हवामान बदलः 'या' कचऱ्यामुळे तुमच्या ताटातले मासे कायमचे गायब होऊ शकतील...

महासागर कचरा Image copyright Getty Images

हवामान बदल आणि प्रदूषणामुळे जगभरातील समुद्रांमधल्या ऑक्सिजनचं प्रमाण घटू लागलं आहे. यामुळे माशांच्या विविध प्रजातींच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

IUCN अर्थात 'इंटरनॅशनल युनियन फॉर कर्न्झव्हेशन ऑफ नेचर' संस्थेनं केलेल्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे.

समुद्रातल्या माशांच्य़ा वाढीसाठी असणारे पोषक घटक गेल्या काही दशकांपासून कमी होत आहेत. संशोधकांच्या मते, हवामान बदलामुळे ऑक्सिजन घटण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

1960च्या दशकात समुद्रातील ऑक्सिजन घटलेल्या ठिकाणांची संख्या 45 एवढी होती. सध्याच्या घडीला अशा ठिकाणांची संख्या 700 एवढी झाली आहे. यामुळे ट्यूना, मार्लिन आणि शार्क या माशांच्या प्रजातींना धोका निर्माण झाला आहे.

कारखाने तसंच शेतातून सोडल्या जाणाऱ्या नायट्रोजन आणि फॉस्फरस यांच्यामुळे समुद्रातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली आहे. समुद्रकिनाऱ्याजवळच्या भागांमध्ये प्रदूषणाचं प्रमाण अधिक असल्याने समुद्रातली ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे.

हवामान बदलाची वारंवारता वाढत चालल्यानेही ऑक्सिजनची पातळी घसरु लागली आहे.

कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे तापमान वाढतं तेव्हा जास्तीची उष्णता समुद्र शोषून घेतो. यामुळे पाणी गरम होतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं.

Image copyright IUCN
प्रतिमा मथळा माशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार, 1960 ते 2010 या कालावधीत महासागरांमधील ऑक्सिजनचं प्रमाण दोन टक्क्यांनी घटलं आहे.

हे वैश्विक प्रमाण असल्याने हा आकडा मोठा वाटणार नाही. मात्र काही भागांमध्ये हे प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

ऑक्सिजनची पातळी कमी होण्याचा परिणाम सागरी जीवांवर होतो. कमी ऑक्सिजनयुक्त पाणी जेलीफिशसारख्या प्राण्यांकरता चांगलं असतं परंतु ट्यूनासारख्या माशांकरता हे धोकादायक आहे.

'डी-ऑक्सिजनेशन'विषयी आपल्याला माहिती आहे. मात्र याचा हवामान बदलाशी असलेला संबंध चिंतेत भर टाकणारा आहे असं ICUN संस्थेचे मिना इप्स यांनी सांगितलं.

Image copyright IUCN
प्रतिमा मथळा ऑक्सिजन कमी झाल्यामुळे मासे टिकणार का?

त्यांनी पुढे सांगितलं, "गेल्या 50 वर्षात ऑक्सिजनचं प्रमाण चार टक्क्यांनी खाली आहे. यापुढे कार्बन उर्त्सजनाचं प्रमाण नियंत्रणात राहिलं तरी महासागरांमधला ऑक्सिजन कमीच होत जाणार आहे."

ट्यूना, मार्लिन आणि शार्क अशा प्रजातींसाठी ऑक्सिजन कमी होणं वाईट बातमी आहे.

मोठ्या माशांना अधिक ऊर्जेची गरज असते. हे मासे समुद्रातील उथळ भागात वावरतात जिथे ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. मात्र इथे ते पकडले जाण्याचा धोका सर्वाधिक असतो.

जगभरातल्या देशांनी कार्बन उत्सर्जनावर निर्बंध लावले असले तरी 2100 पर्यंत महासागरांमधला ऑक्सिजन तीन ते चार टक्क्यांनी कमी होण्याची चिन्हं आहेत.

उष्ण कटिबंधातल्या देशांना याचा जास्त फटका बसणार आहे. जैवविविधतेत परिपूर्ण जलपातळीच्या 1000 मीटर भागात सर्वाधिक फटका बसणार आहे.

यावर उपाय काय?

समुद्रातला ऑक्सिजन कमी होणं जमिनीवरच्या मानवी जीवनावरही परिणाम करणारं आहे.

"बायोकेमिकल्स सायकलिंगची स्थिती बदलू शकते. जैविक आणि रासायनिक बदलांचा प्रत्यक्षात काय परिणाम होतो हे समजून घ्यावं लागेल," असं मिन इप्स यांनी सांगितलं.

समुद्रात होणारे घातक बदल रोखण्याची जबाबदारी विविध देशांच्या प्रमुखांवर आहे.

अहवालाचे सहसंपादक डॅन लॅफोलो यांच्या मते समुद्रातील ऑक्सिजन कमी होणं समुद्रातील जैवविविधतेवर परिणाम करणारं आहे. समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढल्याने तसंच खारेपणामुळे आधीच संकटाची स्थिती आहे.

ऑक्सिजनची पातळी उंचावण्यासाठी कार्बन उत्सर्जनावर कठोर नियंत्रण आणणं आवश्यक आहे. विविध स्वरुपाच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणंही गरजेचं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)