Prosthetics: कृत्रिम हातामुळे आता तो भावाला मिठी मारू शकतो

जेकब Image copyright BEN RYAN

इंग्लंडमधल्या वेस्ट यॉर्कशायरमधील क्रिस स्क्रिमशॉ आणि जेमा टर्नर यांचा जेकब हा एकुलता एक.

तो प्रिमॅच्युअर बेबी म्हणून जन्मास आला होता, म्हणजे जवळपास आठ आठवडे आधीच. आणि जन्म झाला तेव्हा त्याला डावा हात जवळपास नव्हताच.

जेकबला कृत्रिम हात मिळावा, यासाठी त्याच्या आईवडिलांनी क्राऊडफंडिंगने जवळपास 16,000 युरो उभारले. मात्र, कोपराच्या वरपासून हात नसेल तर कृत्रिम हात हालचाल करू शकणार नाही, असं इंग्लंडमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या NHS (National Health Service) आणि इतरही संस्थांचं म्हणणं होतं.

कोपर नसेल तर कृत्रिम हाताची हालचाल करता येत नाही. अशा प्रकरणांमध्ये कृत्रिम हात केवळ दिसण्यासाठी असतो.

डॉक्टरांनी आणि कृत्रिम अवयव बनवणाऱ्या कंपन्यांनी नकार दिल्यामुळे जेकबचे आई-वडील निराश झाले होते. आणि अशातच त्यांची भेट झाली बेन रायन यांच्याशी.

नॉर्थ-वेस्ट वेल्सच्या अँग्लेसी बेटावरच्या मेनाई ब्रिज या छोट्याशा गावात राहणाऱ्या बेन यांचा मुलगा दहा दिवसांचा असताना त्याची अॅम्प्युटेशन (अंगच्छेदन) सर्जरीची करावी लागली होती.

अॅम्प्युटेशन सर्जरीमध्ये काही वैद्यकीय कारणांमुळे एखादं अंग कापावं लागू शकतं. रायन यांच्या मुलाचा पाय त्या सर्जरीदरम्यान काढावा लागला होता.

या सर्जरीनंतर रायन यांनी आपल्या मुलासाठी कृत्रिम पायाचं हायड्रॉलिक डिझाईन तयार केलं होतं.

Image copyright BEN RYAN

तान्ह्या बाळावर झालेल्या सर्जरीने रायन यांच्या आयुष्याला नवं वळण दिलं. त्यांनी मानसशास्त्र प्राध्यपकाची नोकरी सोडली आणि जवळपास अडीच वर्षांपूर्वी अॅम्बिओनिक्स नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली.

यावर्षी पोलंडच्या ग्लेझ या कृत्रिम अवयव तयार करणाऱ्या कंपनीत त्यांच्या कंपनीचं विलीनीकरण झालं आहे.

त्यांच्या या कंपनीविषयी कळल्यावर जेकबचे आईवडील उत्साहित झाले. पाच वर्षांचा जेकब हा रायन यांच्या सुरुवातीच्या काही ग्राहकांपैकी एक.

त्यांनी जेकबचे आईवडील आणि कृत्रिम अवयव बनवणाऱ्या तज्ज्ञांना सोबत घेऊन जेकबसाठी हालचाल करू शकणारा एक कृत्रिम हात तयार केला.

Image copyright BEN RYAN

जेकबच्या पालकांना असा हात हवा होता ज्याचं कोपर वेगवेगळ्या पोझिशनमध्ये सेट करता येऊ शकेल आणि त्याने कुठलीही वस्तू धरता येऊ शकेल.

रायन यांनी सांगितलं की कोपराला स्लायडिंग लॉकच्या सहाय्याने सेट करता येऊ शकतं. आणि त्याच्या खांद्याजवळ असलेलं एक पाण्याचं रबर चेंबर दाबल्यावर त्याला हात बंद करता येतो.

जेकबसाठी त्या हाताचं डिझाईन रायन यांनी तयार केलं तर तो हात बनवण्याचं काम पोलंडमधल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. आणि अशाप्रकारे जेकबसाठी एक मोठा, हिरव्या रंगाचा आणि सुपरहिरोच्या थीमचा हात बनवण्यात आला.

रायन म्हणतात, "जेकबला हवा होता तसाच हात आम्ही तयार केलाय."

Image copyright BEN RYAN

हॅम्पशायरमध्ये गेल्या गुरूवारी हा कृत्रिम हात जॅकोबला देण्यात आला. तो व्यवस्थित बसवण्यात आला आणि जॅकोबने अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद दिल्याच रायन यांनी सांगितलं आहे.

रायन म्हणाले, "जॅकोब आपल्या भावाला मिठी मारू शकतो आणि हाताने वस्तू धरूही शकतो."

हात बसवल्यानंतर पोलीस अधिकारी असलेल्या जेकबच्या आई जेमा म्हणाल्या, "मला हा हाथ खूप आवडला आहे आणि जॅकोबला तो अत्यंत योग्य वेळी बसवण्यात आला आहे."

जॅकोबला हालचाल करू न शकणारा, केवळ दिसणारा कृत्रिम हात नको होता. त्या म्हणाल्या, "आपण चारचौघांसारखं दिसावं, असं काही त्याला वाटत नव्हतं."

कृत्रिम हात बसवल्यामुळे त्याला स्वतःचा तोल सांभाळण्यातही मदत झाल्याचं त्या सांगतात.

Image copyright BEN RYAN

या कृत्रिम हातासाठी निधी उभारत असताना त्यांना एका अज्ञात महिलेने तब्बल 5 हजार युरोंची (जवळपास चार लाख रुपयांची) देणगी दिली. आपण असाध्य आजाराने ग्रस्त आहोत आणि आपल्या उरलेल्या इच्छा पूर्ण होणार नाही, म्हणून आपण ही मदत करत असल्याचं त्या अज्ञात महिलेने सांगितलं.

जेमा म्हणतात, "देणगी मागणं जरा विचित्र वाटत होतं. मात्र तुम्हाला जे करायचं आहे, ते करावंच लागतं."

रायन म्हणतात, "जेकबसाठी योग्य हात मिळवताना त्याच्या पालकांना खूप अडचणी आल्या. कुणीही त्यांना हवा तसा कृत्रिम हात बनवून देऊ शकत नव्हतं."

"कोपराच्या वरपासून हात नसेल तर कृत्रिम हात काम करत नाही. तो केवळ दिसण्यासाठी असतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)