5G नेटवर्क कसं आहे? चीनमध्ये वेगवान डेटा सेवा सुरू

चीन 5जी Image copyright Getty Images

चीनच्या टेलिकॉम कंपन्यांनी देशातील ग्राहकांसाठी 5G सेवा सुरू केली आहे. या सोबतच चीनने जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे.

चीनची सरकारी टेलिकॉम कंपनी चायना मोबाईल, चायना युनिकॉम आणि चायना टेलिकॉम यांनी गुरुवारी आपल्या 5G डेटा प्लॅनची घोषणा केली.

चीन आणि अमेरिकेत व्यापारी आणि तंत्रज्ञानाबाबतचं वेगळंच युद्ध सुरू असताना ही घोषणा करण्यात आली आहे, हे विशेष.

चीनपूर्वी दक्षिण कोरिया, अमेरिका आणि इंग्लंडने यावर्षी 5G सेवा सुरू केली आहे. 5G अर्थातच पाचव्या पिढीचं मोबाईल नेटवर्क आहे. साहजिकच आपण अनुभवतो त्यापैक्षाही अधिक वेगवान इंटरनेट स्पीड 5G मध्ये लोकाना अनुभवता येणार आहे.

डेटा प्लॅनची किंमत

आधी चीनने 5G सेवेची सुरुवात पुढच्या वर्षी करण्याचं ठरवलं होतं. पण त्यांनी या प्रक्रियेला वेग दिला आणि याच वर्षी 5G सेवा सुरू केली आहे.

Image copyright Getty Images

राजधानी बीजिंग आणि प्रमुख शहर शांघाय यांच्यासह चीनच्या 50 शहरांमध्ये ही सुपरफास्ट सेवा सुरू झाली आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार 5G डेटा प्लॅनची किंमत 128 युआन (सुमारे 1,300 रुपये) ते 599 युआन (सुमारे 6,000 रुपये) आहे.

चीनमध्ये 5G सेवा सुरू करण्यासाठी नेटवर्कसंबंधित उपकरणांचा सर्वाधिक पुरवठा ख्वावे (Huawei) कंपनीने केला आहे. ही कंपनी इतर अनेक देशांत 5G नेटवर्क निर्माण करण्यासाठी महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

विशेष म्हणजे ख्वावे ही कंपनी अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असल्याचं म्हणत अमेरिकेने या कंपनीला काळ्या यादीत टाकलेलं आहे.

ख्वावेने त्यांच्यावरील सगळे आरोप फेटाळले आहेत. अमेरिकेचं हे पाऊल म्हणजे त्यांच्या व्यापारी युद्धाचा एक भाग असल्याचं चीनला वाटतं.

युरोपमध्ये काय स्थिती?

युरोपमध्ये 5G साठी रेडिओव्हेव फ्रिक्वेन्सी मिळवण्यासाठी तंटा होण्याची शक्यता आहे. कारण या लहरींचे वाटप कसे व्हावे याबद्दल अधिकारी निर्णय घेणार आहेत.

युरोपीयन स्पेस एजन्सीनं या लहरी वापरल्यास हवामान बदलाचा अभ्यास आणि हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यावर परिणाम होऊ शकतो अश भीती व्यक्त केली आहे.

परंतु मोबाईल कंपन्यांनी या दाव्यांना आधार नसल्याचं सांगितलं आहे आणि आपण मोबाईल नेटवर्कना अधिक वेग देण्यावर मर्यादा आणू असं स्पष्ट केलं आहे.

याबाबत पर्याय शोधण्यासाठी मंत्री आणि रेग्युलेटर्स चर्चा करणार आहेत.

5G लहरी कशाप्रकारे वापरल्या जाव्यात यासाठी जागतिक पातळीवर एकमत होण्यासाठी शर्म अल शेख येथे होणाऱ्या वर्ल्ड रेडिओकम्युनिकेशन कॉन्फरन्स 2019मध्ये प्रयत्न होणार आहेत.

5G तंत्रज्ञानाचं वेगळेपण काय?

पूर्वीच्या इतर सेल्युलर तंत्रज्ञानाप्रमाणेच 5G नेटवर्कदेखील रेडियोलहरींच्या सिंग्नलवर अवलंबून आहे. हे सिग्नल अॅँटेना किंवा मास्टवरून तुमच्या मोबाईलवर पाठवले जातात.

आपण कायम विद्युतचुंबकीय किरणांनी (electromagnetic radiations) वेढलेलो आहोत. टिव्ही, रेडियो याच लहरींवर चालतात. इतकंच नाही तर मोबाईल फोनसारख्या तंत्रज्ञानातही यांचा उपयोग होतो. अगदी सूर्यप्रकाशासारखा नैसर्गिक स्रोतही त्याला अपवाद नाही.

पूर्वीच्या मोबाईल नेटवर्कच्या तुलनेत 5G तंत्रज्ञानात दीर्घ लहरींचा वापर करण्यात येतो. त्यामुळे एकाचवेळी अधिकाधिक उपकरणांना इंटरनेट मिळू शकतं. शिवाय, इंटरनेटचा स्पीडही जास्त असतो.

शहरी भागांमध्ये या लहरी कमी अंतर कापू शकतात. त्यामुळे 5G नेटवर्कला पूर्वीच्या नेटवर्कपेक्षा अधिक ट्रान्समीटर्स मास्टची गरज असते. ते तुलनेने जमिनीच्या अधिक जवळ उभारले असतात.

5G तंत्रज्ञानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो का?

ब्रिटनमधल्या काही शहरांमध्ये आता 5G मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, या नव्या तंत्रज्ञानासोबतच तिचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो का, हा प्रश्नही विचारला जातोय.

दक्षिण कोरिया, स्पेन, स्वित्झरलँडसारख्या काही देशांमध्ये आणि अमेरिकेतल्या काही प्रातांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे आणि येत्या दोन-चार वर्षात इतरही देशांमध्ये 5G मोबाईल सेवा सुरू होणार आहे. असं असताना या तंत्रज्ञानाविषयी कोणती चिंता भेडसावत आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी काही ठोस पुरावे आहेत का?

सर्व मोबाईल फोन तंत्रज्ञानात वापरण्यात येणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींमुळे अनेकांना आरोग्याची काळजी वाटू लागली आहे. काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर होण्याची भीती काहींना वाटते.

2014 साली जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं होतं, "मोबाईल फोनच्या वापरामुळे आरोग्यावर कुठलेही दुष्परिणाम होत असल्याचं आढळलेलं नाही."

असं असलं तरी इंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) या संस्थेसह जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रेडियो फ्रिक्वेंसी रेडिएशनमुळे (ज्याचा मोबाईल सिग्नल हादेखील एक भाग आहे.) 'कॅन्सर होण्याचा धोका उद्भभू शकतो' असं म्हटलेलं आहे.

5G ट्रान्समीटरची भीती बाळगावी का?

5G तंत्रज्ञानासाठी अनेक नवीन बेस स्टेशन्स गरजेचे आहेत. हे बेस स्टेशन्स म्हणजेच ट्रान्समीटर् किंवा मास्ट. या ट्रान्समीटरवरून मोबाईल फोनचे सिग्नल पाठवले किंवा स्वीकारले जातात.

मात्र, ट्रान्समीटरची संख्या वाढल्यामुळे 4G तंत्रज्ञानापेक्षा 5G एन्टेनामधून निघणाऱ्या रेडिएशनची पातळी कमी असेल.

मोबाईल फोनच्या बेस स्टेशनसंबंधीच्या (टॉवरसंबंधीच्या) ब्रिटन सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की सार्वजनिक ठिकाणी रेडिओ फ्रिक्वेन्सी फिल्ड नियमात आखून दिलेल्या पातळीपेक्षा खूप कमी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)