जागतिक AIDS दिन : पाकिस्तानातील लहान मुलांमध्ये का पसरतोय एचआयव्हीचा संसर्ग?

पाकिस्तान एचआयव्ही

पाकिस्तानातील लारकाना जिल्ह्यामध्ये रातोदेरो ग्रामीण आरोग्य केंद्रावर डॉक्टर मुझफ्फर घांग्रो एका सात वर्षांच्या मुलाला तपासत होते. मुलगा अगदी शांतपणे वडिलांच्या मांडीवर बसला होता. त्याच्या तब्येतीविषयी डॉक्टर वडिलांकडे चौकशी करत असताना तो डॉक्टरांकडे एकटक पाहत होता.

त्याचे डोळे तपासल्यानंतर डॉक्टरांनी कागदावर काही नोंद केली, मग मुलाला शर्ट वर करायला सांगितलं. हात सॅनिटायझरने धुवून डॉक्टरांनी मुलाच्या उघड्या छातीवर स्टेथोस्कोप लावला आणि त्याला हळू श्वास घ्यायला सांगितलं.

डॉक्टर मुझफ्फर घांग्रो हे या भागातील सर्वांत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांपैकी एक आहेत. पण या वर्षी रातोदेरोमध्ये एचआयव्हीचा प्रादुर्भाव झाल्यावर एप्रिल महिन्यात त्यांना अटक झाली. मोठ्या संख्येनं मुलंच या संसर्गाला बळी पडली होती.

डॉक्टरांनी जाणीवपूर्वक मुलांमध्ये एचआयव्हीचा विषाणू पसरवल्याचा आरोप सुरुवातीला झाला, पण नंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली. पण त्यांच्यावर वैद्यकीय निष्काळजीपणाबद्दल खटला सुरु आहे. सध्या ते जामिनावर आहेत.

"स्वतःच्या अकार्यक्षमतेवर पांघरुण घालण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांवर मोठा दबाव होता. त्यांना कोणीतरी बळीचा बकरा हवा होता, म्हणून त्यांनी मला या प्रकरणात गोवलं. शिवाय, यात असूयेचाही भाग होता. माझी प्रॅक्टिस चांगली चालली होती, त्यामुळे काही डॉक्टरांनी व पत्रकारांनी मिळून हे प्रकरण उभं केलं," असा दावा डॉक्टर घांग्रो करतात.

डॉक्टरांच्या खाजगी दवाखान्याला अजूनही सील ठोकलेलं आहे. पूर्वी या दवाखान्यात ते दर दिवशी डझनावरी मुलांवर उपचार करायचे. नाममात्र फी आणि लवकर गुण येणारे उपचार, यामुळे रातोदेरोच्या पंचक्रोशीतील शेकडो गावांमधले रहिवासी डॉक्टर घांग्रो यांच्या दवाखान्याला प्राधान्य देत असत. सध्या या डॉक्टरांविरोधात सुनावणी सुरू आहे.

"गेली दहा वर्षं मी मेडिकल प्रॅक्टिस करतो आहे. मी एकच सिरिंज दोनदा वापरल्याचा आरोप आतापर्यंत एकाही व्यक्तीने केलेला नाही. मी कोणतंही गैरकृत्य केलेलं नाही," असं डॉक्टर घांग्रो म्हणतात.

"सध्या कनिष्ठ न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. आणखी दोनेक सुनावण्यांनंतर प्रकरणाचा निकाल लागेल अशी मला आशा आहे," घांग्रो सांगतात.

पालकांसमोर औषधोपचारांचा मोठा प्रश्न

अटक झाल्यानंतरच्या काळात खुद्द डॉक्टर घांग्रो यांनाही एचआयव्हीची लागण झाल्याचं निदर्शनास आलं. याची आपल्याला काहीच जाणीव नव्हती, असा दावा ते स्वतः करतात.

या वर्षी मे महिन्यात सदर प्रकरणाची सुरुवात झाली. रातोदेरोमधील दुसऱ्या एका डॉक्टरकडे उपचारासाठी येणाऱ्या मुलांचा आजार दीर्घकाळ सुरू राहात असल्याचं आढळलं. या आजाराची लक्षणं पाहून साशंक झालेल्या संबंधित डॉक्टरने या मुलांच्या एचआयव्ही चाचणीची शिफारस केली.

या चाचणीनंतर पाकिस्तानातील सर्वांत मोठ्या एचआयव्ही संसर्गाचं प्रकरण प्रकाशात आलं. सरकार आणि इतर संबंधित संस्था सतर्क झाल्या. त्यानंतर सखोल तपासणी करण्यात आली आणि बाराशेहून अधिक लोकांना एचआयव्हीची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. यापैकी जवळपास नऊशे लहान मुलं होती आणि त्यांच्या कुटुंबात या आजाराचा कोणताही पूर्वेतिहास नव्हता.

डॉक्टर घांग्रो यांच्या दवाख्यानापासून काही किलोमीटरांवर सुभाना खान यांच्या गावात 32 मुलांची एचआयव्ही चाचणी 'पॉझिटिव्ह' आली. या मुलांपैकी कोणाच्याही कुटुंबात एचआयव्हीची लागण कधीच झालेली नव्हती. या घटनेनंतर गावातील पालक संतप्त झाले.

प्रतिमा मथळा उपचारासाठी लागणारी औषधं पालकांना परवडणारी नाहीत.

युनिसेफच्या माध्यमातून सरकारने आता रातोदेरोमध्ये एचआयव्ही उपचार केंद्र सुरू केलं आहे. परंतु, आपल्या मुलांच्या आजाराची बातमी पचवणं आणि त्यासंबंधी पुढील हालचाली करणं पालकांना अजूनही अवघड जातं आहे. "माझ्या मुलीचं वजन करून तिला व्हिटॅमिन द्यावं, असं मी डॉक्टरांना म्हटलं," एक आई सांगते. "पण त्यांनी म्हटलं, की ते केवळ औषधं लिहून देतील, ती माझी मलाच विकत घ्यावी लागतील." हे सांगताना संबंधित महिला उदास झाली होती.

"काहीशे रुपये किंमतीची औषधं सरकार देऊ शकत नसेल, तर आम्ही त्यांच्याकडून आणखी कसली अपेक्षा ठेवायची?"

एचआयव्हीची बाधा झालेली बहुतांश मुलं कुपोषित व कमी वजनाची आहेत. सरकारी उपचार केंद्रावर एचआयव्हीवरील औषधं मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत. जागतिक सहाय्य निधीमधून ही औषधं पुरवली जात आहेत. परंतु, याचा फटका बसलेले बहुतांश पालक अल्प उत्पन्न गटातील आहेत, त्यामुळे एचआयव्हीनंतर होणाऱ्या इतर संसर्गावरील औषधं स्वतःहून विकत घेणं त्यांना अडचणीचं जातं.

रातोदेरोमधील पालकांना या सगळ्याचा सर्वाधिक ताण व आघात सहन करावा लागला आहे. वर उल्लेख केलेली महिला सांगत होती, "आमच्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. आता पुढे त्यांना जगण्याशी जुळवून घेता येईल का? लोक त्यांचा तिरस्कार करतील."

मुलंच नव्हे, तर संबंधित पालकांनाही गावकऱ्यांनी दूर लोटलं आहे, असं ही महिला सांगते. एचआयव्हीबाधित मुलांशी इतर मुलं खेळत नाहीत आणि शाळाही त्यांना वर्गात उपस्थित राहण्यापासून परावृत्त करत आहेत.

पाकिस्तानमधील वाढत्या एचआयव्ही संसर्गाची कारणं काय?

संयुक्त राष्ट्रांनी जुलैमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, एचआयव्हीचा सर्वाधिक प्रसार असलेल्या 11 देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश होतो. शिवाय, जिथे एचआयव्हीची लागण झालेल्या लोकांपैकी अर्ध्याहून कमी लोकांना आपल्या संसर्गाची माहिती असते, अशा पाच देशांमध्येही पाकिस्तान आहे.

पाकिस्तानातील या एचआयव्ही प्रादुर्भावाचं प्रकरण बाहेर आल्यावर उपचारांसाठी उपलब्ध असलेल्या पहिल्या काही डॉक्टरांमध्ये डॉक्टर फातिमा मीर होत्या. मुलांना होणाऱ्या संसर्गजन्य रोगांविषयीच्या त्या तज्ज्ञ आहेत आणि कराचीतील आघा खान विद्यापीठ रुग्णालयात त्या काम करतात.

"आव्हानं प्रचंड आहेत. चाचणी करण्यापासून आव्हानं समोर येतात. गरज आहे तितक्या लोकांची चाचणी घेण्यासाठी आवश्यक पैसे आमच्याकडे नाहीत. उपचाराच्या पातळीवरही आव्हानं आहेत. प्रौढांच्या तुलनेत मुलांवर उपचार करणं अवघड असतं," डॉक्टर फातिमा सांगतात. "औषधं महागडी आहेत. जागतिक निधीकडून पाकिस्तानला औषधं मोफत मिळत आहेत."

परंतु, रातोदेरोमधील प्रादुर्भावानंतर पाकिस्तानातील एचआयव्हीची उपस्थिती पुन्हा प्रकाशात आली आहे. सुयांचा पुनर्वापर आणि खालावलेल्या संसर्गनियंत्रण पद्धती यांमुळे हा प्रादुर्भाव झाल्याचं सरकारी तपास अहवालात म्हटलं आहे.

पाकिस्तानात वैद्यकीय कचऱ्याचं व्यवस्थापन सक्षमपणे होत नाही, अनेक नोंदणीकृत नसलेल्या रक्तपेढ्या कार्यरत आहेत आणि बनावट डॉक्टरही आहेत या सगळ्यामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या पाकिस्तानातील एड्सविषयक संचालक मारिया एलेना बोरोमिओंनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, की पाकिस्तानातील एचआयव्हीमध्ये वाढच होत जाणार आहे. या रोगाची वेगाने वाढ होणाऱ्या आशियाई देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक दुसरा आहे.

पाकिस्तानातील एचआयव्ही संसर्गाचं प्रमाण 2010 ते 2018 या काळात 57 टक्क्यांनी वाढलं, आणि उपचारांची गरज असलेल्यांपैकी केवळ दहा टक्के लोकांना उपचार उपलब्ध झाल्याचं 2018 अखेरच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं, असं त्या सांगतात.

परंतु, रातोदेरोच्या निमित्ताने पाकिस्तान या आजारासंबंधीच्या प्रवृत्ती आणि वर्तनांमध्ये बदल घडवू शकतो. त्यातून या समस्येवर तोडगा निघणं शक्य आहे, अशी आशा बोरेमिओ व्यक्त करतात.

एचआयव्हीवरील उपचारांना प्राधान्य

"सरकार व इतर संबंधित संस्थांच्या लेखी एचआयव्ही एड्सला प्राधान्य नव्हतं. या आजारावरील उपचार कार्यक्रमासंबंधी कोणतीही चर्चा व्हायची नाही, नियोजन होत नसे किंवा फारसा वित्तपुरवठाही उपलब्ध करुन दिला जात नसे." परंतु, रातोदेरोमधील प्रादुर्भावानंतर मात्र सरकारी पातळीवर अधिक कृतिशीलता दिसते आहे, शिवाय एचआयव्हीला सामोरं जाण्यासाठी अधिक ऊर्जा, अधिक वेळ व अधिक संसाधनं उपलब्ध करून दिली जात आहेत.

एक उपाय दृष्टिपथात आला आहे. सिंध प्रांताच्या आरोग्यमंत्री डॉक्टर आझरा पेचुहोंनी सांगितलं, की सरकारी व खाजगी आरोग्य सेवाकेंद्रांमधील संसर्ग नियंत्रण पद्धतींची गंभीर पडताळणी सरकार करतं आहे.

"पुरेशा चाचण्या न करताच लोकांना देण्यासाठी रक्त पुरवणाऱ्या अनधिकृत रक्तपेढ्यांबाबत आम्ही आता अधिक कठोर भूमिका घेतली आहे. समुदायांतर्गत उपचारपद्धतींबाबतही आम्ही अधिक विचार सुरू केला आहे. ऑटो-लॉक होणाऱ्या सिरिंज वापरता येतील का, याचीही पडताळणी केली जाते आहे, जेणेकरून एकदा वापरलेली सिरिंज पुन्हा वापरली जाणार नाही."

ऑटो-लॉक होणाऱ्या सिरिंज पहिल्या वापरानंतर आपोआप नष्ट होतात आणि त्यांचा पुन्हा वापर करता येत नाही.

पाकिस्तानमध्ये सुरक्षित इंजेक्शन धोरणही तयार करण्यात आलं आहे. ऑगस्ट महिन्यात पंतप्रधानांचे आरोग्यविषयक विशेष सहायक ज़ाफर मिर्झा यांनी ट्विटरवरून जाहीर केलं की, पाकिस्तानातील दरडोई इंजेक्शनचा दर जगात सर्वाधिक आहे आणि पाकिस्तानात दिली जाणारी 95 टक्के इंजेक्शनं अनावश्यक असतात.

"देशात रक्ताद्वारे होणाऱ्या संसर्गाचं एक मोठं कारण इंजेक्शनशी निगडित आहे. हिपॅटायटिस-सी आणि एचआयव्ही-एड्स या संदर्भातील इन्जेक्शनांचा वापर योग्य प्रकारे होत नाही. या समस्येवर आम्ही परिणामकारक उपाय करणार आहोत," असं ट्वीट मिर्झा यांनी केलं होतं.

डॉक्टर फातिमा मीरही यावर सहमती दर्शवतात. "हा आमच्या संस्कृतीचाच भाग झालेला आहे. आमच्या मुलांना काहीही झालं तरी त्यावर इंजेक्शन द्यावं असं पालक डॉक्टरांना सांगतात. आमच्याच वागण्यामुळे मुलांसमोरचे धोके वाढले आहेत."

सरकारने ऑटो सिरिंज धोरणाला अंतिम रूप दिलं आहे. येत्या काही महिन्यांमध्ये देशभरात हे धोरण लागू होईल.

मुलांमधील प्रादुर्भावामुळं वाढलं गांभीर्य

रातोदेरोमधील एचआयव्ही प्रादुर्भाव ही 2008 पासून पाकिस्तानातील अशा प्रकारची आठवी घटना आहे. लहान मुलांची प्रचंड मोठी संख्या असल्यामुळे या घटनेचं गांभीर्य आणखी वाढलं.

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एचआयव्हीचा प्रादुर्भाव सर्वाधिक वेळा आढळला असून सर्वाधिक एचआयव्हीबाधित लोकसंख्याही याच भागत आहे. परंतु, पंजाबमधील या संसर्गाचा धोका मुख्यत्वे ट्रान्सजेंडर, शरीरविक्रय करणाऱ्या व्यक्ती, समलैंगिक व्यक्ती यांच्यापुरता मर्यादित आहे.

पंजाबमध्ये एचआयव्ही/एड्सला कलंक मानण्याची वृत्ती सर्वांत बळकट आहे. या आजारासंबंधी जागरुकता निर्माण करुन सुरक्षित लैंगिक आचरणाची माहिती देण्यासाठी विविध एनजीओंच्या मदतीने सरकारने पुढाकार घेतला आहे.

पाकिस्तानात विवाहबाह्य लैंगिक संबंध व समलैंगिकता बेकायदेशीर मानले जातात, त्यामुळे या एनजीओंना फारसं प्रकाशात न येता काम करावं लागतं. परिणामी, आजाराचा सर्वाधिक धोका असलेल्या लोकसंख्येपर्यंत हवं त्या प्रमाणात पोचणं त्यांना शक्य होत नाही.

अधिक धोका असलेल्या गटांनाही या आजाराशी निगडित कलंकामुळे असुरक्षित वाटत असतं. पाकिस्तानातील एचआयव्ही-एड्सला आळा घालण्यामधील हा एक मोठा अडथळा आहे, असं तज्ज्ञ म्हणतात.

एचआयव्हीची लागण झाल्याचं निदर्शनास आलेल्या लोकांना सरकारकडे स्वतःची नोंदणी करावी लागते. त्यांच्यावर मोफत उपचार केले जातात, पण पाकिस्तानातील संयुक्त राष्ट्रांच्या एड्स विषयक संचालक बोरोमिओ म्हणतात, की आपण प्रशासनाला 'सापडू' या भीतीने बहुसंख्य लोक हे उपचार करुन घेत नाहीत.

रातोदेरोमधील तरुण पीडितांच्या माध्यमातून या आजाराभोवतीचा कलंक पुसता येईल, असं डॉक्टर फातिमा मीर यांना वाटतं.

"काही गोष्टींबाबत मौन राखलं म्हणजे काही त्या गोष्टी लपत नाहीत. उलट त्या अधिक मोठ्या व बळकट समस्या म्हणून समोर येतात," असं त्या म्हणतात.

पाकिस्तानात या आधी झालेल्या प्रादुर्भावाच्या घटना योग्यरितीने हाताळल्या गेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती रातोदेरोमधील प्रादुर्भावाच्या निमित्ताने अधोरेखित झाली, याकडेही डॉक्टर फातिमा लक्ष वेधतात. "या प्रादुर्भावाची योग्य रितीने हाताळणी करुन आवश्यक ती कृती करणं गरजेचं आहे. ही कृती शाश्वत स्वरूपाची असायला हवी. अन्यथा, पुढचा प्रादुर्भाव अधिक मोठा व बहुधा हाताबाहेर जाणारा असेल," असंही त्या सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)