ISIS: बगदादीच्या मृत्यूचा बदला म्हणून केली 11 जणांची हत्या

अबू बक्र अल-बगदादी, इस्लामिक स्टेट

कट्टरतावादी संघटना ISIS ने एक व्हीडिओ रिलीज केला आहे. या व्हीडिओत 11 बंदिवानांची डोकी उडवल्याचा दावा ISISने केला आहे. ऑक्टोबरमध्ये सीरियात ISISचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी आणि प्रवक्त्याची हत्या झाली.

त्याचा बदला म्हणून नायजेरियातल्या 11 ख्रिश्चन लोकांचं अपहरण करून ही हत्या करण्यात आल्याचं ISISने म्हटलं आहे.

हे पीडित नेमके कोण आहेत हे कळलं नाही पण सर्वजण हे पुरुष होते आणि नायजेरियातल्या बॉर्नो राज्यातून त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. ISISशी संलग्नित वृत्तसंस्था अमाकने हा 56 सेकंदाचा व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

हा व्हीडिओ 26 तारखेलाच रिलीज करण्यात आला होता. विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की जगभरात नाताळ साजरा होत असतानाच हा व्हीडिओ रिलीज करण्यात आला आहे.

ही घटना नेमकी कुठे झाली ते अद्याप कळू शकलं नाही.

ऑक्टोबर महिन्यात सीरियामध्ये ISIS चा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी आणि प्रवक्ता अबुल हसन अल मुहाजिर हे ठार झाले होते. या घटनेचा 'बदला' घेण्यासाठी नवी मोहीम उघडण्यात येईल असं ISISने जाहीर केलं होतं.

कोण होता अबू बक्र अल-बगदादी?

अबू बक्र अल-बगदादीचं खरं नाव इब्राहिम अव्वाद इब्राहिम अल-बद्री असं आहे. संघटीत आणि कुप्रसिद्ध युद्धतंत्रासाठी तो कुप्रसिद्ध होता. जगातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांमध्ये त्याचा समावेश होतो.

त्याचा जन्म इराकची राजधानी बगदादच्या उत्तरेला असणाऱ्या समारा या गावात 1971 ला झाला. 2003 ला इराकवर अमेरिकेने हल्ला केला, त्यावेळी तो इथल्या एका मशिदीत मौलवी म्हणून काम पाहायचा.

फोटो स्रोत, AFP

काहींच्या मते इराकचे माजी प्रमुख सद्दाम हुसेन यांच्या कार्यकाळात बगदादी एक जिहादीच होता. काहीजण सांगतात, दक्षिण इराकमधल्या कँप बुक्कामध्ये अल-कायदाच्या अनेक कमांडरांना कैदेत ठेवण्यात आलं होतं. त्या कँपमध्ये बगदादीला ठेवण्यात आलेलं होतं. त्यावेळी त्याच्यावर कट्टर विचारसरणीचा पगडा आला.

2010 मध्ये इराकमध्ये एका कट्टरवादी गटाचा नेता म्हणून बगदादी उदयास आला. त्यांच्या गटात अल-कायदाचा समावेश होता. बगदादीच्या इस्लामिक स्टेट या संघटनेनं 2014 मध्ये इराकचं मोसूल शहर ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याने खिलाफत तयार केल्याची घोषणा केली होती.

फक्त त्याचवेळी बगदादी सार्वजनिक ठिकाणी बाहेर दिसला होता. त्यानंतर फक्त यावर्षाच्या सुरुवातीला आयएस संघटनेने प्रसिद्ध केलेल्या एका व्हीडिओमध्ये तो दिसला.

2011 च्या ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेने त्याला अधिकृतरित्या दहशतवादी म्हणून घोषित केलं. त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक कोटी अमेरिकन डॉलरचं बक्षीस देण्याचं घोषित केलं. 2017 मध्ये बक्षीस अडीच कोटी अमेरिकन डॉलर इतकी करण्यात आली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)