विगन जीवनशैलीविषयीची जाणून घ्या या 5 गोष्टी

आरोग्य सुधारण्यासाठी अनेक लोक विगनिजमचा अवलंब करत आहेत. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आरोग्य सुधारण्यासाठी अनेक लोक विगनिजमचा मार्ग स्विकारत आहेत.

'विगन लाईफस्टाईल' म्हणजे कुठल्याही प्राण्यावर कुठल्याच प्रकारचा अत्याचार न करणे. विगन आहारात मांस, मासे, दुग्धजन्य पदार्थ (डेअरी प्रॉडक्ट्स), अंडी वर्ज्य असतात. इतकंच काय या आहारात मधमाशांपासून मिळणारं मधही वर्ज्य असतं.

मात्र, विगन जीवनशैलीचा एवढा मर्यादित अर्थ अपेक्षित नाही. यात चामड्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू, लोकर आणि मोतीसुद्धा वापरत नाहीत.

अशाप्रकारची विगन जीवनशैली सहाजिकच महागडी आहे. असं असलं तरी विगन जीवनशैलीवर त्याचा परिणाम होताना दिसत नाही. जगभरात ही लाईफस्टाईल आचरणात आणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

एकट्या अमेरिकेत स्वतःला विगन म्हणवून घेणाऱ्यांची संख्या 2014 ते 2017 या काळात तब्बल 600 टक्क्यांनी वाढली आहे. ग्लोबल डाटा या संस्थेने ही माहिती दिली आहे. तर विगन सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार युकेमध्ये गेल्या दशकभरात विगन लोकांची संख्या 400 टक्क्यांनी वाढली आहे.

मूठभर लोकांपासून सुरू झालेली ही विगन चळवळ आज मुख्य प्रवाहात पोहोचली आहे. त्यामुळेच मॅकडोनल्डसारख्या मोठ्या फूड ब्रँडनेदेखील 'मॅकविगन बर्गर' बाजारात आणले आहेत.

1 नोव्हेंबर हा दिवस 'जागतिक विगन दिन' म्हणून पाळला जातो. याच निमित्ताने विगन लाईफस्टाईलविषयी पाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

1. आरोग्यविषयक फायदे-तोटे

ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार मांसाहाराचा त्याग करू इच्छिणारे 50% लोक आरोग्यविषयक कारणांमुळे विगन आहाराचा अवलंब करतात. (Mintel)

रेड मिट आणि प्रोसेस्ड मिट खाल्ल्यानं आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते, असं अभ्यासामधून आढळून आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील प्रक्रिया केलेल्या मांसाला कर्करोगकारक पदार्थांच्या यादीत टाकलं आहे. तसंच तंतूमय पदार्थ, फळं आणि भाज्यांनी युक्त सकस आहार घेतल्यानं कर्करोगाचा धोका कमी होतो, असा सल्लाही दिला आहे.

मात्र, विगन आहार घेणारे अधिक सुदृढ असतात का?

दीर्घकाळ विगन आहार घेण्याने शरीराला फायदा होतो का, हे अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.

यासंबंधी एक संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनात मांसाहार घेणारे आणि विगन किंवा शाकाहार घेणाऱ्यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात असं आढळून आलं, की विगन किंवा शाकाहार घेणाऱ्यांना आरोग्यविषयक समस्या काही प्रमाणात कमी असल्या तरी त्यांना दीर्घायुष्य लाभतंच असं नाही.

विगन आहार घेणाऱ्यांची प्रकृती तुलनेने चांगली असण्यामागचं कारण ते आरोग्याबद्दल अधिक जागरूक असतात, हेदेखील असू शकतं.

अर्थात, केवळ वनस्पतीजन्य आहारातूनही आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. विगन आहार घेणाऱ्यांमध्ये व्हिटामिन डी (हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक), व्हिटामिन बी-12 (रक्त आणि मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक) आणि आयोडिन (मेंदू आणि थायरॉईडसाठी आवश्यक) यांची कमतरता असू शकते.

2. पर्यावरणपूरक जीवनशैली

जगभरात विगन आहाराची लोकप्रियता वाढत असली तरी दुसरीकडे मांसविक्रीतही मोठी वाढ दिसून येते.

चीन आणि भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये लोकांचं जीवनमान उंचावत आहे आणि त्यासोबतच तिथे लोकांचा मांसाहाराकडे असलेला कलही वाढत आहे. मात्र, आज ज्या पद्धतीने मांसनिर्मिती केली जाते, त्यामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप होत आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या 2013 सालच्या अहवालानुसार मांस उत्पादन उद्योगामुळे जगभरात हरितवायूंचं (ग्रीनहाऊस गॅसेस) 14.5% उत्सर्जन होतं. हे उत्सर्जन पृथ्वीवर प्रत्येक कार, ट्रेन, जहाज आणि विमानातून होणाऱ्या उत्सर्जनाएवढंच आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गायींनी रवंथ केल्यामुळे हवेत मिथेन मिसळतो असं म्हटलं जातं

इतकंच नाही तर मांस उत्पादनात नैसर्गिक स्रोतांचाही मोठ्या प्रमाणावर वापर होतो. उदाहरणार्थ- जवळपास अर्धा किलो लेट्युसच्या (सॅलेडमध्ये वापरली जाणारी पालेभाजी) उत्पादनासाठी 104 लीटर पाण्याची गरज असते, तर एवढ्याच प्रमाणात मांस उत्पादन करण्यासाठी तब्बल 23,700 लीटर पाणी वापरलं जातं. (John Robbins's The Food Revolution)

संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार जगाची लोकसंख्या जवळपास 7 अब्ज एवढी आहे. यातली जवळपास 50 ते 100 कोटी लोकसंख्या वनस्पतीपासून मिळणारा आहार घेते. जगभरातल्या विगन असोसिएशन्सने ही माहिती दिली आहे.

मात्र, संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार 2050 पर्यंत जागतिक लोकसंख्या जवळपास साडेनऊ अब्ज होईल. त्यामुळे त्यावेळच्या लोकसंख्येचं उदरभरण करण्यासाठी अन्नधान्याचं उत्पादन 70 टक्क्यांनी वाढवावं लागणार आहे.

विगन आहार म्हणजे फॅड नव्हे तर ही जगण्याची अधिक संवेदनशील आणि जबाबदार पद्धत असल्याचं विगन आहारशैलीचा पुरस्कार करण्याचं म्हणणं आहे.

3. विगन उद्योगाची भरभराट

विगनरी (Veganuary) ही एक ब्रिटीश धर्मादाय संस्था आहे. ही संस्था लोकांना जानेवारी महिन्यात विगन आहार स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देते आणि त्यासाठी सर्वतोपरी मदत करते. जानेवारी महिना यासाठी, की लोक पुढे वर्षभर हा आहार पाळतील अशी अपेक्षा असते.

पाच वर्षांपूर्वी संस्थेची स्थापना झाली आणि दरवर्षी या योजनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढत आहे, असं या संस्थेचं म्हणणं आहे. 2019 साली 190 देशांमध्ये 2 लाख 50 हजार लोकांनी या योजनेत नाव नोंदवलं आहे.

प्रथिनांच्या (प्रोटीन) पर्यायी स्रोतांचं मार्केट आज मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. त्यामुळे विगनझम आज ग्लोबल इंडस्ट्री झाली आहे. एकट्या अमेरिकेत 2018 साली मांसरहित पदार्थांची मागणी दहा पटीने वाढली.

'विगन आहारशैलीचा स्वीकार' हा 2019 सालचा सर्वात मोठा ट्रेन्ड असेल, असं The Economist मासिकानं म्हटलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अनेक सेलिब्रिटी विगन होत आहेत

विगन समर्थक आणि त्यासंबंधीच्या व्यावसायिकांसाठी सोशल मीडिया हे प्रसाराचं मोठं व्यासपीठ ठरतंय. हा लेख लिहून पूर्ण होईपर्यंत एकट्या इन्स्टाग्रामवर विगनसंबंधीच्या 92 कोटी पोस्ट होत्या.

दूरदृष्टी असणारे उद्योजक या उद्योगातही पदार्पण करून संधीचा लाभ उचलत आहेत. गेल्या काही वर्षात विगन चीजचं कमालीचं फॅड आलं आहे. 2020 पर्यंत विगन चीज इंडस्ट्री 4 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज आहे.

फूड इंडस्ट्रीमधल्या मोठ-मोठ्या कंपन्यांचंही लक्ष आता विगन आहारशैलीने आकर्षित केलं आहे. नेस्लेसारखी जगातली नावाजलेली फूड कंपनीही आता विगन फूडविषयी जागरुक आहे. वनस्पतीजन्य पदार्थांची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं कंपनीचं म्हणणं आह. एकूणच विगन उत्पादनं केवळ काही मूठभर लोकांपुरते मर्यादित न राहता ते आता मुख्यप्रवाहात सामिल झाले आहेत.

चिकन, बीफ आणि पोर्कची जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रोसेसर आणि मार्केटर कंपनी असलेल्या 'टायसन फूड' या कंपनीने 2018 साली 'बियॉंड मीट' या नवख्या विगन कंपनीतले 6.5% शेअर्स विकत घेतले. 'बियॉंड मिट' ही रेस्टॉरंट्सना मांसरहित पॅटिज पुरवते.

पुढच्याच वर्षी टायसनने आपला वाटा 7 कोटी 90 लाख डॉलर्सला विकत इमिटेशन चिकन नगेट्स (चिकन नगेट्ससारखे दिसणारे मांसरहित नगेट्स) आणि अल्ट-प्रोटीन बर्गर (मांसरहित प्रोटीन असलेले बर्गर) ही दोन स्वतःची उत्पादनं बाजारात आणली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विगन बर्गर

'टेक-अवे' क्षेत्र म्हणजेच हॉटेलमधून जेवणाची घरपोच डिलिव्हरी देणाऱ्या क्षेत्रानंही विगनिझमचं तेवढ्याच उत्साहात स्वागत केलं आहे. Just Eat ही जेवणाची घरपोच सेवा पुरवणारी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीचंही म्हणणं आहे की गेल्या काही वर्षात विगन आहाराचा ट्रेंड कमालीचा वाढला आहे.

विगन चळवळीचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण काय असावं?

विगनरीमध्ये कॅम्पेन प्रमुख असलेले रिच हार्डी म्हणतात, "यामागचं मुख्य कारण आहे 'Visibility' म्हणजे सहजपणे नजरेस पडणं. विगन हा शब्द आता परवलीचा झाला आहे. दुकानं, रेस्टॉरंट, लोकांच्या तोंडून, वर्तमानपत्रात, मासिकात हा शब्द सर्रासपणे ऐकायला-वाचायला मिळतो. हा काही प्रोपागंडा किंवा अल्पकालीन ट्रेंड नाही."

4.विगन जीवनशैलीची काळी बाजू

विगन चळवळ हा भूतदयेचा मार्ग असल्याचं म्हटलं जातं. 'आम्ही प्राण्यांवर निस्सिम प्रेम करतो, त्यांचा आदर करतो,' असं त्यांचं म्हणणं आहे.

अनेक संस्कृतींमध्ये पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षात अतिरेकी विगनिझमवरून बरेच वाद निर्माण झालेत आणि त्यावर टीकाही झाली आहे.

प्राणीप्रेमींच्या अतिरेकाचा फटका शेतकरी आणि खाटिकांना बसत आहे. अनेक दुकानांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे. तर मांसासाठी होणाऱ्या प्राणीहत्यांचा अनेकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्राणीहक्काचे पुरस्कर्ते, मनिला, फिलिपाइन्स

ब्रिटनमधले शेतकरी अलिसन वॉग यांनी बीबीसीला सांगितलं, "तुम्हाला खुनी, बलात्कारी म्हणणं मर्यादांचं उघड-उघड उल्लंघन आहे."

मात्र, आम्ही अहिंसक चळवळींचे पुरस्कर्ते असल्याचं 'Save Movement' सारख्या विगन कार्यकर्त्यांच्या संघटनांचं म्हणणं आहे.

हे कार्यकर्ते कत्तलखान्यावर लक्ष ठेवतात आणि तिथे प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करून विगन जीवनशैलीचा प्रसार-प्रचार करतात.

अतिरेकी विगन आहारात अव्होकॅडो, बदाम आणि ब्रोकोली यांचा समावेश करायलादेखील नकार देतात. त्यांच्या मते कीटक या झाडांचं परागीकरण घडवून आणतात. हे परागीकरण नैसर्गिकरित्या झाल्यास त्यापासून मिळणारी फळं, भाज्या विगन ठरतात. मात्र, यांची शेती करायची असल्यास किटकांवर अत्याचार होतो आणि मग अशा झाडांपासून मिळालेले पदार्थ विगन ठरत नाहीत.

5. विगनिझम नवीन नाही

'विगन' ही संकल्पना 1944 साली अस्तित्वात आली. डोनाल्ड वॉटसन यांनी 1944 साली युकेमध्ये 'विगन सोसायटीची' स्थापना केली. वॉटसन स्वतः शाकाहारी होते. मात्र, डेअरी उद्योगामध्ये प्राण्यांचा होणारा छळ असह्य झाल्याने त्यांनी एक नवी संकल्पना जन्माला घातली आणि ही संकल्पना म्हणजे डेअरी उत्पादनांचा वापर न करणारे शाकाहारी म्हणजेच विगन.

मांसाहाररहित आहार प्राचीन भारतीय आणि मध्ययुगीन संस्कृतीत अडीच हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे.

हिंदू, बौद्ध आणि जैन संस्कृती असलेल्या भारतात प्राचीन काळापासून मांसाहाररहित आहाराला प्राधान्य आहे. या संस्कृतींमध्ये प्राणीमात्रांवर अत्याचार न करणं, भूतदया, गाईला मातेचा दर्जा आणि आत्मा वेगवेगळी रुपं धारण करतो, अशा मान्यता आहेत. त्यामुळे या संस्कृतींमध्ये मांसभक्षण वर्ज्य मानलं गेलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पायथागोरस आहाराबद्दल तुम्ही ऐकलं आहे का?

युरोपात वनस्पतीजन्य आहाराजी बिजं रुजली ती प्राचीन ग्रीक संस्कृतीतून. पायथॅगोरसची ओळख तत्त्ववेत्ता आणि गणितज्ज्ञ म्हणून असली तरी तो परोपरकाराचा खंदा पुरस्कर्ता होता. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश त्याने दिला.

त्याचं म्हणणं होतं, "स्वतःच्या शरीरात दुसऱ्याचं मांस ग्रहण करणं पाप आहे. इतर सजीव प्राण्याचा जीव घेऊन दुसऱ्या सजीव प्राण्याचं उदरभरण करणं पाप आहे."

खरंतर 'शाकाहारी' हा शब्द चलनात येण्यापूर्वी जे लोक मांसरहित आहार घ्यायचे त्यांना 'पायथॅगोरियन आहार घेणारे' म्हणून संबोधलं जायचं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)