गोताभया राजपक्षे: श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, भारतावर असा होऊ शकतो परिणाम

गोताभया राजपक्षे हे श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत.
प्रतिस्पर्धी साजिथ प्रेमदासा यांच्यावर मात केल्याचा दावा राजपक्षे यांनी केला आहे, प्रेमदासा यांनीही आपला पराभव स्वीकारला आहे, मात्र मतमोजणी अजून संपलेली नसून निकालांची अधिकृत घोषणा झालेली नाही.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या मते 80 टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये राजपक्षे यांना 48 टक्के मतं मिळाली आहेत.
या निवडणुकीत एकूण 35 उमेदवार रिंगणात होते, मात्र थेट लढत या दोघांमध्येच होती. विद्यमान राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा श्रीलंका फ्रीडम पार्टी पक्षाने निवडणुकीत राजपक्षे यांना पाठिंबा दिला होता.
गोताभया राजपक्षे श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि विद्यमान विरोधी पक्षाचे नेते महिंदा राजपक्षे यांचे छोटे भाऊ आहेत.
- श्रीलंका निवडणुकीविषयी जाणून घ्या सारंकाही
- पाकिस्तानात गेलेल्या श्रीलंकेच्या टीमवर जेव्हा हल्ला झाला होता...
2005 ते 2011 या कालावधीत श्रीलंकेतील हजारो लोक विशेषत: तामिळ लोक बेपत्ता झाले होते, त्यावेळी गोताभया राजपक्षे सत्तेत होते. पण, श्रीलंकेतील भीषण गृहयुद्ध संपविण्यात त्यांची भूमिका आणि त्यानंतर झालेले ईस्टर संडे हल्ले, यामुळे राजपक्षे यांना फायदा झाला.
राजपक्षे राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर श्रीलंकेत धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण होऊ शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे.
विश्लेषक ब्रह्म चेलानी यांनी दैनिक 'मिंट'मध्ये लिहिलं आहे की, युद्ध गुन्ह्यांचे आरोप असलेली व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदी येणार, हे समजताच अल्पसंख्याक, मीडिया आणि नागरिकांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या मंडळींमध्ये भीतीचं वातावरण आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या आडून राजपक्षे धार्मिक आणि जातीय अल्पसंख्याकांविरोधात मोहीम उघडू शकतात, अशी चिंता काही जणांना सतावते आहे.
तामीळ बंडखोरांविरुद्धच्या लढाईत त्यांचा सहभाग आणि मुस्लीमविरोधी विचारांसाठी प्रसिद्ध कट्टरतावादी बौद्ध संघटना बोदू बाला सीनशी त्यांचं असलेलं सख्य या चिंतेला पुष्टी देतात.
भ्रष्टाचार निर्मूलन, अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त करून देणं, निष्पक्ष समाजाची उभारणी हे मुद्दे राजपक्षे यांच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले होते. त्यांची प्रतिमा मतदारांना आकर्षित करते.
राजपक्षे यांचं निवडून येणं हा चीनसाठी मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. महिंदा राजपक्षे यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात चीनने श्रीलंकेत सातत्याने गुंतवणूक केली.
राजपक्षे 2015 पर्यंत सत्तेत होते. भारताशी संबंध ताणलेले असताना महिंदा राजपक्षे यांनी चीनकडून कोट्यवधींची कर्ज घेतली. श्रीलंकेचं मुख्य बंदर चीनसाठी खुलं केलं. श्रीलंका-चीन संयुक्तपणे एका बंदराची निर्मिती करत आहेत. यासाठी चीनने कर्जाची रक्कम कमी करण्याबाबत संकेत दिले आहेत.
ब्रह्म चेलानी यांच्या मते गोताभया राजपक्षे सत्तेत आल्यानंतरही श्रीलंका-चीन संबंध असेच मधुर राहण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)