ब्रिटनमध्ये 12 डिसेंबरला होणार सार्वत्रिक निवडणुका

बोरिस जॉनसन

फोटो स्रोत, Getty Images

ब्रिटनमध्ये 12 डिसेंबरला पुन्हा एकदा निवडणुका होणार आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये ब्रिटनमध्ये तिसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.

बीबीसी प्रतिनिधी गगन सबरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटीश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 12 डिसेंबरला निवडणुका घेण्याच्या बाजूनं 438 खासदारांनी व्होटिंग केलं तर विरोधात 20 खासदारांनी वोटिंग केलं.

ब्रिटनमध्ये 12 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर 13 डिसेंबरला त्याचे निकाल जाहीर होणार आहेत.

1923 नंतर ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच डिसेंबरमध्ये मतदान होणार आहे. कडाक्याच्या थंडीत मतदान घेणं यंत्रणांसाठी एक आव्हान असणार आहे.

या निवडणुका 9 नोव्हेंबरला घेण्याचा आग्रह लेबर पार्टीनं केला होता. विद्यापिठातल्या विद्यार्थ्यांना मतदान करता यावं यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली होती.

युरोपियन महासंघानं ब्रेक्झिटला 31 जानेवारी 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे.

त्यामुळे निवडून येणाऱ्या नव्या संसदेला तात्काळ त्यावर निर्णय घ्यावा लागणार आहे.

लवकर निवडणूक घेण्याचा ब्रेक्झिटवर काय परिणाम होईल?

बीबीसीच्या प्रतिनिधी गगन सबरवाल म्हणतात की 12 डिसेंबरची निवडणूक आणि त्याचे निकाल यावर ब्रेक्झिटची दिशा ठरेल.

निवडणुकीनंतर दोन किंवा तीन पर्याय उभे राहू शकतात.

1) येत्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवणं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना शक्य झालं तर ते स्वतःच्या अटींवर युरोपियन युनियनमधून ब्रिटनला विलग करू शकतील.

2) जर दुसरा पक्ष जिंकला किंवा इतर कोणी पंतप्रधान झालं तर मग ब्रेक्झिटविषयी दुसरा प्रस्ताव लोकांसमोर मांडण्यात येण्याची शक्यता आहे.

3) 'नो डील ब्रेक्झिट' म्हणजे कोणताही करार न करता ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचीही शक्यता आहे. पण ब्रिटन कोणताही करार न करता युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यास त्याचा ब्रिटीश अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असल्याचं अनेक ब्रिटीश लोकांचं, व्यापाऱ्यांचं आणि खासदारांचं म्हणणं आहे.

डिसेंबरमध्ये निवडणूक घेण्याचं आव्हान

ब्रिटनमध्ये भयंकर थंडीमध्ये निवडणूक राबवणं कठीण आहे. डिसेंबरच्या महिन्यात इथे भयंकर थंडी असते आणि तापमान अतिशय कमी असतं. म्हणूनच येत्या निवडणुका कठीण ठरणार आहेत.

शिवाय थंडीच्या या काळात ब्रिटनमध्ये दिवस अतिशय लहान असतो आणि दुपारनंतरच काळोख व्हायला लागतो. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक प्रक्रिया योग्यपणे पार पाडणं हेच एक मोठं आव्हान असणार आहे.

हा ख्रिसमस आणि लग्नांचा मोसम असल्याने अनेक मोठ्या जागा या आधीच ख्रिसमस, लग्न किंवा पार्टीसाठी बुक करण्यात आलेल्या आहेत.

यामुळे 12 डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पोलिंग स्टेशन उभी करण्यासाठीही खूप कमी जागा उपलब्ध असतील, असं गगन सबरवाल सांगतात.

म्हणूनच ही निवडणूक केंद्र भरपूर अंतराने असतील आणि इथं पोहोचणं लोकांना कठीण जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

31 जानेवारीपर्यंतचा कालावधी

ब्रेक्झिटसाठी म्हणजेच युरोपियन युनियनमधून विलग होण्यासाठीचा कालावधी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे.

ब्रिटीश संसदेने जर 31 जानेवारीच्या आधी एखाद्या प्रस्तावाला मंजुरी दिली तर ब्रिटन या तारखेआधीच युरोपियन युनियनपासून वेगळा होऊ शकतो.

पण ब्रेक्झिटला विरोध करणारे हे देशासाठी एक संकट असल्याचं म्हणतायत. सभागृह वेळाआधी विसर्जित करणं हे ब्रिटीश लोकशाहीची हानी आहे, असं या लोकांचं म्हणणं आहे.

तर कोणताही करार न करता युनियनमधून बाहेर पडल्यास ब्रिटीश नागरिकांच्या मतांकडे दुलर्क्ष केल्यासारखं होईल असं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची इच्छा असणाऱ्यांना वाटतंय.

2016मध्ये ब्रिटनमध्ये झालेल्या मतचाचणीत 52 टक्के लोकांनी ब्रेक्झिटचं समर्थन केलं होतं तर 48 टक्के लोकांनी याचा विरोध केला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)