जगभरात शहरांची रचना करताना स्त्रियांच्या गरजांकडे दुर्लक्ष होतं?

बार्सिलोना, Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बार्सिलोना शहराचं दृश्य

शहर तिथे राहणाऱ्या प्रत्येकाचं असतं. मात्र, खोलात जाऊन विचार केला तर ही शहरं खरंच प्रत्येकासाठी असतात का? असा प्रश्न पडतो.

स्त्रियांच्या दृष्टीने विचार केला तर शहर उभारणीत सहसा स्त्रियांचा विचार केला जात नाही, अशीच स्थिती आहे. अगदी विकसित राष्ट्रांमध्येही हीच परिस्थिती पहायला मिळते.

अनेक पिढ्यांपासून शहर उभारणीचं काम पुरुषांच्याच हातात आहे. त्यामुळेही महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असतं. मात्र, स्पेनच्या बार्सिलोना शहरात 'स्त्रियांचा विचार करुन शहर' उभारणीसाठी काही वेगळे प्रयत्न सुरू आहेत.

नगररचनेच्या दृष्टीने बार्सिलोनाला जगातल्या सर्वाधिक यशस्वी शहरांपैकी एक मानलं जातं. याच बार्सिलोनामध्ये आता नव्याने काही प्रयोग सुरू आहेत.

गेल्या चार वर्षांपासून शहराला महिला महापौर आहेत आणि त्यांनी फेमिनिस्ट अजेंडा नेटाने लावून धरला आहे.

बार्सिलोनाच्या शहर रचनेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या अशाच काही महिलांशी बीबीसीच्या प्रतिनिधींनी संवाद साधला आणि शहरं स्त्रीसुलभ करण्याच्या दृष्टीने कोणती पावलं उचलायला हवी, याविषयी जाणून घेतलं.

1. चारचाकी वाहनांवर नियंत्रण (Kill the Car)

जॅनेट सॅन्झ बार्सिलोनाच्या शहरीकरण विभागाच्या सल्लागार आणि Kill the Car योजनेच्या जनक आहेत. शहरातल्या रंगीबेरंगी चित्र असलेल्या मोकळ्या रस्त्यावरून फिरत त्यांनी आमच्याशी बातचीत केली.

त्या सांगत होत्या, "बार्सिलोना शहरातली 60% सार्वजनिक जागा चारचाकी वाहनांनी व्यापली आहे. या जागेची पुनर्आखणी केल्यास ज्यांना आजवर या जागेचा वापर करता आला नाही किंवा ज्यांना या जागेत आजवर प्रवेश मिळाला नाही, अशा लोकांना ही जागा वापरायला मिळू शकते."

यासाठी बार्सिलोनाने 'सुपरब्लॉक' ही संकल्पना राबवली आहे. सुपरब्लॉक हे जुन्याच रस्त्यांची पुनर्रचना करून तयार करण्यात आलेलं वाहतुकीचं नवीन मॉडेल आहे.

बार्सिलोना शहरातल्या वसाहती चौकोनी आकारात उभारल्या आहेत. याला 'ग्रीड लेआउट' म्हणतात. या ग्रीड लेआउटमधले 9 ब्लॉक मिळून एक सुपरब्लॉक तयार केला जातो. सुपरब्लॉकमध्ये वाहनांना प्रवेश निषिद्ध आहे. वाहनांसाठी सुपरब्लॉकच्या बाहेरून रस्ता आहे. ज्या गाड्यांना या ब्लॉकमध्ये जायचं असतं, केवळ त्याच गाड्यांना आत प्रवेश दिला जातो. त्यातही ताशी दहा किमीची वेगमर्यादा पाळणं बंधनकारक आहे. इतकंच नाही तर या सुपरब्लॉकमध्ये अंडरग्राउंड पार्किंगची सोय आहे.

प्रतिमा मथळा इथे स्पीड लिमिट 10 किलोमीटर आहे

अशापद्धतीने कधीकाळी वाहनांची गर्दी असलेले हे रस्ते आता पार्क, पिकनिक बेंचेस आणि प्ले-एरिया म्हणून वापरले जातात.

सॅल्वाडोर रुएडा यांनी सर्वप्रथम सुपरब्लॉकची संकल्पना मांडली. पब्लिक स्पेस तयार करणं आणि हवेचं प्रदूषण टाळणं, हा त्यामागचा उद्देश होता.

मात्र, जॅनेट सॅन्झ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संकल्पनेला फेमिनिस्ट ट्विस्ट दिला. या मोकळ्या रस्त्यांवर आता स्त्रिया मोठ्या प्रमाणावर दिसतात.

बार्सिलोनामध्ये सध्या असे 6 सुपरब्लॉक्स आहेत. ही संख्या 500 वर नेण्याचा जॅनेट यांचा मानस आहे.

2. गैरवर्तणुकीला लगाम

बार्सिलोना उत्सवप्रिय शहर आहे. इथल्या लोकांना पार्टी कल्चर आवडतं. दिवस असो किंवा रात्र प्रत्येकाला सार्वजनिक ठिकाणी मौजमजा करण्याचा अधिकार आहे, असं इथल्या महापौरांना वाटतं.

अशावेळी तरुणींची छेड काढणं, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार अशा घटना घडण्याची भीती असते. अशा गैरवर्तणुकीला आळा घालण्यासाठी बार्सिलोनाने 'Purpul Spot' ही संकल्पना राबवली आहे.

कुठेही उत्सव सुरू असला किंवा तरुण मंडळी मिळून रस्त्यावर पार्टी करत असतील तर तिथे तुम्हाला 'Purpul Spot' नक्कीच दिसेल.

हे मदत केंद्र आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलेशी गैरवर्तवणूक झाल्यास हे मदत केंद्र धावून येतं.

लॉरा मार्टी मार्टोरेल या पर्पल स्पॉटमधल्या इतर अनेक माहिती अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. रात्री रस्त्यावर चालणाऱ्या पार्ट्यांवर त्या लक्ष ठेवून असतात. सिटी काउंसिलने 'No es No' (नाही म्हणजे नाही) या नावाचं एक अॅपही काढलं आहे.

लॉरा सांगतात, की या अॅपवर तुम्ही तुमची ओळख गुप्त ठेवून तुमच्यावर झालेल्या किंवा तुमच्यासमोर घडलेल्या लैंगिक गैरवर्तनाची तक्रार नोंदवू शकता.

3. सार्वजनिक स्वच्छतागृह

स्वच्छतागृहांची अपुरी संख्या - या समस्येचा जगातल्या जवळपास सर्वच भागातल्या महिलांना सामना करावा लागतो. पुरूषांपेक्षा महिला स्वच्छतागृहांमधली रांग नेहमीच मोठी असते. यामागे अनेक कारणं आहेत.

पुरूष मंडळी उभ्या उभ्या हे काम आटोपतात. स्त्रियांना मात्र बसावं लागतं. त्यात जास्त वेळ जातो. दुसरं म्हणजे मासिक पाळी, गर्भावस्था अशा कारणांमुळे स्रियांना पुरूषांपेक्षा जास्त वेळा स्वच्छतागृहांचा वापर करावा लागतो. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे जगात सर्वत्र प्रायमरी केअर टेकर स्त्रीच असते. त्यामुळे मुलांना स्वच्छतागृहात नेण्याचं काम हे तिचंच असतं. अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांना स्वच्छतागृहांची गरज जास्त असते.

Point 6 च्या ब्लँसा व्हॅल्डिव्हिया सांगतात, "अनेक मातांनी आम्हाला सांगितलं, की त्या सार्वजनिक स्वच्छतागृहात जात नाहीत. कारण लहान मुलांची प्रॅम आत जाऊ शकत नाही. म्हणजे प्रॅम जात नाही या क्षुल्लक कारणामुळे त्या स्वच्छतागृहात जाणं टाळतात."

प्रतिमा मथळा सार्वजनिक स्वच्छतागृह

Point 6 ही नगररचनाकारांची टीम आहे. स्त्री आणि पुरूष दोघांसाठी शहरात कोणत्या सोयी-सुविधा असायला हव्या, यासाठी ही संस्था काम करते.

टॉयलेट क्युबिकल पुरूषांच्या युरिनल्सपेक्षा दोन ते तीन पट जास्त जागा घेतात. याचाच अर्थ महिलांसाठीची स्वच्छतागृह पुरुषांसाठीच्या स्वच्छतागृहांपेक्षा तिप्पट मोठी असायला हवी आणि त्यांची संख्याही जास्त हवी. मात्र, शहररचनेत याचा विचारच केला जात नाही, असं व्हॅल्डिव्हिया यांचं म्हणणं आहे.

4. खेळाची मैदानं

खेळाची मैदानं कुठल्याही शहरासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. मुंबईसारख्या मोठ्या महानगरात खेळाची मैदानं कमी होत आहेत. खेळाची मैदानं वाचवण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक रहिवासी पुढाकार घेत असल्याच्या बातम्या तर रोजच्याच आहेत. बार्सिलोना शहरातही या मैदानासाठी चाकोरीबाहेरचा विचार होत आहे.

Equal Saree ही संस्था खेळाची मैदानं उभारते. या संस्थेचे आर्किटेक्ट डॅफ्ने सलडाना सांगतात, "मैदानाच्या डिझाईनचा नीट विचार केला जात नाही. त्यामुळे बऱ्याचदा खेळाच्या मैदानात मधोमध एक मोठी मोकळी जागा दिली जाते. बॉल किंवा मोठी जागा लागणाऱ्या तत्सम खेळासाठी ती भलीमोठी मोकळी जागा वापरली जाते. उदाहरणार्थ- फुटबॉल. अशावेळी इतर खेळांसाठी जागाच उरत नाही."

प्रतिमा मथळा खेळाच्या मैदानांचा विचार या महिलांचा गट करतो.

या संस्थेने नुकतीच बार्सिलोनाच्या उपनगरामध्ये एक पडीक जमीन खरेदी केली आणि त्यावर खेळाचं मैदान बांधलं. पेंट, वेगवेगळ्या फरशा, झाडं आणि फर्निचर यांचा खुबीने वापर करत जागा विभागली. त्यामुळे या मैदानात बरेच खेळ एकाचवेळी खेळले जाऊ शकतात.

शहरं स्त्रीसुलभ करण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'ऐकणे'. शहरात कोणत्या सुविधा असाव्या, असं तुम्हाला वाटतं हा प्रश्न जेव्हा तरुण मंडळी, वयोवृद्ध, स्त्री, पुरूष असा सर्वांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरात एक गोष्ट सारखी होती. ती म्हणजे 'बेंच'

5. बेंच

Point 6च्या ब्लँका व्हॅल्डिव्हिया म्हणतात, "सार्वजनिक ठिकाणी ठेवली जाणारी वस्तू यापलिकडेही बेंचला महत्त्व आहे. म्हातारी माणसं, आजारी व्यक्ती, अपंग आणि लहान मुलं असलेल्या मातांसाठी बेंच ही गरज आहे. "

प्रतिमा मथळा शहरात अशा जागा आहेत का?

"सार्वजनिक ठिकाणी बेंचची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे अनेक जण सार्वजनिक ठिकाणांचा वापरच करत नाहीत."

हे कळल्यावर बार्सिलोनाच्या प्रशासनाने शहराजवळच्या एका परिसरात तब्बल 500 बेंच बसवलेत.

6. (रस्त्याच्या) नावात काय आहे?

शहर स्त्रियांसाठी सुरक्षित असणं गरजेचं आहे. मात्र, त्याहूनही शहर आपली दखल घेतं ही भावना स्त्रियांमध्ये निर्माण होणं अधिक गरजेचं आहे, असं बार्सिलोनाच्या स्थानिक प्रशासनाला वाटतं.

कुठल्याही शहरात सामान्यपणे पुरूषांचेच पुतळे दिसतात. रस्त्यांना पुरुषांचीच नावं असतात.

जगातल्या सात मोठ्या शहरांमध्ये एक सर्व्हे करण्यात आला. त्यात असं आढळलं की केवळ 27.5% रस्त्यांनाच महिलेचं नाव देण्यात आलं होतं.

प्रतिमा मथळा शहरांच्या नावात काय आहे?

बार्सिलोनाने याची दखल घेतली आणि यापूर्वीच्या महापौरांनी शहरातल्या जवळपास निम्म्या रस्त्यांना महिलांची नावं दिली.

नव्या महापौरांनी एक पाऊल पुढे टाकत जवळपास 60 टक्के रस्त्यांना महिलांची नावं दिली आहेत.

नगररचनेसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या बार्सिलोनाने गेल्या काही वर्षात स्त्रीसुलभ शहरीकरणाच्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे स्त्री आणि पुरूष दोघांचीही बरोबरीनं काळजी वाहणारं आणि सेक्सिस्ट नसलेलं भविष्यातलं शहर कसं असू शकतं, याची एक झलक बार्सिलोनामध्ये नक्कीच बघायला मिळते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)