पाकिस्तान : चालत्या ट्रेनला लागली आग, 73 जणांचा मृत्यू

पाकिस्तान ट्रेन

फोटो स्रोत, Asim Tanvir

पाकिस्तान रेल्वेच्या तेजगाम एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत 73 जणांचा मृत्यू झाला आहे.

तेजगाम एक्सप्रेस कराची ते रावळपिंडी दरम्यान धावते. लियाकतपूर जवळ पोहोचत असताना गाडीच्या 3 बोगींना आग लागली.

रहीम यार खानचे उपायुक्त जमील अहमद जमील यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, की या दुर्घटनेत 73 लोक मृत्यूमुखी पडले असून 40 जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते मृतांचा आकडा वाढू शकतो. जखमींवर शेख झायेद हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

फोटो स्रोत, Rescue 1122

रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी दिलेल्या माहितीनुसार तबलीगी जमातीच्या लोकांचा एक गट लाहोरला धार्मिक कार्यक्रमासाठी जात होता. त्यांच्या जवळ खाण्यापिण्याच्या वस्तू आणि गॅस सिलिंडर होते. सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे.

आग विझविण्यात यश आल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच जखमींना रुग्णालयात दाखल केल्याचही त्यांनी सांगितलं.

आग लागली असली तरी ट्रेन रुळांवरून घसरली नाही. या दुर्घटनेनंतर अनेक ट्रेन रद्द झाल्या आहेत.

इम्रान खान यांनी व्यक्त केलं दुःख

या दुर्घटनेची दखल घेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दुःख व्यक्त केलं असल्याचं रेडिओ पाकिस्तानने म्हटलं आहे. जखमींना लवकरात लवकर उपचार मिळावेत म्हणून त्यांनी आदेश दिल्याचंही रेडिओ पाकिस्तानने म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Rescue 1122

रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी सांगितलं, की प्रवाशांचा आणि ट्रेनचा विमा उतरवला होता त्याव्दारे आर्थिक नुकसानाची भरपाई केली जाईल. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पाकिस्तानातल्या खाजगी चॅनल्सशी बालताना त्यांनी सांगितलं, "मृतांच्या कुटुंबीयांना 15 लाख तर जखमींना 5 लाखांची मदत दिली जाईल. सैन्यदल तिथे मदतकार्यासाठी पोहचलं आहे. घटनेचा आढावा घेण्यासाठी मी स्वतः तिथे जात आहे."

महत्त्वाचं म्हणजे एकाच नावावर या गाडीच्या काही बोगी बुक झाल्याच रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)