इराण : इथे संपूर्ण देशात घातलीये इंटरनेटवर बंदी, 8 कोटी लोकांचा संपर्क तुटला

इराण Image copyright Anadolu agency

इराणमध्ये पेट्रोलच्या किंमती भडकल्या आहेत. म्हणूनच पेट्रोलचं रेशनिंग करण्यात येत आहे. म्हणजेच प्रत्येकाला मर्यादित प्रमाणात पेट्रोल मिळतंय.

त्यामुळे याच्याविरोधात अनेक आंदोलक इराणमध्ये रस्त्यावर उतरले आहेत. याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या अनेक आंदोलकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचं समजतंय.

आतापर्यंत शेकडो आंदोलक मारले गेल्याचं संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे. पण मानवी हक्क संघटना 'अॅम्नेस्टी इंटरनॅशनल'नुसार 21 शहरांमध्ये होत असलेल्या निदर्शनात आतापर्यंत 106 लोकांचा मृत्यू झाला आहे.

पेट्रोलवर असणारी सबसिडी सरकारने काढून घेतल्यानंतर शुक्रवारपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. सबसिडी संपुष्टात आल्यानंतर इराणमधील पेट्रोलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या.

पण सबसिडी कमी करून आणि वाढलेल्या पेट्रोल दरांमुळे सरकारकडे जो अतिरिक्त पैसा येईल तो इराणमधल्या गरीब जनतेवर खर्च करण्यात येणार असल्याचं इराण सरकारचं म्हणणं आहे.

आंदोलकांविरुद्ध बळाचा वापर करण्यात येऊ नये, असं आवाहन संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाचे प्रवक्ते रुपर्ट कोलविल यांनी इराणला केलं आहे.

इंटरनेटवर बंदी

इराण सरकारने देशात इंटरनेटवरही निर्बंध घातलेले आहेत. शुक्रवारी सुरू झालेलं आंदोलनं न थांबल्याने सरकारने शनिवारी इंटरनेट बंद केलं.

ही बंदी गेले चार दिवस कायम आहे. त्यामुळे देशातल्या आठ कोटी जनतेचा जगापासून संपर्क तुटला आहे.

Image copyright Reuters

परदेशात राहणाऱ्या वा प्रवासाच्या निमित्ताने बाहेर असणाऱ्या इराणी लोकांनी आपल्या कुटुंबाशी वा मित्रांशी संपर्क होत नसल्याचं सोशल मीडियावर म्हटलं आहे.

इंटरनेट शटडाऊनवर लक्ष ठेवणाऱ्या नेटब्लॉक या संस्थेच्या आल्प टोकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "सुरुवातीला एका भागातल्या कनेक्टिव्हिटीत अडचण आढळली. संध्याकाळपर्यंत संपूर्ण देशभरात इंटरनेट गेल्याचं आमच्या लक्षात आलं.

पेट्रोलची किंमतदुप्पट

इराण सरकारने फक्त पेट्रोलच्या किंमती वाढवलेल्याच नाहीत, तर सोबतच पेट्रोलचं रेशनिंगही सुरू केलंय.

नवीन नियमांनुसार प्रत्येक वाहनधारकाला दर महिन्याला 60 लीटर पेट्रोल विकत घेण्याची परवानगी आहे. आणि यासाठी त्याला 15 हजार रियाल म्हणजे सुमारे 32रुपये प्रति लीटर इतके पैसे द्यावे लागतील.

60 लीटरपेक्षा जास्त पेट्रोलची गरज भासल्यास त्यांना पुढच्या प्रत्येक लीटरसाठी दुप्पट म्हणजे 30 हजार रियाल मूल्य द्यावं लागेल.

AP या वृत्तसंस्थेनुसार मागच्या महिन्यात 250 लीटर पेट्रोल 10 हजार रियाल प्रति लीटर दराने विकत घेता येत होतं.

यामुळेच नाराज झालेले लोक रस्त्यांवर उतरले आणि हळुहळू हे लोण अनेक शहरांमध्ये पसरलं. वाहन चालकांनी आपल्या गाड्या रस्त्यात आणून उभ्या केल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

रविवारपर्यंत 100 शहरांमध्ये अशा आंदोलनांना सुरुवात झाली होती.

हिंसक निदर्शनं

फार्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आंदोलकांनी किमान 100 बँका, दुकानं, पेट्रोल पंप आणि सरकारी कार्यालयांना आग लावली.

सध्या या प्रकरणी हजारपेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी राणा रहीमपोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आता ही निदर्शनं फक्त पेट्रोलपुरती मर्यादित नसून आता लोकं हुकुमशाहाच्या मृत्यूशी संबंधित घोषणा देत आहेत. म्हणजे लोकांना सध्याचं सरकार नकोय."

मंगळवारी आंदोलकांनी तेहरानजवळ तीन सुरक्षारक्षकांना सुऱ्याने हल्ला करत ठार केल्याचं AFP वृत्तसंस्थेने म्हटलंय.

Image copyright AFP

बीबीसीचे फारसी प्रतिनिधी जियार गोल सांगतात, "विविध बिगर-सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 5 दिवसांत 200 पेक्षा जास्त लोक मारले गेले असून 3000पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. पण सरकार मात्र काहीच लोक मारले गेल्याचं म्हणतंय. पण मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या पार्थिवावर अधिकारी अंत्यसंस्कारही करू देत नसल्याचं नातलगांचं म्हणणं आहे."

हे आंदोलक 'दंगेखोर' असल्याचं इराण सरकारने म्हटलंय. या निदर्शनांमागे परदेशी शक्तींचा हात असल्याचं इराण सरकार म्हणतंय.

राष्ट्रपती रुहानी सांगतात, "लोकांना विरोधात निदर्शनं करण्याचा हक्क आहे. पण निदर्शनं आणि दंगली यात फरक असतो. समाजातमध्ये असुरक्षितता पसरवण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही."

गेल्या वर्षी मे महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणवर कडक आर्थिक निर्बंध लावले होते. त्याचा इराणच्या अर्थव्यवस्थेवर याचा वाईट परिणाम झाला आहे.

2017 नंतरचं इराणमधलं हे सर्वांत मोठं आंदोलन आहे. 2017मध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये 25 लोक मारले गेले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)