हिलरी क्लिंटन पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आव्हान देण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव आहे, असं हिलरी क्लिंटन यांनी बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.
डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या माजी उमेदवार यांनी बीबीसीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, "कुठलीच शक्यता फेटाळून लावता येत नाही. कधीही काहीही होऊ शकतं.''
72 वर्षांच्या क्लिंटन यांनी म्हटलं, "मी नेहमी विचार करत असते, की 2016 साली ट्रंप यांना हरवलं असतं तर मी कशाप्रकारची राष्ट्राध्यक्ष झाले असते.
2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी 17 डेमोक्रॅट्सनी पक्षाचं नेतृत्व करण्याची तयारी दर्शवलेली आहे.
लंडनमधल्या पुस्तक दौर्यात बीबीसी रेडिओ 5 लाइव्हच्या एम्मा बार्नेट यांनी हिलरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी हिलरी पुन्हा निवडणुका लढवणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
माजी परराष्ट्र मंत्री, न्यूयॉर्कच्या सिनेटर आणि अमेरिकच्या माजी 'फर्स्ट लेडी' यांनी सांगितलं, की "मी नेमकी कशा प्रकारची राष्ट्राध्यक्ष झाले असते, मी काय वेगळी कामं केली असती आणि त्याचा आपल्या देशाला आणि जगाला काय फायदा झाला असता याचा मी नेहमीच विचार करते.''
"हो, मी नक्कीच याचा सतत विचार करते. येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून येणाऱ्या व्यक्तिवर जे काही मोडकळीला आलं आहे, ते नव्यानं उभारण्याची जबाबदारी आहे.''
शेवटच्या क्षणी निवडणुकीत उडी घेणार का, या प्रश्नावर त्यांनी म्हटलं, "मी मघाशी म्हणाले तसं कधीच कुठलीही शक्यता फेटाळून लावता येत नाही. मी अगदी खरं सांगते, माझ्यावर खूप खूप खूप लोकांचा दबाव आहे यासाठी.''
त्यांनी पुढं म्हटलं, की पण आता या क्षणी तुमच्या स्टुडिओत बसून तुमच्याशी बोलणं हे नक्कीच माझ्या प्लॅनमध्ये नव्हतं.
क्लिटंन यांनी त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे आणि तिसऱ्यांदा त्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का, याविषयी काहीही विस्तृत भाष्य केलं नाही.
हिलरी क्लिंटन यांनी त्यांची मुलगी चेल्सी क्लिंटन यांच्यासोबत The Book of Gutsy Women हे पुस्तक लिहिलं आहे. लंडनमध्ये या पुस्तकाच्या प्रसिद्धी कार्यक्रमानिमित्त त्यांनी मुलाखत दिली.
ट्रंप यांना कोणाचं आव्हान?
डेमोक्रॅटिक पक्षामध्ये उमेदवार निवडीची चुरस अजून सुरूच आहे कारण राज्यनिहाय मतांमधूनच फेब्रुवारी महिन्यात ट्रंप यांच्या आयोवामधील वर्चस्वाला कोण आव्हान देईल, हे स्पष्ट होईल.
ज्यो बायडेन यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळं न्यूयॉर्कचे माजी महापौर मायकल ब्लूमबर्ग यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी प्रोत्साहीत केलं जात आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे निकटवर्तीय असलेले मॅसाचुसेट्सचे गव्हर्नर डेवल पॅट्रिकही या शर्यतीत उडी घेण्याच्या विचारात आहेत.
फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी न्यू हॅम्पशायरसारख्या अनेक राज्यांतल्या प्राथमिक मतपत्रिका भरण्याची अंतिम तारीख उलटून गेली आहे. अलाबामासाठीची अंतिम मुदत गेल्याच आठवड्यात उलटून गेली आहे. तर क्लिंटन यांचा राजकीयदृष्ट्या आवडता भाग आर्कान्साची अंतिम मुदत मंगळवारी संपली.
मार्च महिन्यातल्या प्रसिद्ध 'सुपर ट्यूसडे'ला मतदान घेणाऱ्या अन्य 14 राज्यांमध्ये मतपत्रिका भरण्याची पुढील महिन्यांपर्यंत अंतिम मुदत आहे.
क्लिंटन व्हाइट हाउसच्या शर्यतीत उडी घेतील की नाही याबद्दल वॉशिंग्टन डीसीमध्ये वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. यापैकी काही शक्यता या क्लिंटन यांनीही व्यक्त केल्या आहेत.
गेल्या महिन्यात ट्रंप यांनी क्लिंटन यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीबाबत डिवचलं होतं. त्यावर क्लिंटन यांनी 'मला डिवचू नका. तुमचं काम करा,' असं प्रत्युत्तर रीट्वीट करून दिलं.
ऑक्टोबर महिन्यात वॉशिंग्टन डीसीमधल्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमधल्या कार्यक्रमात आपल्या शेजारी बसलेल्या बायकोबद्दल माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी म्हटलं होतं, की ती कदाचित कुठल्याही शर्यतीत उडी मारेल. काही सांगता येत नाही.'
निवडणुकीला आता एक वर्षापेक्षा कमी अवधी शिल्लक आहे आणि डेमॉक्रॅटिक पक्षातून ट्रंप यांना आव्हान देण्याची तयारी सुरू आहे. अलिकडे झालेल्या मतदानात वॉरेन आणि बिडेन हे आघाडीवर आहेत. सँडर्स देखील लोकप्रिय दावेदार आहेत. इतर बरेच उमेदवार वॉशिंग्टन डीसीच्या बाहेर तुलनेने अपरिचित आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)