अबु बक्र अल् बगदादी : इस्लामचा अभ्यासक ते IS चा म्होरक्या

अबु बगदादी

फोटो स्रोत, AFP

जिहादी संघटना इस्लामिक स्टेटचा म्होरक्या आणि जगातील 'मोस्ट वाँटेड' अशी ओळख असलेला अबु बक्र अल्-बगदादीनं स्वतःला संपवलं आहे.

वायव्य सीरियामध्ये शनिवारी (26 ऑक्टोबर) रात्री अमेरिकन सैन्यानं केलेल्या कारवाईदरम्यान बगदादीनं स्वतःला आत्मघातकी जॅकेच्या स्फोटानं उडवल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं.

स्वतःला 'खलिफा इब्राहिम' असं संबोधणाऱ्या बगदादीवर 25 दशलक्ष डॉलर्सचं इनाम होतं. पाच वर्षांपूर्वी इस्लामिक स्टेटचा उदय झाल्यापासून अमेरिका आणि मित्र राष्ट्र बगदादीचा शोध घेत होते.

पश्चिम सीरिया ते पूर्व इराकपर्यंतचा 88 हजार स्क्वेअर किलोमीटरचा टापू इस्लामिक स्टेटनं आपल्या नियंत्रणाखाली आणला होता. 80 लाख लोकांवर इस्लामिक स्टेटची सत्ता होती. तेलविहीरी, खंडणी आणि अपहरणातून या संघटनेनं अब्जावधी डॉलर्सचा निधी उभा केला होता.

इस्लामिक स्टेटची ही 'सत्ता' आणि त्यांच्या म्होरक्याला जरी संपविण्यात आलं असलं तरी ही संघटना आजही तितकीच शिस्तबद्ध आणि लढवय्यी आहे. त्यामुळे त्यांचा हा पराभव तात्पुरता आहे की इस्लामिक स्टेटचा बीमोड झालाय, हे सांगता येणं कठीण आहे.

इस्लामचा पालनकर्ता

बगदादीचं खरं नाव हे इब्राहिम अव्वाद इब्राहिम अल-बद्री असं होतं. त्याचा जन्म 1971 साली मध्य इराकमधील सामरा शहरात एका अत्यंत धार्मिक अशा सुन्नी अरब कुटुंबात झाला होता.

आपण प्रेषित मोहम्मद यांच्या जमातीतील आहोत असा बगदादीच्या कुटुंबीयांचा दावा होता. खलिफा म्हणून स्वतःला घोषित करण्यासाठी नव-आधुनिक सुन्नी अभ्यासकांकडून ही गोष्ट अतिशय महत्त्वाची मानली जाते.

फोटो स्रोत, AFP

तरुण बगदादीला त्याचे नातेवाईक 'आस्तिक' किंवा 'श्रद्धाळू' म्हणूनच ओळखायचे. कारण त्याचा बराचसा वेळ हा मशिदीमध्ये कुराणचं पठन करण्यातच जायचा. जे लोक इस्लामिक कायदा किंवा शरियाचं पालन करण्यात कसूर करायचे, त्यांची तो खरडपट्टी काढायचा.

90 च्या दशकाच्या सुरुवातीला बगदादीनं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि तो इराकची राजधानी बगदादला पोहोचला. इस्लामिक स्टडीजमध्ये त्यानं पदव्युत्तर पदवी घेतली आणि नंतर इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ बगदादमधून पीएचडीही पूर्ण केली. बगदादीच्या समर्थकांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या चरित्रात ही माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थीदशेत तो बगदादच्या वायव्येकडील तोबची जिल्ह्यातील एका सुन्नी मशिदीत रहायचा. त्यावेळी तो अतिशय शांतपणे, एकटाच रहायचा. जेव्हा कुराण शिकवायचा आणि मशिदीच्या क्लबसाठी फुटबॉल खेळायचा, तेव्हा मात्र तो खुलायचा. याच काळात बगदादी सलाफी पंथ आणि जिहादी विचारधारेकडे ओढला गेल्याचं मानलं जातं.

'जिहादची पाठशाळा'

2003 साली अमेरिकन फौजांनी इराकमध्ये घुसून सद्दाम हुसैनची राजवट उलथून लावली त्याकाळात इस्लामी बंडखोरांची एक संघटना स्थापन करण्यात बगदादीही सहभागी होता. जमात जैश अहल अल् सुन्नाह वा-ए-जमाह असं या संघटनेचं नाव होतं.

अमेरिका किंवा तिच्या मित्र राष्ट्रांच्या सैन्यावर हल्ला करण्याच्या उद्देशानं या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. या संघटनेमध्ये बगदादी हा शरिया समितीचा प्रमुख होता.

2004 च्या सुरूवातीला अमेरिकन लष्करानं बगदादीला फालुजा शहरामध्ये ताब्यात घेतलं होतं. त्याला कँप बुका इथल्या तुरुंगात ठेवण्यात आलं.

फोटो स्रोत, AFP

कँप बुकातला तुरूंगातच इस्लामिक स्टेटचे अनेक नेते 'तयार' झाले. या तुरूंगातच त्यांचं नेटवर्क तयार व्हायला सुरूवात झाली.

बगदादी इथं प्रार्थना घ्यायचा, प्रवचनं द्यायचा आणि धार्मिक बाबींवरही भाष्य करायचा. तुरुंगातील कैद्यांमध्ये काही समस्या निर्माण झाल्या तर तुरुंग अधिकारी मध्यस्थीसाठी बगदादीला बोलवायचे.

'आम्ही 2004 साली ताब्यात घेतलं तेव्हा तो केवळ एक भुरटा चोर होता,' असं पेंटॅगॉनमधील एका अधिकाऱ्यानं 2014 साली न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. "हाच माणूस भविष्यात इस्लामिक स्टेटचा म्होरक्या होईल, याची आम्हाला जराही कल्पना आली नाही," असं या अधिकाऱ्यानं म्हटलं.

इराकमध्ये अल्-कायदाचं पुनरूज्जीवन

कँप बुका सोडल्यानंतर बगदादी इराकमध्ये नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या अल् कायदाच्या संपर्कात आल्याचं मानलं जातं.

जॉर्डनच्या अबू मुसाब अल्-झरकावी याच्या नेतृत्वाखाली अल्-कायदा इराक ही संघटना इराकमधील बंडखोरीचा चेहरा बनली होती. शिरच्छेदासारख्या निर्घृण शिक्षांमुळेही ही संघटना चर्चेत राहिली होती.

2006 सालाच्या सुरुवातीला अल्-कायदा इराकनं मुजाहिदीन शौरा कौन्सिल ही संघटना स्थापन केली होती. बगदादी या संघटनेमध्ये सामील झाला.

फोटो स्रोत, AFP

त्याचवर्षी, अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात अबू मुसाब अल्-झरकावी मारला गेला. त्यानंतर झरकावीच्या संघटनेचं नाव बदलून इस्लामिक स्टेट ऑफ इराक (ISI) असं करण्यात आलं. बगदादी ISI च्या शरिया समितीमध्ये होता आणि त्यानं शौरा कौन्सिलच्या सल्लागार समितीतही होता.

2010 साली ISI चा नेता अबु उमर अल्-बगदादी अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात मारला गेला. त्याच्यासोबतच त्याचा उत्तराधिकारी अबु अयुब अल्-मासरीही मारला गेला आणि ISI ची सूत्रं अबु बक्र अल्-बगदादीच्या हाती आली.

अबु उमर अल्-बगदादी आणि अबु अयुब अल्-मासरी मारले गेल्यानंतर ISI पराभवाच्या उंबरठ्यावर आहे, असाच अमेरिकन लष्कराचा समज झाला होता. मात्र सद्दाम हुसेनच्या काळातील लष्करी आणि गुप्तचर यंत्रणांना हाती धरून बगदादीनं ISI चं पुनरूज्जीवन केलं. कँप बुका तुरुंगातल्या त्याच्या सहकाऱ्यांचीही त्याला मदत झाली होती.

'खलिफा इब्राहिम'

2013 च्या सुरूवातीला ISI नं इराकमध्ये महिन्याभरातच दहाहून अधिक हल्ले घडवून आणले. सीरियामध्ये अध्यक्ष बशर असाद यांच्या विरोधात झालेल्या उठावामध्येही ISI सहभागी झाली होती.

त्याच वर्षी एप्रिल महिन्यात बगदादीनं सीरियामधील संघटना अल्-नुसरा आणि इराकमध्ये कार्यरत असलेल्या ISI चं विलिनीकरण करत असल्याचं जाहीर केलं. एकत्रीकरणानंतर या संघटनेचं नाव 'Islamic State in Iraq and the Levant' (ISIS/ISIL) असं ठेवण्यात आलं.

अल्- नुसरा आणि अल्-कायदाच्या अनेक नेत्यांनी विलिनीकरणाच्या निर्णयाला विरोध केला. मात्र अल्-नुसरामधील बगदादीशी एकनिष्ठ असणाऱ्या सैनिकांनी विलिनीकरणाला पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळेच ISIS सीरियामध्ये टिकून राहिली.

फोटो स्रोत, AFP

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

2013 सरत असतानाच ISIS नं आपलं लक्ष पुन्हा एकदा इराककडे वळवलं. शिया बहुल सरकार आणि इराकमध्ये अल्पसंख्याक सुन्नी अरब समुदायामधील तणावामध्ये ISIS नं स्वतःसाठी राजकीय संधी शोधली. काही जमाती आणि सद्दाम हुसेनचे निष्ठावंत यांच्या मदतीनं ISIS नं फालुजावर नियंत्रण मिळवलं.

2014 साली ISIS नं मोसुलचा ताबा मिळवला. त्यानंतर ISIS नं आपली आगेकूच दक्षिणेकडे बगदादच्या दिशेनं सुरू केली. विरोध करणाऱ्यांची सामूहिक हत्याकांडं ISIS नं घडवून आणली. इराकमधील अनेक वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना संपविण्याची भाषा ISIS नं केली होती.

इराकमधील महत्त्वाच्या शहरांचा ताबा घेतल्यानंतर ISIS नं 'खिलाफत' स्थापन केल्याची घोषणा केली. खिलाफत म्हणजे इस्लामी कायद्यानुसार अर्थात शरियाप्रमाणे चालणारं राज्य. पृथ्वीवर पाठविलेल्या प्रेषिताकडून हे राज्य चालवलं जातं. ISIS नं या घोषणेनंतर आपल्या संघटनेचं नाव पुन्हा एकदा बदललं आणि ही खिलाफत 'इस्लामिक स्टेट' म्हणून ओळखली जाऊ लागली. बगदादीला 'खलिफा इब्राहिम' असं संबोधायला सुरूवात झाली. जगभरातील मुस्लिमांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी इस्लामिक स्टेटची मागणी होती.

फोटो स्रोत, AFP

खिलाफतीच्या या घोषणेनंतर पाचच दिवसांनी ISIS नं एक व्हीडिओ प्रसिद्ध केला. यामध्ये बगदादी मोसुलमधील अल्-नुरी या प्रसिद्ध मशिदीमध्ये एक प्रवचन देताना दिसत होता. हा कॅमेऱ्यासमोरचं बगदादीचं पहिलं दर्शन होतं.

यावेळी बोलताना बगदादीनं सर्व मुस्लिमांना आपल्याला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. इस्लाममधील तत्वांवर श्रद्धा न ठेवणाऱ्यांविरोधात पुकारलेल्या युद्धात सहभागी होण्याची हाक बगदादीनं आपल्या प्रवचनात दिली होती.

एका महिन्यानंतर इस्लामिक स्टेटच्या बंडखोरांनी इराकमधील कुर्द अल्पसंख्यांक भागांमध्ये हल्ले केले. याझिदी या धार्मिक गटातील अनेकांचं शिरकाण केलं. या घटनेनंतर अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या फौजांनी इराकमधील जिहादींविरोधात हवाई हल्ले केले.

इस्लामिक स्टेटनं अनेक पाश्चात्य बंधकांचे शिरच्छेद केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात सीरियामध्ये हवाई हल्ले केले गेले.

इस्लामिक स्टेटचा पराभव

पुढच्या पाच वर्षात या जिहादी संघटनांच्या हातातून त्यांनी ताब्यात घेतलेला बराचसा भाग निसटत गेला. पाश्चिमात्य देशांसोबतच्या संघर्षामध्ये इराक आणि सीरियात लाखो लोकांचा बळी गेला.

इराकमध्ये सुरक्षा दलं आणि कुर्दिश बंडखोरांना अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा पाठिंबा मिळाला.

सीरियामध्ये अमेरिकेनं सीरियन कुर्दिश आणि अरब सैनिक, सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस आणि काही सीरियन अरब गटांना पाठिंबा दिला. राष्ट्राध्यक्ष असाद यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या गटांनी इस्लामिक स्टेटसोबत संघर्ष केला. त्यांना रशियन सैन्यानं आणि इराणचा पाठिंबा असलेल्या सशस्त्र सैनिकांचा पाठिंबा होता.

या सर्व संघर्षाच्या वर्षांमध्ये बगदादी जिवंत आहे की मृत याबद्दलच गूढ आणि गोंधळ कायम होता.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

2017 मध्ये मोसुल इस्लामिक स्टेटकडून हस्तगत करण्यात यश

जून 2017 साली इराकी सुरक्षा दलांनी मोसुलमधल्या इस्लामिक स्टेटच्या बंडखोरांसोबत निकराचा लढा दिला होता. याच दरम्यान रशियानंही त्यांची मदत केली होती.

उत्तर सीरियामधील राक्का या इस्लामिक स्टेटच्या तात्पुरत्या राजधानीवर हवाई हल्ले केले होते. 'या हल्ल्यांमध्ये बगदादी मारला गेल्याची शक्यता आहे,' असं रशियन अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.

मात्र सप्टेंबर महिन्यात इस्लामिक स्टेटनं एक ऑडिओ संदेश प्रसिद्ध केला. हा संदेश बहुदा बगदादीचाच होता. आपल्या शत्रूंसोबत सुरू असलेल्या युद्धांच्या ज्वाळा प्रज्वलित ठेवा, असं या संदेशात म्हटलं होतं.

मात्र या संदेशाचा सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसच्या मनोधैर्यावर परिणाम झाला नाही. त्यांनी राक्काचा ताबा मिळवण्यात यश मिळवलं. ऑगस्ट 2018 पर्यंत बगदादीचा नवीन ऑडिओ संदेश येईपर्यंत ही परिस्थिती कायम होती. आपल्या संदेशात बगदादीनं आपल्या समर्थकांना चिकाटीनं युद्धभूमीवर टिकून राहण्याचं आवाहन केलं होतं.

फोटो स्रोत, OMAR HAJ KADOUR

मात्र पुढच्याच महिन्यात सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसनं पूर्व सीरियामधून इस्लामिक स्टेटचं उच्चाटन करण्यासाठी निकराचा लढा सुरू केला. युफ्रिटीस नदीला लागून असलेल्या हाजीन शहरावर सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसनं हल्ला केला. मोसुल आणि राक्कामधून पळ काढलेले इस्लामिक स्टेटचे बंडखोर आणि त्यांचे कुटुंबिय इथं जमले होते. अर्थात, यामध्ये बगदादी होता की नाही हे स्पष्ट झालं नाही

मार्च 2019 मध्ये सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसनं इस्लामिक स्टेटच्या ताब्यात असलेला शेवटचा भागही आपल्या ताब्यात घेतला. हा बगदादीच्या कथित 'खिलाफती'चा शेवट होता.

एप्रिल 2019 मध्ये बगदादीचा एक ऑडिओ मेसेज प्रसिद्ध झाला. त्यानंतर सप्टेंबर 2019 पर्यंत बगदादीबद्दल काहीच ऐकायला मिळालं नाही.

दरम्यान, गेल्या महिन्यात ईशान्य सीरियामध्ये टर्कीच्या लष्करानं सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसवर केलेला हल्ला आणि या भागातून अमेरिकन फौजा काढून घेण्याचा ट्रम्प यांचा निर्णय यांमुळे इस्लामिक स्टेट पुन्हा प्रबळ होणार का, अशी चर्चा सुरू झाली होती.

शनिवारी (26 ऑक्टोबर) अमेरिकन लष्करानं केलेल्या कारवाईत बगदादीचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसच्या छाप्यानंतर बगदादीनं स्वतःला आत्मघातकी जॅकेटचा स्फोट घडवून उडवलं, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)