बगदादीच्या मृत्यूनंतर आयसिसचाही खात्मा होणार?-दृष्टिकोन

बगदादी, अमेरिका, सीरिया, टर्की Image copyright AFP
प्रतिमा मथळा अबु बकर बगदादीला अमेरिकेनं मारलं आहे.

इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबु बक्र अल् बगदादीच्या मृत्यूनंतर अमेरिका आणि पर्यायाने जगाच्या राजकारणाला नवा आयाम मिळू शकतो. या मोहिमेनंतर जगभरात कट्टरतावाद कमी होण्याची शक्यता आहे. याबरोबरच सीरियासारख्या युद्धग्रस्त देशांमधली परिस्थिती सुधारण्याचीही चिन्हं आहेत.

बीबीसी प्रतिनिधी दिलनवाझ पाशा यांनी या घटनेचे कंगोरे समजून घेण्यासाठी डेलावेयर विद्यापीठाचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घटनांचे विश्लेषक मुक्तदर खान यांच्याशी चर्चा केली.

मुक्तदर खान यांचा दृष्टिकोन

बगदादी नेमका कुठे आहे याची माहिती अमेरिकेला काही आठवड्यांपूर्वी मिळाली हे नशीबच म्हणायला हवं. बगदादी इराकमधून निघून सीरियातील इडलिब प्रांतात लपून बसल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली होती.

बगदादीला मारण्याची मोहीम फत्ते झाल्यानं डोनाल्ड ट्रंप आणि अमेरिका दोघांनाही अनेक डावपेचात्मक आणि राजकीय फायदे होणार आहेत.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांच्या सीरियाबद्दलच्या धोरणांवर सातत्याने टीका होत आहे. ही टीका केवळ डेमोक्रॅट्स नव्हे तर रिपब्लिक पक्षाचे नेतेही करत आहेत.

सीरियातून अमेरिकेच्या लष्कराला परत बोलावण्याच्या निर्णयाचं जाहीर विश्लेषण ट्रंप यांचे निकटवर्तीय नेतेही करत आहेत. बगदादी यांचा खात्मा झाल्याने दोन्ही गट आता शांत होण्याची शक्यता आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप

आयसिसचा म्होरक्या मारला गेल्यानं आणि ज्या पद्धतीने त्याला मारण्यात आलं ते लक्षात घेता आयसिसच्या घडामोडी थंडावण्याची चिन्हं आहेत. नवीन भरतीवर परिणाण होण्याची शक्यता आहे. कट्टरतावादाच्या प्रसारावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

आयसिसला या परिस्थितीतून बाहेर पडून सावरण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

आयसिसचा पुढचा मार्ग सोपा नाही

उत्तर-पश्चिम सीरियात टर्कीकडून झालेल्या हल्ल्यांमुळे आयसिसला फायदा होऊ लागला होता. आयसिसचे अनेक सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांची सुटका झाली. कारण कुर्द लोकांची ऊर्जा टर्कीचा सामना करण्यातच खर्च होऊ लागली.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा आयसिससाठी पुढची वाटचाल सोपी असणार नाही

अशा परिस्थितीत तज्ज्ञांना असं वाटतं होतं, की अमेरिकेचं सैन्य सीरियातून परत जाणं आणि सीरियात टर्कीने केलेले हल्ले यामुळे आयसिसला पुन्हा आपल्या जमिनीवर दावा करण्याची संधी होती, विशेषत: सीरियामध्ये.

दुसरीकडे इराकमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे इराणचं या घडामोडींमधलं लक्ष कमी झालं होतं. अशावेळी आयसिसला पुन्हा आपल्या प्रदेशात पाय रोवण्याची सर्वोत्तम संधी होती. मात्र बगदादी मारला गेल्याने आता आयसिसला असं करणं सोपं नाही.

ओसामा बिन लादेन याच्यानंतर काही वर्षांनी बगदादी मारला जाणं हे दहशतवादाविरुद्धच्या लढाईचं मोठं यश म्हणावं लागेल. मात्र ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल् कायदा आणि दहशतवाद- दोन्ही नामशेष झालेलं नाही याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे बगदादीला मारल्यानंतर दहशतवादाचा बीमोड झाला असं होणार नाही.

बगदादीच्या मृत्यूनंतर सीरियातली परिस्थिती सुधारेल?

टर्कीला अजूनही सीरियामध्ये 'बफर झोन' तयार करायचा आहे. या प्रदेशात सीरियाचं लष्कर असणार नाही आणि कुर्द बंडखोरांचंही नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सीरियताला संघर्ष सुरूच राहील

हा प्रदेश कुर्दांसाठी ठीक नाही. मात्र, अरब लोकांसाठी चांगला आहे, असं टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैयप्प अर्दोआन यांनी म्हटलं होतं.

सीरियाचा तो भाग टर्कीने तयार केलेल्या सीरियन अरब मिलिशियाच्या ताब्यात असावा असं अर्दोआन यांना वाटतं आहे.

दुसरीकडे सीरियाच्या काही भागावर रशियाचा प्रभाव आहे. रशियाच्या मदतीने तो भाग आपल्या ताब्यात परत मिळवण्याचा सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल् असाद यांचा प्रयत्न आहे.

सीरियावर वर्चस्व गाजवण्याची विविध देशांमधली शर्यत इतक्यात संपणारी नाही. त्यामुळे सीरियात नजिकच्या भविष्यात शांतता प्रस्थापित होण्याची चिन्हं नाहीत.

मात्र आयसिसला सीरियात पुन्हा जम बसवणं अवघड असेल. कारण त्यांच्या म्होरक्याचा खात्मा अमेरिकेने केला आहे. सीरियात वेगवान घडामोडी घडतात. उदाहरणार्थ- एक वेळ अशी होती, की सीरियात अल् कायदाचे गट होते. नुसरा नावाचा गट होता. तो अप्रत्यक्षपणे अमेरिकेच्या साथीने आयसिसला टक्कर देत होता. एक वेळ अशीही होती, की अल् कायदा आणि अमेरिका एकमेकांशी लढत होते.

आयसिसचा अंमल कमी झाल्यानंतर सीरियात अन्य संघटना, गट गतिशील होण्याची शक्यता प्रबळ आहे. ते सीरियन लष्कराशी संलग्न होऊ शकतात. ते सीरियाच्या अरब सैन्याला देऊ शकतात जे टर्कीशी संधान बांधून आहेत. आयसिसच्या तुलनेत नव्या संघटनांना पर्याय अधिक आहेत. आयसिससाठी काम करणाऱ्यांना याच संघटनेसाठी काम करत राहायचं का दुसऱ्या संघटनेत सामील व्हायचं याचा निर्णय घेण्याची ही वेळ आहे. कारण आयसिसप्रमाणे अन्य सक्रिय गट तसंच संघटना त्यांच्यासाठी काम करणाऱ्यांना पगार देतात.

बगदादीच्या मृत्यूची वेळ अमेरिकेसाठी किती महत्त्वाची?

जेवढं मला कळतं, त्यानुसार बगदादीचा ठावठिकाणी सापडण्याची ही वेळ अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण गेल्या दोन आठवड्यांपासून वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र किंवा रेडिओ प्रत्येक ठिकाणी सीरियाप्रकरणी ट्रंप यांच्या धोरणांवर टीका केली जात होती.

विशेष म्हणजे, टीकाकारांमध्ये काहीजण ट्रंप यांचे निकटवर्तीय होते. असंही म्हटलं जाऊ लागलं होतं, की अमेरिकेवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. अमेरिका कधीही आपल्या सहकाऱ्यांना सोडून जाऊ शकते. सीरिया ट्रंप यांच्या हातून निसटत चालल्याचंही बोललं जाऊ लागलं होतं. मात्र, बगदादीच्या मृत्यूनंतर या सर्व गोष्टी बदलतील.

Image copyright Getty Images

मात्र, बगदादीच्या मृत्यू हा ट्रंप यांच्यासाठी दिलासा नक्कीच आहे. मध्य पूर्वेमध्ये आपणच ताकदवान असल्याचंही ते सांगू शकतात. मात्र, या गोष्टीच्या दुसऱ्या बाजूला दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही.

इस्लामिक स्टेटच्या सदस्यांना जर असं वाटू लागलं, की सीरिया आणि इराकमध्ये त्यांचं भवितव्य अनिश्चित आहे तर ते दुसऱ्या ठिकाणी जातील. जसं 2018 साली इस्लामिक स्टेटपासून वेगळे होत अनेकजण आफ्रिकेला गेले. त्यातील काही जणांनी तेथे बोको हरामशी जोडून घेतले, तर काहीजणांनी अफगाणिस्तानात शरणागती पत्कारली. अफगाणिस्तानात तर ते इतके ताकदवान बनले, की तालिबान सुद्धा त्यांना नियंत्रित करण्याचा विश्वास देऊ शकली नाही आणि त्यामुळं तिथून आजवर अमेरिकन सैन्य हटलं नाहीये.

इस्लामिक संघटना फुटली, तरी तिचे सदस्य वेगवेगळ्या देशातल्या कट्टरतावादी संघटनांशी जोडले जातील, असं यावरून दिसून येतं.

त्रिनिदादमध्ये शेकडोंच्या संख्येत तरूण इस्लामिक स्टेटचं प्रशिक्षण घेण्यास गेले होते आणि ते परतणार असल्याचंही म्हटलं जातंय. हा नक्कीच काळजीचा विषय आहे.

इस्लामिक संघटनेचे सदस्य जर परत आले आणि इतर कुठल्याही कामात गुंतले नाहीत तर ते देश आणि समाजाला विघातक ठरू शकतात.

सीरियात सध्या शांततेची आशा आहे का?

नाही. शांतता अशी नसेल. कारण गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये कट्टरतावाद्यांच्या कारवाया होत आहेत. त्यामध्ये इस्लामिक स्टेटचं काही घेणं-देणं नव्हतं. तिथे सध्या कुर्दांची भीती आहे.

Image copyright AFP

सीरियामध्ये प्रशासन पूर्ण प्रयत्न करेल, की सीरियाचा पूर्ण भाग त्यांच्या अधिकार क्षेत्रात यावा. याशिवाय, याला तिसरी बाजूही आहे. अमेरिका आपली सोबत सोडणार नाही ना, यावरून इस्राईलला काळजी वाटू शकते. त्यामुळे इस्त्राईलची भूमिकाही महत्त्वाची असेल.

मात्र एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्यायला हवी, की कट्टरतावादी संघटनांमध्ये आतापर्यंत जशी भरती होत असे, त्यावर लगाम लागेल.

इस्लामिक स्टेटकडे तरूणांचा ओढा वाढला होता. मात्र, बगदादीच्या मृत्यूनंतर या संघटनेतील भरती कमी होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)