ट्रंप यांच्या विरोधात महाभियोगाची कारवाई सुरू, सुनावणीदरम्यान काय घडलं?

व्लादोमिर जेलिन्सिकी आणि डोनाल्ड ट्रंप Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा व्लादोमिर जेलिन्सिकी आणि डोनाल्ड ट्रंप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात सुरू असलेल्या महाभियोगाच्या कारवाईची सुनावणी बुधवारी वॉशिंग्टन मध्ये सुरू झाली आहे.

डोनाल्ड ट्रंप यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन आणि त्यांचा मुलाविरुद्ध चौकशी करण्यासाठी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांवर दबाव आणल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ट्रंप यांनी हा आरोप फेटाळला आहे.

ज्येष्ठ मुत्सद्दी अधिकारी बिल टेलर आणि जॉर्ज केंट यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्स समोर पहिल्यांदा साक्ष दिली. केंट हे युक्रेनविषयक धोरणांचे प्रमुख आहेत. त्यांनी डोनाल्ड ट्रंप यांचे वकील रुडी जुलियानी यांच्यावर युक्रेनमध्ये असलेल्या अमेरिकन मुत्सद्दी अधिकाऱ्यांना बदनाम केल्याचा आरोप लावला आहे. जुलियानी यांच्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला असल्याचं ते म्हणाले.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनच्या दुबळेपणाचा फायदा उठवत त्यांना अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यास भाग पाडलं की नाही हा चौकशीचा मुख्य मुद्दा आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्स आणि सिनेटने मंजुरी दिल्यावर महाभियोग मंजूर होतो आणि त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पायउतार व्हावं लागतं. अमेरिकेच्या इतिहासात महाभियोगाची ही चौथी सुनावणी असून तिसऱ्यांदा या कार्यवाहीचा तपशील टीव्हीवर दाखवण्यात येत आहे.

सुनावणीदरम्यान काय झालं?

सुनावणी सुरू होताच युक्रेनमधील अमेरिकेचे राजदूत बिल टेलर यांनी म्हटलं, की बायडेन यांच्याविरोधात युक्रेनमध्ये चौकशी करण्याचे आदेश ट्रंप यांनी दिले होते.

बायडेन यांच्याविरोधात चौकशी करण्यासाठी ट्रंप यांनी मनाची तयारी केली होती असं त्यांच्या स्टाफला सांगण्यात आल्याचं टेलर यांनी म्हटलं.

Image copyright Getty Images

तसंच अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी अधिकारी जॉर्ज केंट यांनीही ट्रंप यांचे वकील रुडी गुलियानी यांनी युक्रेनमधील अमेरिकन अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

ट्रंप यांनी काय म्हटलं?

महाभियोगाची सुनावणी पाहण्यात काहीही रस नसल्याचं ट्रंप यांनी म्हटलं. आपण सुनावणी पाहत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

त्यांनी म्हटलं, "हे पाहण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. ही कारवाई पूर्वग्रहदूषित आहे. ही फसवणूक आहे."

राष्ट्राध्यक्ष ट्रंप त्यांच्या ओवल येथील कार्यालयात तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेत आहे.

डोनाल्ड ट्रंप यांच्या मोठ्या मुलाने ट्वीट करत या सुनावणीवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं, "हे सगळं ढोंग राजकीय वर्चस्ववादाचं उदाहरण आहे जे अमेरिकन लोकांना अजिबात आवडत नाही. हे लोक जनतेपासून फार दूर आहेत."

Image copyright @Erictrump

टेलर यांची साक्ष

अमेरिकन प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांनुसार डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीत संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पलोसी यांनी ट्रंप या सगळ्या प्रकरणात उत्तरदायी असल्याचं म्हटलं.

त्या म्हणाल्या, "ही आमच्या देशातील सगळ्यात गंभीर घटना आहे. ही थांबवता आली असती. राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग चालवण्यासाठी आपण इथे आलेलो नाही."

युक्रेनमधील अमेरिकेचे कार्यकारी राजदूत बिल टेलर यांनी साक्ष देताना सांगितलं, की ते आणि त्यांचे एक सहकारी आणि युरोपियन महासंघातील अमेरिकेचे राजदूत गॉर्डन सॉडलँड यांनी ट्रंपना फोन केला आणि युक्रेन चौकशीसाठी पुढे जाण्यास तयार असल्याचं सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बिल टेलर

या फोनननंतर युक्रेनबाबत ट्रंप काय विचार करत आहे अशी विचारणा त्यांच्या स्टाफमधील एका सदस्याने सॉडलँड यांना केली. त्यावर ट्रंप यांना युक्रेनपेक्षा बायडेनची काळजी जास्त आहे असं उत्तर सॉडलँड यांनी दिलं.

काही दिवसांपूर्वी ट्रंप यांनी सॉडलँड यांना ओळखण्यासही नकार दिला होता. मात्र टेलर यांच्या पहिल्या साक्षीत या फोनबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.

युक्रेनची मदत थांबवल्याचा आरोप

ट्रंप यांच्यावर युक्रेनला दिली जाणारी मदत थांबवल्याचाही आरोप लावण्यात आला आहे. युक्रेनचे नवे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांच्यावर बायडेन यांच्याविरोधात चौकशीचा आदेश देऊन दबाव टाकता येईल या उद्देशाने हे कृत्य केलं आहे.

अमेरिकेत 2020 मध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि डेमोक्रॅटिक पक्षातर्फे बायडेन संभाव्य उमेदवार आहेत. ट्रंप यांच्यावर गेल्या एक महिन्यापासून महाभियोगाची कारवाई सुरू आहे आणि आतापर्यंत ही सुनावणी बंद दाराआड होत असे.

बुधवारी या प्रकरणाची सुनावणी पहिल्यांदा सार्वजनिकरित्या सुरू झाली. यानिमित्ताने डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन हे दोन्ही पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

टेलर यांच्यावर सर्व आशा टिकून

या आठवड्यात युक्रेनमधील अमेरिकेचे कार्यकारी राजदूत बिल टेलर, जॉर्ज केंट आणि युक्रेनमधील अमेरिकेचे माजी राजदूत मॅरी योवानोविच यांची साक्ष होणार आहे. हे लोक आधी बंद दाराआड झालेल्या सुनावणीदरम्यान उपस्थित होते.

या संपूर्ण प्रकरणात डेमोक्रॅट सदस्यांच्या आशा बिल टेलर यांच्यावर टिकून आहे. युक्रेनमधील अमेरिकेचे विशेष दूत कुर्ट वॉल्कर यांनी टेलर यांचा मेसेज सार्वजनिक केला होता. युक्रेनवर चौकशीसाठी वाढत्या दबावाबद्दल टेलर यांनी या मेसेजमध्ये चिंता व्यक्त केली होती.

Image copyright Getty Images

आपल्या साक्षीत त्यांनी युक्रेनबद्दल अमेरिकेच्या धोरणाचा उल्लेख केला. युक्रेनला वारंवार व्हाईट हाऊसवर आमंत्रण आणि अमेरिकन सैन्याची मदत काढून घेणं या गोष्टींचा दबावतंत्र म्हणून वापर केला जात होता असं ते म्हणाले.

टेलर यांच्या साक्षीवर डेमोक्रॅटिक पक्षाच्या आशा टिकून आहे. त्या आधारावरच ट्रंप यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा दावा डेमोक्रॅट करत आहेत.

मात्र ट्रंप यांनी युक्रेनवर असा कोणताही दबाव निर्माण केल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाला मान्य नाही. युक्रेनमधील भ्रष्टाचारामुळे ट्रंप चिंतेत होते म्हणून त्यांनी अमेरिकन सैन्याची मदत थांबवली.

ट्रंप आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेंस्की यांच्यात झालेलं संभाषण उघड करणाऱ्या व्यक्तीच्या हेतूवरही रिपब्लिकन पक्षातर्फे संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)