प्राध्यापकाच्या बॅगमध्ये आढळला त्यांच्या प्रेयसीचा हात, दिली खुनाची कबुली

ओलेग सोकोलोव्ह Image copyright EPA

इतिहासाचे अभ्यासक असलेल्या एका प्राध्यापकाने आपल्या प्रयेसीचे तुकडे-तुकडे करून तिचा खून केला. या तुकड्यांची व्हिलेवाट लावताना त्यांना अटक झाली आहे.

ओलेग सोकोलोव्ह (63) असं या रशियाच्या प्राध्यापकाचं नाव असून त्यांनी स्वतःचा गुन्हा कबूलही केल्याचं आणि या कृत्याचा पश्चाताप असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं आहे.

अॅनास्तॅसिया येशचेन्को (24) असं मृत तरुणीचं नाव आहे. ती प्रा. सोकोलोव्ह यांची विद्यार्थिनी होती. पुढे दोघं प्रेमात पडले.

एका क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यातच आपण तिचा खून केला आणि नंतर तिचं शीर, हात आणि पाय कापल्याचं सोकोलोव्ह यांनी पोलिसांना सांगितलं.

सोकोलोव्ह मद्यधुंद अवस्थेत प्रेयसीच्या हाताची व्हिलेवाट लावण्यासाठी तो हात बॅकपॅकमध्ये टाकून नदीकडे गेले असता नदीत पडले, अशी माहिती स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे.

नंतर पोलिसांना सोकोलोव्ह यांच्या घरून येशचेन्को यांचा तुकडे-तुकडे केलेला मृतदेह सापडला.

मृतदेहाची विल्हेवाट लावून नंतर नेपोलियनच्या वेशात सार्वजनिक ठिकाणी आत्महत्या करण्याचा आपला विचार होता, असंही त्यांनी म्हटलं आहे.

प्रा. सोकोलोव्ह यांच्यावर सध्या हायपोथर्मियासाठी (शरीराचं तापमान अत्याधिक कमी होणं) उपचार सुरू आहेत. वाद झाला त्यावेळी ते तणावात असतील, असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे.

Image copyright Getty Images

प्रा. सोकोलोव्ह हे नेपोलियन बोनापार्टचे अभ्यासक आहेत. त्यांनी नेपोलियनवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. अनेक सिनेमांसाठी त्यांनी इतिहासविषयक सल्लागार म्हणून काम केलं आहे. फ्रान्स सरकारने त्यांचा पुरस्कार देऊन गौरवही केला आहे.

त्यांनी आणि त्यांच्या प्रेयसींनी मिळूनही काही पुस्तकं लिहिली आहेत. फ्रान्सचा इतिहास दोघांच्याही अभ्यासाचा विषय होता. दोघांनाही ऐतिहासिक व्यक्तीरेखांसारखे कपडे परिधान करण्याची आवड होती. प्रा. सोकोलोव्ह यांना नेपोलियनची वेशभूषा विशेष आवड आहे.

प्रा. सोकोलोव्ह विषयी बोलताना त्यांचे विद्यार्थी सांगतात की ते खूप विद्वान प्राध्यापक आहेत. त्यांना फ्रेंच येतं, त्यांचं नेपोलियन विषयावर प्रभुत्व आहे.

मात्र, सोबतच ते 'विचित्र' आहेत, असंही काही जण म्हणाले. ते आपल्या प्रेयसीला 'जोसेफीन' म्हणायचे. जोसेफिन नेपोलियनची पहिली पत्नी आणि सम्राज्ञी होती. आपल्या प्रेयसीला ते मला "सर" म्हणायचं, असं सांगायचे.

फ्रान्स इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्सचे (Issep) ते सदस्य होते. मात्र, त्यांना या पदावरून काढून टाकण्यात आलं आहे.

संस्थेने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे, "ओलेग सोकोलोव्ह यांनी जो निघृण गुन्हा केला आहे, त्या भंयकर कृत्याची माहिती आम्हाला मिळाली."

"ते असं नीच कृत्य करू शकतात, याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)