'Ice Eggs': समुद्रकिनारी आढळली शेकडो 'बर्फाची अंडी', निसर्गाची करणी

बर्फाची अंडी Image copyright RISTO MATTILA

फिनलँड आणि स्वीडनच्या मध्ये असलेल्या एका बेटावर 'बर्फाची अंडी' आढळली आहेत. तज्ज्ञांच्या मते ही हवामानाची एक दुर्मिळ प्रक्रिया आहे.

या प्रक्रियेत वारा आणि पाणी यांच्या माऱ्यामुळे बर्फाचे छोटे-छोटे तुकडे एकमेकांवर आदळून त्यातून अंड्याचा आकार तयार होतो.

फिनलँड आणि स्वीडनच्या मध्ये असलेल्या बोथनिया खाडीतल्या हेल्युओटो बेटावर रिस्तो मॅतिला या हौशी फोटोग्राफरने या बर्फाच्या अंड्यांचे फोटो काढले आहेत. आपण यापूर्वी असं कधीही बघितलेलं नव्हतं, असं मॅतिला यांनी बीबीसीला सांगितलं.

ते म्हणाले, "मी माझ्या पत्नीसह मर्जानिएमी किनाऱ्यावर फिरत होतो. आकाश निरभ्र होतं. तापमान उणे 1 अंश सेल्सियस (32F) होतं आणि त्या दिवशी बऱ्यापैकी वारं होतं."

"आणि तेवढ्यात आम्हाला हे आश्चर्य दिसलं. बीचवर पाण्याजवळ हिम आणि बर्फाची अंडी होती."

किनाऱ्यालगत जवळपास 30 मीटरपर्यंत (100 फूट) ही अंडी पसरली होती. यातली सर्वांत लहान अंडी छोट्या अंड्याच्या आकाराएवढी होती. तर मोठी अंडी फुटबॉलच्या आकाराएवढी होती.

मॅतिला म्हणतात, "ते आश्चर्यचकित करणारं दृश्य होतं. या परिसरात मी गेली 25 वर्षं राहतोय. मात्र, मी असं दृश्य पूर्वी कधीही पाहिलं नाही."

"माझ्याकडे कॅमेरा होता. हा विलक्षण देखावा पुढच्या पिढीलाही बघता यावा, म्हणून तो मी माझ्या कॅमेऱ्याने टिपून घेतला."

Image copyright EKATERINA CHERNYKH

वातावरण थंड असेल आणि वारे वाहत असतील, तेव्हा अशाप्रकराचे बर्फाचे बॉल्स तयार होतात, अशी माहिती बीबीसीचे हवामान तज्ज्ञ जॉर्ज गुडफेलो यांनी दिली.

ते म्हणाले, "साधारणपणे बर्फाच्या मोठ्या शीटचे तुकडे होऊन ते लाटांमुळे जोरजोराने एकमेकांवर आदळले जातात आणि त्यांना असा गोलाकार मिळतो."

"समुद्राच्या पृष्ठभागावरचं पाणी गोठतं तेव्हा मोठ्या संख्येने अशी अंडी तयार होतात आणि ती अधिक गुळगुळीत बनतात. हे बर्फाचे गोळे लाटांमुळे किंवा ओहटीमुळे समुद्रकिनारी फेकले जातात."

रशिया आणि शिकागोच्या मिशिगन लेकच्या किनाऱ्यावर यापूर्वीही अशी बर्फाची अंडी आढळली होती.

2016 साली सायबेरियाच्या न्यादा समुद्रकिनाऱ्यावर जवळपास 18 किमीपर्यंत स्नो आणि बर्फाचे मोठ-मोठे बॉल आढळले होते. टेनिस बॉलच्या आकारापासून ते 1 मीटर व्यासाइतके मोठे बॉल्स त्यावेळी दिसले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)