140 साप पाळणाऱ्या महिलेचा सापांच्या संगतीत मृत्यू

अजगर Image copyright Getty Images

अमेरिकेत एक महिला गळ्याला अजगराचा विळखा पडलेल्या अवस्थेत मृत आढळली आहे. विशिष्ट पट्ट्यांची त्वचा असलेला हा अजगर 8 फूट लांबीचा होता.

लॉरा हर्स्ट (36) असं या महिलेचं नाव आहे. इंडियाना प्रांतातल्या ऑक्सफोर्ड शहरात ही घटना घडली आहे.

ज्या घरात हा सगळा प्रकार घडला तिथे जवळपास 140 साप आणि अजगर होते. या सरपटणाऱ्या प्राण्यांसाठीच हे घर वापरण्यात येत होतं.

या सापांपैकी जवळपास 20 साप लॉरा यांच्या मालकीचे होते आणि त्या आठवड्यातून दोन दिवस सापांना बघण्यासाठी इथे यायच्या.

विशेष म्हणजे हे घर बेनटॉन काउंटीचे पोलीस अधिकारी डॉन मनसन यांच्या मालकीचं आहे. ते शेजारच्याच घरात रहायचे. त्यांनी 'द जर्नल अँड कुरियर' या स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम त्यांनीच लॉरा हर्स्ट यांना फरशीवर निपचित पडलेलं बघितलं होतं.

ही अत्यंत 'दुर्दैवी घटना' असल्याचं आणि आपण 'सर्वांना सर्वतोपरी सहकार्य करत' असल्याचं त्यांनी सांगितलं.

डॉन मनसन यांनीच लॉरा यांच्या गळ्याभोवती विळखा घालून बसलेला अजगर काढला. मात्र, वैद्यकीय पथकाला लॉरा यांचे प्राण वाचवता आले नाही, अशी माहिती इंडियानाचे पोलीस अधिकारी सार्जेंट किम रिले यांनी दिली.

लॉरा हर्स्ट बॅटल ग्राउंड शहरात राहायच्या आणि तिथून त्या आपल्या सापांना भेट देण्यासाठी आल्या होत्या, असंही सार्जेंट किम रिले यांनी सांगितलं.

पायथन रेटिक्युलेटस (Python Reticulatus)

  • हा जगातला सर्वांत लांब अजगर आहे. या प्रजातीच्या अजगराची लांबी 10 मीटर म्हणजे तब्बल 32 फूटही असू शकते.
  • कॅन्सास शहरात पिंजऱ्यात असलेल्या सर्वांत मोठ्या अजगराची लांबी 25 फूट आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने 2011 साली त्याची नोंद घेतली आहे.
  • या प्रजातीचा अजगर सामान्यतः घनदाट जंगलात आढळतो. तो मानवाला घाबरतो आणि क्वचितच दिसतो.
  • याशिवाय सब-सहारन अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, भारत, श्रीलंका, बर्मा, चीन आणि दक्षिण-पूर्व आशियात अनेक प्रकारचे अजगर आढळतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

Related Topics