सायबेरियात सापडला बर्फात गोठलेला 18,000 वर्षांपूर्वीचा ‘कुत्रा’

सायबेरियात बर्फात थिजलेलं एक 18,000 वर्षं जुनं 'पिल्लू' सापडल्याने संशोधक आश्चर्यचकित झाले आहेत.
हे कुत्र्याचं पिलू आहे की कोल्ह्याचं हे ठरवण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत.
बर्फात सापडलं तेव्हा हे पिलू 2 महिन्यांचं असावं असा कयास आहे.
रशियाच्या या भागामध्ये कायम बर्फ असतो. त्यामुळेच हे पिलू इतक्या वर्षांपूर्वींचं असूनही कायमच बर्फाखाली राहिल्याने त्याची फर (Fur), नाक आणि जबडा पूर्णपणे सुस्थितीत आहे.
- त्याला बर्फात अडकलेला कुत्रा समजून वाचवलं, पण तो लांडगा निघाला
- ती इतकी रडली की चोरांनी परत केलं कुत्र्याचं पिलू!
पण हे नेमकी कोणती प्रजाती आहे, याचा शोध DNA जुळवण्यासाठीच्या चाचण्यांमधूनही लागू शकलेला नाही.
म्हणजे ही प्रजाती कोल्हा आणि सध्याच्या काळातील कुत्रा यांच्यातल्या उत्क्रांती दरम्यानची असावी, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.
रेडिओकार्बन डेटिंग (Radiocarbon Dating) म्हणजे रेडिओअॅक्टिव्ह कार्बनच्या मदतीने एखाद्या गोष्टीचं वयोमान ठरवण्याच्या पद्धतीने या पिलाचा नेमका कधी मृत्यू झालाय, आणि किती वर्षं हा प्राणी थिजलेल्या अवस्थेत आहे हे ठरवण्यात आलं.
या प्राण्याच्या 'जीनोम' (Genome) अॅनालिसीसच्या मदतीने हा प्राणी 'नर' असल्याचं ठरवण्यात आलं.
पण DNA Sequencing म्हणजे या प्राण्याचा DNA पूर्णपणे न जुळणं म्हणजे हा प्राणी कुत्रा आणि कोल्हा अशा दोन्ही प्रजातींच्या सामायिक पूर्वजांपैकी असू शकतो, असं स्वीडनमधल्या सेंटर फॉर पिलिओजेनेटिक्स मधले संशोधक डेव्ह स्टँटन यांनी सीएनएनला सांगितलंय.
"या प्राण्यापासून आम्ही आतापर्यंत भरपूर माहिती - डेटा गोळा केला असून त्याच्या मदतीने हा नेमका कोणता प्राणी आहे हे सांगता येण्याची शक्यता आहे," स्टँटन यांनी सांगितलं.
हे पिलू कोल्ह्याचं आहे की हा ' आपल्याला सापडलेला जगातला सर्वात जुना कुत्रा आहे' अशा आशयाचं ट्वीट याच केंद्रातले आणखी एक संशोधक लव्ह डॅलन यांनी केलंय.
वैज्ञानिक आता या DNA सीक्वेंन्सिंगवर - DNA जुळवून पूर्ण करण्यावर काम करणार असून यामधून कुत्र्यांच्या उत्क्रांतीविषयी मोठी माहिती मिळण्याची आशा आहे.
'डॉगॉर' (Dogor) असं या पिलाचं नामकरण करण्यात आलंय. याकुट (Yakut) भाषेत याचा अर्थ होतो - मित्र. पण यासोबतच 'कुत्रा की कोल्हा?' या चर्चेलाही सुरुवात झालीय.
सध्या आपल्याला जे कुत्रे आढळतात त्यांची उत्क्रांती ही मूळ कोल्ह्यापासून झाली असल्याचं मानलं जातं. पण कुत्रा हा पाळीव प्राणी नेमका कधी झाला, याविषयीही वाद आहेत.
2017मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार 20,000 ते 40,000 वर्षांपूर्वी कुत्रा 'पाळीव' प्राणी झाला असावा.
हेही वाचलंत का?
- राहुल यांचा कुत्रा ट्विटरवर सैराट
- त्याला बर्फात अडकलेला कुत्रा समजून वाचवलं, पण तो लांडगा निघाला
- बुलढाण्यात कुणी केली 90 कुत्र्यांची कत्तल?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)