हाँगकाँग : पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीला युद्धभूमीचं स्वरूप, विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री

हाँगकाँग निदर्शन Image copyright AFP

हाँगकाँगमधल्या पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीला पोलिसांनी घेराव घातल्याने सुमारे 100 आंदोलक आत अडकून पडले आहेत. या तिढ्याचा हा तिसरा दिवस आहे.

विद्यापीठाच्या आत असणाऱ्या आंदोलकांकडील गरजेच्या वस्तू आता कमी झाल्या असून अजून एक दिवस काढणं आंदोलकांना शक्य होणार नसल्याचं एका सरकारी कर्मचाऱ्याने म्हटलंय.

विद्यापीठाच्या आत असणारे आंदोलक बाहेर आल्यास त्यांना अटक करण्यात येईल आणि त्यांच्यावर दंगलखोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल.

पण ही सरकारविरोधी आंदोलनं शांत होण्याची चिन्हं दिसत नसल्याने आता विद्यापीठाला युद्धभूमीचं स्वरूप आलेलं आहे.

हाँगकाँगच्या हायकोर्टाने आंदोलकांनी मुखवटे वापरण्यावर असलेली बंदी काढून टाकल्याने चीनने यावर टीका केलीय. यामुळे या आगीत तेल ओतलं गेलंय.

हाँगकाँगमध्ये आंदोलक आपली ओळख लपवण्यासाठी मुखवट्यांचा वापर करत होते. त्यानंतर असे मास्क वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती.

पण ही बंदी घटनेच्या विरोधात असल्याचं म्हणत हाँगकाँगच्या सुप्रीम कोर्टाने सोमवारी ही बंदी उठवली. पण यावर टीका करताना चीनने फक्त आपणच या भागासाठीचे घटनात्मक निर्णय घेऊ शकतो, असं म्हटलं होतं.

विद्यापीठाचा परिसर सोडण्यासाठी आंदोलकांकडे रात्री 10 वाजेपर्यंतची मुदत असल्याचं पोलिसांनी रविवारी आंदोलकांना सांगितलं होतं. सोबतच आंदोलकांनी हल्ले सुरू ठेवल्यास शस्त्रांचा वापर करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला होता.

त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण विद्यापीठालाच घेरलं आणि आत अडकलेल्या आंदोलकांनी पेट्रोल बॉम्ब फेकायला आणि बेचक्यांनी दगड मारायला सुरुवात केली.

Image copyright Reuters

सोमवारी विद्यापीठ परिसरातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही डझन आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. त्यातही एका लहान गटाने दोरीच्या शिडीचा वापर करत मोटरसायकल्सवरून पलायन करण्यात यश मिळवलं.

अटक करण्यात आलेल्यांवर दंगल घडवण्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून यासाठी 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो.

जूनपासून हाँगकाँगमध्ये आंदोलनं सुरू आहेत, पण पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीमधील हे आंदोलन म्हणजे आतापर्यंतची सर्वांत मोठी चकमक म्हणावी लागेल.

या तरूण आंदोलकांच्या पाच प्रमुख मागण्या आहेत. पोलिसांकडून होणाऱ्या अत्याचारांचा आणि एकूणच अत्याचारांचा तपास करण्यात यावा, ही यापैकी एक मागणी आहे.

पण चीनमुळे धोक्यात येणारं हाँगकाँगचं विशेष अस्तित्त्वं हा यासगळ्या आंदोलनांमागचा मूळ मुद्दा आहे.

सध्या काय घडतंय?

विद्यापीठ परिसरात अजूनही 100 आंदोलक आहेत. पण आता काही जखमी आंदोलक विद्यापीठाबाहेर यायला सुरुवात झालेली आहे. यातल्या काहींच्या पायाला दुखापत झालेली आहे तर काही थंडीने गारठल्याने बाहेर पडल्याचं SCMPया बातम्या देणाऱ्या वेबसाईटने म्हटलंय.

आपण 'थंडी आणि भुकेमुळे' बाहेर यायचं ठरवल्याचं एका आंदोलकाने म्हटलं. आत असणाऱ्यांपैकी अनेकजण जखमी असून त्यांच्याकडे पुरेशी औषधं नसल्याचंही या आंदोलकाने सांगितलंय.

मंगळवारी पहाटे 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे 200पेक्षा जास्त आंदोलक त्यांच्या हायस्कूल मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकाऱ्यांसोबत विद्यापीठाबाहेर पडले.

या सगळ्यांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांचा तपशील घेऊन त्यांना सोडून देण्यात आलं. या सगळ्यांशिवाय 100 मोठे आंदोलकही बाहेर पडले आणि त्यानंतर लगेचच त्यांना अटक करण्यात आली.

Image copyright Getty Images

आंदोलकांनी शरण यावं असं आवाहन हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लाम यांनी केलंय. या "आंदोलकांनी शांतपणे बाहेर यावं आणि पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं," असं त्यांनी म्हटलंय.

हाँगकाँगमध्ये गेले अनेक महिने आंदोलनं सुरू आहेत. शिवाय या आंदोलकांमध्ये विद्यार्थी आणि तरुणांचं प्रमाण जास्त आहे. पण असं असूनही हे आंदोलन अद्याप विद्यापीठापर्यंत पोहोचलेलं नव्हतं.

पण 22 वर्षांच्या एका विद्यार्थी आंदोलकाचा मृत्यू झाला आणि परिस्थिती बदलली. चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगला गेल्या आठवड्यापासून युद्धभूमीचं स्वरूप आलंय.

ट्रॅफिक थांबवण्यासाठी आंदोलकांनी युनिव्हर्सिटीजवळच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. युनिव्हर्सिटीतले पुढच्या टर्मचे सगळे वर्ग रद्द करण्यात आले आहेत.

हाँगकाँगमध्ये इतर ठिकाणीही निदर्शनं सुरूच आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)