सुंदर पिचाई : चेन्नईचा मध्यमवर्गीय मुलगा ते गुगलचे टॉप बॉस असा प्रवास

Sundar Pichai Image copyright AFP

लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन हे अल्फाबेट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षपदावरुन पायउतार होत आहेत. अल्फाबेट ही गुगलची मुख्य कंपनी असून, पेज आणि ब्रिन हे गुगलच्या सहसंस्थापकांपैकी आहेत.

या दोघांनी पदभार सोडल्यास गुगलचं सर्व काम सुंदर पिचाई सांभाळतील, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय.

सुंदर पिचाई हे सध्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते आता अल्फाबेट कंपनीचंही मुख्य कार्यकारी अधिकारीपद सांभाळतील.

लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांचं म्हणणं आहे की, आता कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडण्याची वेळ आलीये. मात्र, पेज आणि सर्गेई हे दोघेही कंपनीच्या संचालक मंडळावर राहतील.

सुंदर पिचाई कोण आहेत?

सुंदर पिचाई यांचा प्रवास विलक्षण आहे. आणि त्यांनी गुगलचं सर्वेसर्वा होणं म्हणजे भारतीयांच्या आयटी क्षेत्रातल्या दबदब्याचं लक्षण आहे. त्याबरोबरीने अमेरिकेत आयटी इंडस्ट्रीत कर्तृत्व असलेल्याला आपली स्वप्नं साकार करता येतात याचं प्रतीक आहे.

पिचाई यांचा जन्म तसंच शालेय शिक्षण तामिळनाडूमधल्या चेन्नईमध्ये झाला. त्यांना लहानपणी क्रिकेट खेळण्याची आवड होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या शाळेच्या टीमने अनेक स्पर्धा जिंकल्या.

त्यांनी आयआयटी खरगपूरमधून मेटालर्जीकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यांच्या एका शिक्षकांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं होतं की, 'ते त्यांच्या बॅचमधले सगळ्यात हुशार विद्यार्थी होते.'

त्यांनी 2004 साली गुगल कंपनी जॉईन केली. गुगलचं वेब ब्राऊजर, गुगल क्रोम, अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमसारख्या गोष्टी त्यांच्या देखरेखीखाली बनल्या.

अँड्रॉइड जगातली सगळ्यात प्रसिद्ध मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे, पण ही सिस्टीम बनवण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या सुंदर पिचाईंच्या चेन्नईतल्या घरी 12 वर्षांपुर्वी साधा टेलिफोन नव्हता हे सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही.

मध्यमवर्गीय घरात गेलं बालपण

ब्लुमबर्ग या मासिकाने सुंदर पिचाईंविषयी लेख छापला होता, त्यानुसार सुंदर यांचं बालपण साध्या, मध्यमवर्गीय परिवारात गेलं. त्यांचं कुटुंब दोन खोल्यांच्या घरात राहायचं. सुंदर यांना स्वतःची खोली नव्हती, ते आपल्या भावाबरोबर दिवाणखान्यात झोपत.

Image copyright AFP

त्यांच्या कुटुंबाकडे ना टीव्ही होता ना कार.

पण सुंदर यांच्या वडिलांनी त्यांच्यात तंत्रज्ञानाची आवड रुजवली. सुंदर पिचाईंचे वडील ब्रिटीश काँग्लोमरेट जनरल इलेक्ट्रिक कंपनीत काम करायचे. (अमेरिकन जनरल इलेक्ट्रिक वेगळी कंपनी आहे)

त्यातूनही त्यांचा तंत्रज्ञानाकडे कल वाढला. "मी घरी आलो की सुंदरला माझ्या कामाबद्दल आणि दिवसभरात मला काय काय आव्हानांचा सामना करावा लागायचा हे सांगायच," रघूनाथ पिचाई यांनी ब्लुमबर्गला सांगितलं होतं. सुंदर पिचाईंना सगळे टेलिफोन नंबर्स लक्षात राहायचे, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

आयआयटी खरगपूरमधून पदवी घेतल्यानंतर पिचाई यांना त्यांच्या विलक्षण बुद्धीमत्तेमुळे अमेरिकेतल्या स्टॅनफर्ड विद्यापीठात स्कॉलरशिप मिळाली. अमेरिकेला जायचं विमानाच्या तिकीटाची किंमत त्यांच्या वडिलांच्या वार्षिक पगारापेक्षा जास्त होती.

Image copyright AFP

गुगलमध्ये पिचाईंचं वर्णन मृदूभाषी आणि सगळ्यांना आवडणारे म्हणून केलं जातं. ते गुगलच्या डेव्हलपर्समध्येही लोकप्रिय आहेत. गुगलचा डेव्हलपर्ससाठी असणारा वार्षिक कार्यक्रमही ते आयोजित करतात.

"मला जे म्हणायचं असतं ते माझ्याआधीच सुंदर बोलतात आणि कधी कधी माझ्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे मांडतात. आम्ही एकत्र जे काम केलंय त्याबद्दल मी फारच खूश आहे," लॅरी पेज यांनी आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल माहिती देताना म्हटलंय.

लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी गेल्या काही काळापासून गुगलच्या रोजच्या घडामोडींमधून लक्ष काढून घेतलं होतं. त्यामुळे गुगलच्या सगळ्या जबाबदाऱ्या आता पिचाई सांभाळतील ही आता झालेली घोषणा फक्त औपचारिकता होती.

गुगलचे महत्त्वाचे प्रोडक्टस, ज्यात पैसा आहे, म्हणजे सर्च, जाहिराती, मॅप्स आणि युट्यूब यावर पिचाईंची नजर असेल.

पिचाईंसमोर फेसबुकचं आव्हान असेल. फेसबुक सध्या आपल्या साईटवर जास्तीत जास्ती व्हीडिओ पब्लिश करत आहे, आणि त्यामुळे युट्यूबसमोर तगडं आव्हान उभं राहिलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)