6000 वर्षांपूर्वी महिला कशा दिसत होत्या?

या महिलेला लोला असं टोपणनाव देण्यात आलं. Image copyright TOM BJÖRKLUND
प्रतिमा मथळा या महिलेला लोला असं टोपणनाव देण्यात आलं.

हा चेहरा आहे 6000 वर्षांपूर्वी स्कँडेनेव्हियामध्ये राहणाऱ्या बाईचा.

प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या 'च्युईंग गम'मध्ये (एका विशिष्ट झाडाचा टार म्हणजेच झाडापासून मिळणारा डिंकासारखा पदार्थ) या बाईच्या दाताचे ठसे सापडले होते. त्या ठशाच्या डीएनएवरून शास्त्रज्ञांनी या बाईचा जेनेटिक कोड शोधून काढला आणि त्यावरून ती कशी दिसत असावी हे सांगितलं.

हाडाव्यतिरिक्त इतर कुठल्यातरी माध्यमातून प्राचीन मानवाचा संपूर्ण जिनोम तयार करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे..

सहा हजार वर्षांपूर्वीच्या या स्त्रिचा रंग सावळा, केस गडद तांबडे आणि डोळे निळे असावेत, असा संशोधकांचा अंदाज आहे.

प्राचीन काळातील हा "च्युईंग गम" मानवी डीएनएचा मौल्यवान स्रोत असल्याचं कोपेनहेगन विद्यापीठातील डॉ. हॅन्नस श्रोएडर यांचं म्हणणं आहे. विशेषतः त्या काळातील ज्या काळातले मानवी अवशेष उपलब्ध नाहीत.

ते म्हणाले, "हाडाव्यतिरिक्त इतर स्रोतापासून प्राचीन मानवाचा संपूर्ण जिनोम तयार करणं खरंच खूप अद्भूत आहे."

जिनोमवरून आणखी काय माहिती मिळाली?

या स्त्रिचा संपूर्ण जिनोम किंवा जेनेटिक कोड डिकोड करण्यात आला. यावरून ती कशी दिसत असावी, याचा अंदाज बांधण्यात आला. तसंच या जिनोमवरूनही असंही दिसून आलं की ही स्त्री त्याकाळी मध्य स्कँडिनेव्हियात राहणाऱ्या मानवांपेक्षा मुख्य युरोपातील hunter-gatherers म्हणजेच शिकार, मासेमारी आणि जंगलातून अन्नधान्य गोळा करून गुजराण करणाऱ्या भटक्या शिकारी जमातीची असावी. त्यांच्यासारखाच तिचा रंग सावळा, केस गडद तांबडे आणि डोळे निळे असावेत.

Image copyright THEIS JENSEN

हिमशिखरं वितळल्यामुळे पश्चिम युरोपातून येऊन इथे वास्तव्य करणाऱ्या लोकांमधली ती असावी, असाही अंदाज आहे.

ती उदरनिर्वाह कशी करायची?

डीएनएच्या इतर खुणांवरून बाल्टिक सागरातील डेन्मार्कमधील लोलँड बेटावरच्या सिल्थॉममध्ये जीवन अस्तित्वात होतं, याचे पुरावे सापडले आहेत. यात अक्रोड आणि बदकाचे ट्रेसेस सापडले आहेत. यावरून त्याकाळच्या आहारात या पदार्थांचा समावेश होता, हे सिद्ध होतं.

कोपेनहेगन विद्यापीठातील थेईस जेनसेन म्हणतात, "डेन्मार्कमधली ही अश्वयुगातली सर्वांत मोठी साईट आहे. या ठिकाणावरून पुरातत्त्व शास्त्रज्ञांना मिळालेल्या पुराव्यांवरून असं दिसतं की अश्मयुगाच्या उत्तरार्धात इथे जो मानव येऊन स्थिरावला त्याने जंगल स्रोतांचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं. हा तो काळ होता जेव्हा स्कँडेनेव्हियामध्ये शेती आणि प्राणी पाळण्याची नुकतीच सुरुवात झाली होती."

"च्युईंग गम"मध्ये अडकलेल्या मायक्रोब्जचे (सूक्ष्मजंतू) डीएनएदेखील संशोधकांनी शोधून काढले आहेत. यात त्यांना ताप आणि निमोनिया पसरवणारे जंतू सापडले. तसेच नैसर्गतः तोंडात असणारे मात्र, कुठलाही अपाय न करणारे जीवाणू आणि विषाणूही सापडले.

हा डीएनए आला कुठून?

बर्च म्हणजेच मराठीत भूर्ज किंवा भोज वृक्षाची साल तापवल्यानंतर त्यातून काळ्या रंगाचा डिंकासारखा पदार्थ निघतो. त्यात हा डीएनए सापडला. त्या काळी या डिंकाचा दगडी हत्यारं जोडण्यासाठी वापर व्हायचा.

अशा या डिंकावर दातांचे ठसे आढळल्याने त्याकाळात हा पदार्थ दाताने चावायचे, असं दिसतं. कदाचित डिंक अधिक लवचिक करण्यासाठी किंवा दातदुखी कमी करण्यासाठी किंवा इतर आजारांवर औषध म्हणून याचा वापर केला जात असावा, असा संशोधकांचा अंदाज आहे.

या माहितीवरून काय कळतं?

अशाप्रकारे जतन केलेल्या माहितीवरून त्याकाळातील मानवी जीवनाचा संक्षिप्त आढावा घेता येतो. त्यांचे पूर्वज कोण होते, त्यांचं आरोग्य, त्यांच्या उपजीविकेचं साधन या सर्वांविषयी माहिती मिळते.

इतकंच नाही तर च्युईंग गममधून मिळालेल्या डीएनएवरून मानवामध्ये आजार पसरवणारे जंतू काळानुरूप कसे विकसित होत गेले, याचीही माहिती मिळते.

डॉ. श्रोएडर यांनी बीबीसीला सांगितलं, "अशाप्रकारच्या पदार्थापासून अशाप्रकारच्या प्राचीन सूक्ष्मजंतूंचे जिनोम तयार करणं खूप एक्साइटिंग आहे. कारण त्यावरून हे जंतू कसे विकसित होत गेले आणि ते आजच्या त्यांच्या व्हराईटीपासून कसे वेगळे आहेत, हे कळतं. यावरून हे सूक्ष्मजंतू कसे पसरले, कसे विकसित होत गेले, याविषयीची माहिती देतात."

Nature Communication या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)