सेक्ससाठी शाकाहारी काँडम फायदेशीर ठरणार?

  • केट ब्रॅडी
  • बीबीसी वर्कलाईफ
कंडोम

फोटो स्रोत, ENGKRITCHAYA SIRAWATMETHA / ALAMY STOCK PHOTO

2015 साली फिलीप सीफर आणि वाल्डेमर जाईलर नवीन व्यवसायासाठी क्राउड फंडिंग गोळा करत होते.

सीफर म्हणतात, "गुंतवणूकदार आम्हाला एकच प्रश्न विचारत होते - काँडम शाकाहारी आहेत का?"

तोपर्यंत काँडमला जास्त लवचिक बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर होतो, हे सीफर आणि जाईलर यांना माहीत नव्हतं.

बर्लीनचे हे दोन उद्योजक पर्यावरणाबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांसाठी 8 अब्ज डॉलर्सच्या जागतिक काँडम मार्केटमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.

शाकाहारी काँडमची मागणी करणाऱ्या ग्राहकांची मोठी संख्या बघून त्यांना आश्चर्य वाटलं. चार वर्षांत टिकाऊ आणि शाकाहारी उत्पादनांच्या त्यांच्या ब्रँडचा व्यवसाय 50 लाख युरोपर्यंत पोचला.

त्यांच्या कंपनीचं नाव आहे 'आईन्हॉर्न'. जर्मन भाषेत याचा अर्थ होतो युनिकॉर्न.

योगायोग असा की एक अब्ज डॉलरचा व्यवसाय करणाऱ्या स्टार्ट-अप कंपन्यांसाठी (उदा. Airbnb आणि Deliverroo) या 'युनिकॉर्न कंपनीज' हा शब्द वापरला जातो.

सीफर आणि जाईलर यांच्या कंपनीने त्यांचं उद्दिष्टं अजून गाठलेलं नाही. मात्र, शाश्वत पर्यावरण केंद्रस्थानी ठेवत उद्योग उभारण्यात त्यांना यश मिळालं आहे. या उद्योग समुहासाठी संधीची नवी क्षितीजं उघडली आहेत.

पशु-उत्पादन नाही

जर्मनीत गर्भनिरोधासाठी गोळ्यांनंतर सर्वांत जास्त पसंती काँडमला आहे. पण एकदा सीफर हे काँडम आणण्यासाठी गेले तेव्हा त्यांचं लक्ष सहजच काँडमच्या ब्रॅंडिंगकडे गेलं आणि त्यांना वाटलं की जग इतकं पुढे आलंय पण काँडमच्या बाबतीत मात्र अजूनही जुनाट कल्पनांमध्येच आपण अडकलो आहोत.

तिथेचं त्यांना वाटलं की नवा ग्राहक या नव्या पर्यावरणपूरक उत्पादनाला पसंती देणार नाही.

फोटो स्रोत, WWW.EINHORN.MY

सुरुवातीला सीफर यांचे व्यावसायिक भागीदार जाईलर यांनी ही कल्पना आवडली नाही. मात्र नंतर त्यांना ही कल्पना पसंत पडली आणि ई-कॉमर्ससाठी हे आदर्श उत्पादन असल्याचं त्यांना वाटू लागलं.

त्यांना असा उद्योग उभारायचा होता जो पृथ्वीच नाही तर कंपनीतील कामगारांच्या दृष्टीनेही योग्य आणि शाश्वत असेल.

स्टार्टअप उद्योगात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न सीफर हे गेल्या 10 वर्षांपासून करत होते पण हाती काही ठोस लागत नव्हतं. कोट्यधीश होणं हे आपलं स्वप्न असल्याचं ते सांगतात पण केवळ कोट्यधीश होणं हाच आपला उद्देश नव्हता असं ते सांगतात.

सीफर म्हणतात, "लहानपणी कुणी मला विचारलं असतं की मोठं झाल्यावर तुला काय व्हायचं आहे तर मी सांगितलं असतं कोट्यधीश. पण मी माझ्या मित्रांना आणि काही सहकाऱ्यांना पाहिलं. ते श्रीमंत होते पण समाधानी नव्हते."

क्राउड फंडिंगने व्यवसायाला सुरुवात

व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी क्राऊड फंडिंगचा मार्ग स्वीकरला. क्राऊड फंडिंगमधून त्यांनी 1 लाख युरो (1,11,000 डॉलर) जमवले.

याच काळात शाकाहारवादी विचारसरणी आईन्हॉर्नच्या प्रॉडक्ट प्लॅनिंगचा भाग बनला.

सीफर यांना असं उत्पादन तयार करायचं होतं जे सहज विकता येईल, ऑनलाईन पाठवता येईल आणि प्रोडक्ट रिटर्न करण्याची गरज नसेल. ऑनलाईन विक्रीमध्ये सर्वाधिक खर्च यातच होतो.

फोटो स्रोत, KATE BRADY

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

"काँडम आमच्यासाठी उत्तम उत्पादन होतं. काँडम शाकाहारी असतील की नाही याची सुरुवातीला आम्हाला कल्पनाही नव्हती."

शेळीच्या आतड्यांपासून काँडम बनवण्याचे दिवस आता गेलेत. मात्र, मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या बहुतांश पर्यायांमध्ये आजही प्राण्यांचं, प्रोटीन, केसीनचा वापर करतात.

काँडमचा मुख्य घटक रबर आहे. हा रबर प्रामुख्याने आशियातील उष्णकटिबंधीय क्षेत्रातील झाडांपासून मिळवतात.

केसीन प्रोटीन प्रामुख्याने सस्तन प्राण्यांच्या दुधात आढळतं. यातून रबर लवचिक बनवतात.

आईन्हॉर्न यांनी केसीन प्रोटीनचा वापर केला नाही. त्यांनी झाडापासून नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या रबराचा वापर केला. रबर पर्यावरणपूरक असावं, याचीही त्यांनी काळजी घेतली.

मात्र, शाकाहारी काँडम बनवणारी आईन्हॉर्न पहिली कंपनी नाही. उत्तर अमेरिकेतली 'ग्राईड' कंपनीने 2013 रोजी शाकाहारी काँडम बनवलं होतं.

तेव्हापासून याचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. आईन्हॉर्नचे बहुतांश ग्राहक 20 ते 40 वर्ष वयोगटातील आहेत आणि 60% खरेदी महिला करतात.

सीफर सांगतात, "आजही अनेकांना काँडम खरेदी करताना संकोच वाटते आणि खरेदी करताना काँडम इतर वस्तुंच्या खाली लपवतात."

"त्यामुळेच आमचा कटाक्ष होता की ग्राहकांना एक टिकाऊ उत्पादन द्यावं आणि मजेशीर डिझाईन देऊन ग्राहकांचा संकोच कमी करावा."

'रसायनमुक्त रबर'

गेल्या 30 वर्षांत मोठ्या प्रमाणावर रबराच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करण्यात आलीय. वन्यजीवनावरही याचा परिणाम झाला आहे.

यावर तोडगा म्हणून आईन्हॉर्न पारंपरिकपद्धतीने लागवड करत नाही. ते थाईलँडमधल्या छोट्या शेतकऱ्यांच्या समुहाच्या माध्यमातून रबराची शेती करतात.

हे शेतकरी कीटनाशकांचा वापर करत नाहीत आणि गरज असेल तिथे मशीनद्वारे तण काढतात. म्हणजे तृणनाशकाचाही वापर ते करत नाहीत. अशाप्रकारे रबराची पूर्णपणे रसायनमुक्त शेती केली जाते.

फोटो स्रोत, ROBERT WUNSCH

मृदा परीक्षण म्हणजेच मातीची चाचणी करून त्या ठिकाणच्या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी रबराचं कुठलं कलम लावावं, हे देखील ठरवलं जातं.

रबर शेतीमध्ये काही ठिकाणी काही गंभीर स्थानिक आव्हानही आहेत. त्यामुळे कंपनीच्या फेअरस्टॅनिबिलिटी विभागाचे काही सदस्य वर्षांतून कमीत कमी तीन महिने साईटवर जाऊन देखरेख ठेवण्याच्या कामात हातभार लावतात.

शेतकऱ्यांना किमान मजुरीच्या 15 टक्के जास्त मोबदला दिला जातो. इतकंच नाही तर कामगारांना त्यांच्या अधिकारांविषयी महािती देण्यासाठी कार्यशाळाही आयोजित करतात.

पर्यावरणपूरक पॅकेजिंगचं कामही प्रगतीपथावर आहे. कंपनीचं मूळ पॅकेजिंग 100 टक्के पुनर्वापर होऊ शकणाऱ्या कागदापासूनच केलं जातं. अॅल्युमिनियम रहित रॅपर तयार करणं, हा पुढचा टप्पा असणार आहे.

'पृथ्वीसाठी संकट'

आपला विचार इतर उद्योगांमध्येही वापरला जाईल, अशी आशा आईन्हॉर्न यांना आहे. याचा एक मार्ग उद्योजकता संकल्प असू शकतो. उद्योग सुरू करण्याआधी यावर स्वाक्षरी करतात.

बिल गेट्स आणि वॉरेन बफेट यांनी 2010 साली सुरू केलेल्या 'The Giving Pledge' यातून उद्योजकता संकल्पाची प्रेरणा घेण्यात आली आहे.

या संकल्पानुसार आईन्हॉर्न नफ्यातील निम्मा वाटा पर्यावरणपूरक योजनांमध्ये गुंतवतात.

फोटो स्रोत, BBCTHREE

कंपनीने 2010 साली आपल्या नफ्यातील 10% वाटा CO2 ऑफसेटमध्ये गुंतवला होता. ही संस्था ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच हरितवायू कमी करण्यासाठीच्या योजनांना निधी पुरवते.

इतर लाभार्थींमध्ये बायोरे फाउंडेशनचा समावेश आहे. बायोरे फाउंडेशन सेंद्रीय कापसाच्या शेतीसाठी प्रयत्न करते.

जर्मन टॉयलेटरीज आणि घरगुती वापराच्या उत्पादनांची दिग्गज कंपनी असणाऱ्या DM सोबत झालेला करार एक मोठं यश मानलं जातं.

सीफर सांगतात, "आम्ही डीएमला आमची खरेदी आणि किरकोळ किंमतींबद्दल माहिती दिली तेव्हा त्यांना यावर विश्वासच बसला नाही."

आईन्हॉर्नच्या 7 काँडमच्या पॅकची किरकोळ बाजारातली किंमत 6 युरोंच्या आसपास आहे. इंडस्ट्रीमधल्या मोठ्या कंपन्या 8 काँडमचा पॅक 5 युरोला विकतात.

"आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या नफ्यातील 50% वाटा आम्ही पुन्हा गुंतवतो. तुम्ही वाटाघाटीत जो काही पैसा आमच्याकडून घ्याल तो पैसा एका चांगल्या कामापासून वंचित राहील."

फोटो स्रोत, Getty Images

डीएमने बार्गेनिंग बंद केली आणि अशाप्रकारे आईन्हॉर्नला जर्मनीतील किरकोळ बाजाराच्या मुख्य प्रवाहात व्यासपीठ मिळालं.

डीएमच्या मार्केटिंग आणि खरेदी विभागाचे मॅनेजिंग डायरेक्टर सबॅस्टियन बायर सांगतात की ग्राहक हळूहळू श्वाश्वत विकासाप्रती जागरूक होत आहेत. त्यामुळेच ते शाश्वत उत्पादनांचा पर्याय स्वीकारत आहेत.

जर्मन पर्यावरण संस्थेनुसार जर्मनीच्या ग्राहकांनी 2016 साली हरीत उत्पादनांवर 60 अब्ज डॉलर खर्च केले आणि हा ट्रेंड पुढेच असाच सुरू राहील, अशी अपेक्षा आहे.

ल्युनेबर्गच्या ल्युफाना विद्यापीठातील रिसर्च फेलो अॅना सुंदरमन यांचं म्हणणं आहे की शाश्वत उत्पादनांच्या मार्केटमध्ये आईन्हॉर्नच्या उत्पादनांचं स्वागत व्हायला हवं. मात्र, पर्यावरणावर यांचे दीर्घकालीन परिणाम मर्यादित आहेत.

सुंदरमन म्हणतात, "ही छोटी उत्पादनं ठीक आहेत. मात्र, आपल्याला वाहतूक आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रांवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कारण यातून कार्बन डायऑक्साईडचं सर्वाधिक उत्सर्जन होतं."

तरीदेखील त्यांना वाटतं की पारंपरिक उत्पादनांची जितके जास्त पर्याय उपलब्ध होतील, तेवढं चांगलं.

"आईन्हॉर्न सारख्या कंपन्यांचं नेटवर्क ग्लोबल सप्लाय साखळीतील समस्या दूर करण्यासाठी सहाय्यक ठरू शकतात."

नवीन उत्पादनं, नवं पाऊल

आईन्हॉर्नने गेल्या वर्षी 45 लाखांहून जास्त काँडमची विक्री केली. 2019 च्या सुरुवातीला त्यांनी 100% सेंद्रीय कापसापासून तयार केलेली मासिक पाळीशी संबंधित उत्पादनं बाजारात आणली.

कंपनीने 2020 साली होणाऱ्या बर्लीन ओलंपियास्टेडियनमध्ये मोठ्या इव्हेंटची योजना आखली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

हजारो लोकांना एकत्र बोलवून एक कार्यक्रम यात जर्मनीच्या संसदेला वातावरण बदल आणि लैंगिक समानतेशीसंबंधित अनेक ई-पिटीशन्स देण्यात येतील.

आपले शेअर्स आईन्हॉर्नला देण्याचा सीफर आणि जाईलर यांचा मानस आहे. ते कंपनीतला आपला वाटा कंपनीलाच देणार आहेत.

याचा अर्थ असा की त्याची विक्री करता येणार नाही आणि अशाप्रकारे शाश्वत मूल्यांचं आर्थिक, पर्यावरण आणि सामाजिकरित्या संरक्षण करण्यात येईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)