अबू बक्र अल बगदादीला ठार केल्याचा डोनाल्ड ट्रंप यांना राजकीय फायदा होईल का?

बगदादी Image copyright AFP
प्रतिमा मथळा बगदादी

अतिरेकी संघटना इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू बक्र अल्- बगदादी मारला जाणं हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा मोठा विजय मानला जायला हवा होता.

पण उलट यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची वादग्रस्त कार्यशैली आणि पक्षपातीपणा समोर आला.

रविवारी सकाळी डोनाल्ड ट्रंप यांनी याविषयीची घोषणा करण्यापासूनच याला सुरुवात झाली.

बगदादीला 'कुत्र्यासारखं मरण' आल्याचं सांगत ट्रंप यांनी याविषयी आनंद व्यक्त केला. सोबतच "एखादा चित्रपट पाहावा त्याप्रमाणे" आपण हे संपूर्ण ऑपरेशन पाहिल्याचं त्यांनी सांगितलं.

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर बराक ओबामांनी केलेल्या गंभीर घोषणेच्या हे अगदी विरुद्ध होतं.

पत्रकारांनी याविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर मात्र ट्रंप संतापले. त्यांनी आपल्या युरोपियन सहकाऱ्यांवर टीका केली आणि इस्लामिक स्टेटच्या कैद्यांना डांबून ठेवण्यात आपल्याला सहकार्य न केल्यामुळे हे सहकारी 'अतिशय निराशाजनक' असल्याचं त्यांनी म्हटलं.

काही निवडक मुस्लीम-बहुल देशांवर लावण्यात आलेला 'इमिग्रेशन बॅन' म्हणजे स्थलांतर करण्यावर असलेल्या बंदीचं त्यांनी समर्थन केलं आणि अमेरिकेचा इस्लामी अतिरेक्यांपासून बचाव करण्यासाठी हे केल्याचं त्यांनी म्हटलंय.

बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना 2011मध्ये अमेरिकेने राबवलेल्या मोहिमेत ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला होता. पण बगदादीचा मृत्यू ही आतापर्यंतची सगळ्यांत मह्त्त्वाची गोष्ट असल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं.

परंपरांचा भंग

ट्रंप यांच्या बोलण्यामध्ये पुन्हा पुन्हा ओसामा बिन लादेनचा उल्लेख येत होता. "अल् - कायदाच्या या म्होरक्याला तो वर्ल्ड ट्रेडसेंटर पाडण्यापूर्वीच ठार करायला हवं, " असं आपण 2000 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातच म्हटलं होतं पण या इशाऱ्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही, असं ट्रंप म्हणाले. "त्यांनी माझं ऐकलं असतं तर आज अनेक गोष्टी वेगळ्या असत्या," राष्ट्राध्यक्ष ट्रंप म्हणाले. (प्रत्यक्षात ओसामा बिन लादेन हा 9/11चा आधीपासूनच अमेरिकेचं लक्ष्य होता. आणि डोनाल्ड ट्रंप यांच्या 'द अमेरिका वुई डिझर्व्ह' या पुस्तकात अशा कोणत्याही विधानाचा उल्लेख नाही.)

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ओसामा बिन लादेन

अमेरिकन काँग्रेसमधील डेमोक्रॅट नेते - स्पीकर नॅन्सी पलोसी आणि हाऊस इंटेलिजन्स कमिटीचे प्रमुख यांना या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली नसल्याचंही ट्रंप यांनी सांगितलं. आतापर्यंतच्या परंपरेचा हा भंग आहे.

"आम्ही त्यांना काल रात्री सांगणार होतो. पण सध्या वॉशिंग्टनमध्ये बातम्या इतक्या फुटतात की त्यांना सांगू नये, असं आम्ही ठरवलं," ते म्हणाले.

पण रिचर्ड बर आणि सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्यासह अमेरिकन काँग्रेसमधल्या काही रिपब्लिकन्सना याची कल्पना दिल्याचं अध्यक्षांनी मान्य केलं.

रशियन आणि टर्कीश अधिकाऱ्यांचं कौतुक करत अमेरिकेच्या या भागातील मोहिमेची त्यांना पूर्वकल्पना दिल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं.

आणि ही गोष्ट डेमोक्रॅट्सच्या नजरेतून सुटली नाही.

"या अशा कारवाईची आणि प्रशासनाच्या या संपूर्ण भागातल्या धोरणाविषयीची माहिती व्हाईट हाऊसनं देणं गरजेचं होतं. याविषयी रशियनांना कल्पना देण्यात आली पण काँग्रेसमधल्या नेत्यांना याची पूर्वकल्पना देण्यात आली नाही. आपलं सैन्य आणि सहकारी यांना वॉशिंग्टनकडून कणखर, हुशार आणि धोरणात्मक नेतृत्वाची अपेक्षा आहे," नॅन्सी पलोसी यांनी एका निवेदनाद्वारे म्हटलं.

Image copyright Twitter/@SpeakerPelosi
प्रतिमा मथळा नॅन्सी पलोसी

सध्याचे हाऊस इंटेलिजन्स प्रमुख असणारे अॅडम स्चिफ यांना ही माहिती न देण्याच्या निर्णयाचं समर्थन ट्रम्प यांनी दुसऱ्या दिवशी शिकागोतल्या एका कार्यक्रमात बोलताना केलं. ट्रंप यांच्याविरोधात सध्या सुरू असलेल्या महाभियोगाच्या तपास कारवाईचे स्चिफ हे प्रमुख आहेत.

"अॅडम स्चिफ हे भ्रष्ट राजकारणी आहेत. यापूर्वी कोणीही केलं नसेल, अशाप्रकारे ते गुप्त माहिती फोडतात," ट्रंप म्हणाले.

राजकीय फायदा होईल का?

ओसामा बिन लादेनवरील कारवाई सुरू करण्यापूर्वी बराक ओबामांनी अमेरिकन काँग्रेसमधल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना याविषयी माहिती दिली होती. ओसामा बिन लादेनला जेरबंद करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमेबद्दल अनेक महिने व्हाईट हाऊसकडून आपल्याला माहिती देण्यात येत असल्याचं तेव्हाच्या हाऊस इंटेलिजन्स कमिटीमध्ये असणाऱ्या रिपब्लिकन नेत्यांनी म्हटलं होतं.

पण ओसामा बिन लादेनवरच्या याच कारवाईचा संदर्भ देत, वॉशिंग्टनमध्ये अनेकांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचं रविवारपासून बोललं जातंय.

बिन लादेनवरची कारवाई आणि बगदादीवरची कारवाई यानंतर नॅन्सी पलोसी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत फरक असल्याचं वॉशिंग्टन एक्झामिनरसाठी लेखन करणारे कन्झर्व्हेटिव्ह लेखक बायरन यॉर्क यांनी ट्विटरवर म्हटलं.

पहिल्या कारवाईनंतर पलोसींनी आपण ओबामांना 'सॅल्यूट' करत असल्याचं म्हटलं होतं. पण बगदादीवरच्या कारवाईनंतर मात्र त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे फक्त 'लष्कर आणि गुप्तचर संस्थांचं' कौतुक केल्याचं बायरन यांनी म्हटलंय.

दरम्यान ओसामा बिन लादेनचा खात्मा होण्यामागचं बराक ओबामांचं श्रेय हिरावून घेण्याचा ट्रम्प यांनी कितीवेळा प्रयत्न केला, याविषयी वॉशिंग्टन पोस्टने एक संपूर्ण लेख छापलेला आहे.

Image copyright Twitter

बगदादीच्या मृत्यूचा डोनाल्ड ट्रंप यांना राजकीय फायदा होईल का, हे आताच सांगणं कठीण आहे. कारण ओसामा बिन लादेनवरील कारवाईनंतर बराक ओबामांविषयीच्या लोकांच्या सकारात्मक भावनांमध्ये तात्पुरतीच वाढ झालेली होती. पण 2012मध्ये अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक लढवताना त्यांनी प्रचारामध्ये या गोष्टीचा वारंवार उल्लेख केला होता.

शिवाय डोनाल्ड ट्रंप कितीही गवगवा करत असले तरी ओसामा बिन लादेन प्रमाणे बगदादी हे नाव अमेरिकेत घरोघरी माहीत नाही. उलट उत्तर सीरियातून अचानक अमेरिकन सैन्य माघारी बोलवल्याबद्दल गेले काही आठवडे ट्रंप यांच्यावर टीका होत आहे.

यासगळ्या कारवाईचा डेमोक्रॅट्सवर फारसा परिणाम झालेला नसला तर या कारवाईमुळे अनेक रिपब्लिकन नेत्यांचं ट्रंप यांच्या सीरियाविषयीच्या भूमिकेबद्दलचं मत बदलताना दिसतंय.

"सीरियामध्ये उचलण्यात आलेल्या पावलांचा आता अर्थ लागतोय. अध्यक्षांना नेमकं काय करायचं आहे, हे आता मला समजलं. अमेरिकेच्या तिथल्या पाऊलखुणा मिटवायच्या आहेत आणि खर्चही कमी करायचा आहे. आणि त्यांना तसं करावंसं वाटणं योग्य आहे." बगदादीच्या मृत्यूच्या घोषणेनंतर सिनेटर ग्रॅहम यांनी व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

या कारवाईचा परिणाम म्हणून रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा वाढेल आणि परिणामी डेमोक्रॅट्स चिथावले जाण्याची शक्यता आहे. आणि असं झाल्यास अमेरिकन जनेतमध्ये मोठी फूट पडेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)