रंप म्हणाले, ज्या व्यक्तीनं स्वतःला उडवलं त्याच्या शरीराच्या तुकड्यांची तात्काळ तपासणी करण्यात आली तेव्हाच ती व्यक्ती बगदादी असल्याचं समजलं.

15 मिनिटांमध्येच बगदादीचा मृत्यू झाला. स्पेशल फोर्सेसमध्ये डीएनए तपासणी करणारे तज्ज्ञही होते. त्यांनी बगदादीच्या डीएनएची तपासणी करून तो बगदादीच असल्याचं ते म्हणाले. काही शरीराचे तुकडे डीएनए तज्ज्ञांनी आणल्याचेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेच्या सैन्याचं काय नुकसान झालं?

या मोहिमेत अमेरिकन सैन्याचं काहीही नुकसान झालेलं नाही. परंतु बगदादीचे अनेक लोक याच मृत्युमुखी पडले आहेत. मारल्या गेलेल्या लोकांत बगदादीच्या दोन्ही पत्नी मृत्युमुखी पडल्या. दोन्ही महिलांनी आपल्या अंगावर स्फोटकं बांधली होती. मात्र ती बगदादीचा पाठलाग करणारा कुत्रा जखमी झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)