आरोग्य: आळशी असण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

पांडा Image copyright Getty Images

आळस हा माणसाचा शत्रू आहे, हे वाक्य अगदी प्राथमिक शाळेपासून सर्वांनीच घोकलं असेल. मात्र, तुम्हा-आम्हाला वाटतो तितका आळस वाईट नाही. उलट त्याचे काही फायदेही आहेत. काही संशोधनातूनही हे सिद्ध झालेलं आहे.

ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न शहरात राहणाऱ्या लुसी ग्रॅन्सबरी अभिनेत्री आणि कॅबरे डान्सर आहेत. आपण अत्यंत आळशी आहोत, असं त्या उघडपणे सांगतात. इतकंच नाही तर आळशी असण्याचा त्यांना अभिमानही आहे.

स्वतःविषयी आणि आपल्यासारख्याच इतर आळशी व्यक्तींविषयी त्या म्हणतात, 'मला अनावश्यक गोष्टींवर वेळ खर्च करणं बिल्कुल खपत नाही. बहुतेक आळशी लोक असेच असतात. फालतू गोष्टींसाठी आमच्याकडे वेळच नसतो.'

बऱ्याचदा असं होतं की एखाद्या गोष्टीचा आळस केला तर त्या व्यक्तीच्या मनात अपराधीपणाची भावना येते.

पण लुसी यांचा आळसाबाबतचा दृष्टिकोन वेगळा आहे. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुम्ही आळशी आहात तर आळसाचे फायदे काय आहे ते जाणून घ्या.

'आळशीपणा वाटतो तितका वाईट नाही'

आळशीपणाचे फायदे सांगताना लुसी म्हणतात, "आळशी माणसांचं कौतुक झालं पाहिजे. कारणं एखादं काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल, याकडे आमचं जास्त लक्ष असतं."

Image copyright Getty Images

आळशीपणाकडे सर्वसाधारणपणे नकारात्मक दृष्टीने बघितलं जातं. मात्र, ही सकारात्मक गुणवत्ता असल्याचं लुसी यांचं मत आहे. याची कारणं देताना त्या म्हणतात, आळशीपणामुळे तुम्ही -

1. कामांचा प्राधान्यक्रम अधिक उत्तमरीत्या ठरवू शकता.

2. तुम्ही एनर्जी एफिशियंट बनता.

3 आणि दुसऱ्यांदा पुन्हा तेच काम करावं लागू नये, म्हणून पहिल्याच प्रयत्नात काम यशस्वीपणे कसं पूर्ण करता येईल, याचा जलद मार्ग शोधण्यात आळशीपणाची मदतच होते.

आळशीपणा की लाईफ हॅक्स?

घरातली दैनंदिन काम करण्याचा अनेकांना कंटाळा येतो. लुसी यांनाही येतो. मात्र, ही कामं वेळ वाया न घालवता पूर्ण करण्यासाठी त्यांनी काही हॅक्स म्हणजे क्लृप्त्या शोधून काढल्या आहेत.

  • आंघोळ करतानाच बाथरूम स्वच्छ करणं.
  • कपड्यांना इस्त्री करत बसण्यापेक्षा सरळ ब्लो-ड्राय करणं. हे अगदी झटपट होतं.
  • झोपून उठल्यानंतर अंथरूण-पांघरुण आवरण्यापेक्षा त्या गादीवर लोळतच आंथरूण नीट करतात.

ही अगदी छोटी-छोटी कामं वाटत असली तरी घरी अशी कितीतरी कामं असतात, जी अशापद्धतीने स्मार्टली झटपट करतात येऊ शकतात.

आळशीपणा शोधाची जननी?

आळस हीच शोधाची जननी असल्याचा लुसी यांचा दावा आहे.

त्या म्हणतात, "याचं सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे 'चाक'. वस्तू एका ठिकाणाहून दुसरीकडे ओढत नेणं, फार अवघड आणि मेहनतीचं काम होतं. यातूनच चाकाचा शोध लागला. शोध खरंतर सोयीची एक पद्धत आहे. उदाहणार्थ टेलिफोन - शेजारच्याला हेलो म्हणायचं असेल तरी पार त्याच्या घरापर्यंत जावं लागायचं."

आळशीपणाचं इतकं कौतुक करणाऱ्या लुसी एकट्या नाहीत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऑफिसात आळशीपणा का येतो?

मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेट्ससुद्धा म्हणतात की 'कठीण काम करण्यासाठी मी आळशी माणसाची निवड करेन. कारण अवघड काम करण्याचा सर्वांत सोपा मार्ग ते शोधून काढतील.'

'आळशीपणामुळे मेंदू अधिक कार्यक्षम होतो'

ऑक्सफोर्ड विद्यापीठातले प्राध्यापक मसूद हुसैन यांनी केलेल्या एका संशोधनात असं आढळलं की आळशीपणा मेंदूला अधिक कार्यक्षम बनवू शकतो.

आळशी व्यक्तींचा मेंदू आणि आळशी नसणाऱ्यांचा मेंदू यात कोणते फरक असू शकतात, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी एका प्रयोगाची रचना केली.

प्रयोगात सहभागी झालेल्या व्यक्तींना त्यांनी एक प्रश्नावली दिली. प्रश्नावलीच्या उत्तरांच्या आधारे त्यांनी या व्यक्तींना उत्साही किंवा प्रोत्साहित (motivated), निरुत्साही(apathetic) आणि मधले अशा तीन प्रकारांमध्ये विभागलं.

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किती परिश्रम घ्यावेत याबाबत ही चाचणी होती. विशिष्ट मोबदला मिळवण्यासाठी किती परिश्रम करावेत याचं गुणोत्तर ठरवावं अशी जबाबदारी या समूहातल्या लोकांकडे दिली होती. त्यातून असं लक्षात आलं की आपण आळशी आहोत असं म्हणणाऱ्या लोकांनी उत्तर काय द्यावं याबाबत अधिक विचार केला होता.

या प्रयोगातून काय निष्कर्ष निघाला?

आळशी व्यक्तींच्या मेंदूने अधिक ऊर्जा खर्च केली, असं दिसलं.

मोबदला मिळवण्यासाठी आळशी व्यक्तींचा गट फार मेहनत घेणार नाही, अशी शक्यता होती आणि त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखंही नव्हतं. मात्र, जेव्हा या आळशी व्यक्तींचा मेंदू स्कॅन करण्यात आला. तेव्हा संशोधकांना आश्चर्याचा धक्का बसला.

प्राध्यापक हुसैन म्हणाले, "निरुत्साही व्यक्तींचे मेंदू उत्साही व्यक्तींच्या मेंदूंपेक्षा वेगळे होते. हे वेगळेपण मेंदूच्या रचनेत नव्हतं. तर निर्णय घेत असताना त्यांच्या मेंदूतल्या हालचालीत बराच फरक आढळला."

Image copyright Getty Images

ते पुढे सांगतात, "आश्चर्य म्हणजे त्या परिस्थितीत निरुत्साही लोकांचा मेंदू उत्साही लोकांच्या मेंदूपेक्षा अधिक अॅक्टिव्ह होता."

"या ब्रेन अॅक्टिव्हिटीवरून कळलं की त्यांना निर्णय घेणं अधिक अवघड जात होतं. निर्णय योग्य आहे की नाही, हे ठरवण्यासाठी त्यांचा मेंदू अधिक काम करत होता."

"उत्साही व्यक्तींच्या मेंदूंपेक्षा हे अधिक मेहनतीचं काम होतं. शिवाय, मेंदुतल्या हालचालींसाठी त्याला इंधन लागतं. निर्णय घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेंदूतली शर्करा, ऊर्जा खर्च करावी लागती. तुमचे न्यूरॉन्स अॅक्टिव्ह होतात तेव्हा त्यांना ऊर्जेची गरज असते."

आपण काय करणार नाही, हे ठरवण्यासाठी आळशी व्यक्तींचा मेंदू अधिक ऊर्जा खर्च करत असेल तर अशा परिस्थितीत आळशीपणाकडे दुर्गुण म्हणून का बघावं?

बालवयातले संस्कार

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस रेडियोवरच्या 'The Why Factor' या कार्यक्रमात बीबीसीच्या कॅथरिन कार यांनी आळशीपणाकडे लोक दुर्गुण म्हणून का बघतात, या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

केंब्रिजमधल्या एका फिटनेट क्लासमध्ये कॅथरिन एका महिलेला भेटल्या. त्यांनी सांगितलं की अंथरुणात लोळत राहण्यापेक्षा त्या या अतिशय थंड अशा ठिकाणी व्यायाम करण्यासाठी येतात कारण, "त्यांना हे खूप आवडतं आणि ही दिवसाची सर्वोत्तम सुरुवात आहे."

सकाळी मॉर्निंग वॉकला जाणं चांगली सवय मानली जाते. तर आळसात लोळत पडणं ही वाईट सवय मानली जाते. हे असं का झालं यावर कॅथरिन आपलं मत मांडतात.

"लहापणापासून तुम्हाला हेच शिकवलं जातं. आळस करणं नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे. तुम्ही सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे, असं माझ्या मनावर बिंबवण्यात आलं आहे. मला वाटतं माझे पालक आणि समाजानेच मला हे शिकवलं. तुम्ही कायम काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी मिळवलं पाहिजे," कॅथरिन सांगतात.

Image copyright Getty Images

फिटनेस क्लासमधल्या आणखी एका स्त्रीचंही हेच म्हणणं होतं. त्या म्हणतात, "आळशीपणा चांगला नाही, असंच समाजाचं मत आहे. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हालाही अंथरूणात पडून राहण्याची परवानगी नसायची. कारण, ते वाईट समजलं जायचं. आमचे आई-वडील आम्हाला सकाळी लवकर उठवायचे. अगदी सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा. कारण आम्हाला उठून आमची कामं आटपायची असायची."

'आळशीपणा हा गुन्हा'

केंब्रिज विद्यापीठात तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी) विषयाचे प्राध्यापक आणि या विषयावर संशोधन करणारे प्राध्यापक अॅनास्टेजिया बर्ज यादेखील मान्य करतात की जुन्या काळात हा दृष्टिकोन इतका पक्का होता की आळशीपणासाठी कठोर शिक्षा केली जाते.

Image copyright Getty Images

"सोव्हिएत युनियनमध्ये आळशीपणासाठी कठोर शिक्षा असायची. आळशीपणा सामाजिक कीड आहे, असं त्याकाळी मानलं जायचं."

"कवी जोसेफ ब्रॉड्स्की, ज्यांना पुढे नोबेल पारितोषिक मिळालं, त्यांनी सोव्हिएत युनियन सोडल्यावर त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता आणि तुम्ही काय करता?, तुमचं काम काय? तुमचा व्यवसाय काय? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते."

"ते म्हणाले, 'मी कवी आहे.' मात्र, हे न्यायाधीशांच्या आकलनाच्या पलीकडचं होतं. परिणामी ब्रॉड्सकी यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावत हद्दपार करण्यात आलं. यानंतर त्यांची रवानगी अशा ठिकाणी झाली जिथे ते थोडीफार कविता करू शकायचे."

आळशीपणा म्हणजे मानसिक आरोग्याची काळजी?

मात्र, लोकांचा हाच दृष्टिकोन आउटडेटेड आणि मानसिक आरोग्यासाठी अपायकारक असल्याचं ल्युसी यांना वाटतं.

त्या म्हणतात, "सर्वांपासून काही काळ दूर राहणं, डिसकनेक्ट होणं आणि थोडा शांत वेळ, हा तुमचा मेंदू आणि शरीर स्वीच ऑफ करण्याच्या कामी मोलाची कामगिरी बजावतो. म्हणजेच थोडीतरी वामकुक्षी घ्यावी किंवा थोडावेळ तरी अंथरुणात लोळत पडावं."

"आपली पिढी प्रत्यक्षात स्व-देखभालीचे हे क्षण टिपते आणि आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेते. काही लोक याला 'थोडावेळ आळशी' होणं म्हणू शकतील."

हल्ली कठोर परिश्रम करूनही त्याचा हवा तेवढा मोबदला मिळत नाही, असं लुसी यांना वाटतं.

त्या म्हणतात, "60 वर्षं काम करूनही आपलं कर्ज फिटत नाही."

त्यामुळे आपण 'आळशी' असण्याचं लुसी यांना अजिबात वाईट वाटत नाही. इतकंच नाही तर इतरांनीही आळशीपणाचे फायदे जाणून घ्यावे, यासाठी त्या प्रयत्न करतात.

त्या म्हणतात, "आपण कोणत्या प्रकारची जीवनशैली टिकवून ठेवू शकतो आणि आयुष्यभर कोणती जीवशैली टिकवून ठेवण्याची आपली क्षमता आहे, याकडे आजच्या पीढीचा कल आहे. स्वतःचं शरीर आणि मना विषयीची जागरुकता आहे. यात स्वतःसाठी थोडा वेळ काढणं, याचाही समावेश आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)