मोगादिशू बाँबस्फोटात 76 ठार, लोकशाही निवडणुकांपूर्वी सोमालिया या स्फोटामुळे अस्थिर होणार?

सोमालियात कारचा स्फोट

सोमालियाची राजधानी मोगादिशू येथील चेकपॉइंटवर झालेल्या बाँबस्फोटात मृतांचा आकडा वाढून 76 वर गेला आहे तर अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

या बाँबस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाही. पण अल-शबाब या कट्टरवादी संघटनेने याआधी अशा प्रकारचे हल्ले घडवून आणले आहेत.

अल-शबाब ही संघटना अल कायदाशी संलग्न आहे. गेल्या 10 वर्षांपासून या संघटनेने या देशात घातपाताच्या अनेक कारवाया केल्या आहेत. 2011 मध्ये या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती, पण अद्यापही ते या देशात सक्रिय आहेत.

स्फोटावेळी उपस्थित असलेल्या लोकांना या घटनेचं वर्णन केलं. कारचा स्फोट झाल्यानंतर आजूबाजूला असलेल्या लोकांच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. काही लोक तर इतके भाजले की त्यांची ओळखसुद्धा आता पटू शकत नाही, असं साकारिये अब्दुकादीर या व्यक्तीने सांगितलं.

फोटो स्रोत, Reuters

सोमालियातले खासदार मोहम्मद अब्दिरिझाक यांच्यामते मृतांची संख्या 90च्या वर गेली आहे. पण ही मृतांची अधिकृत संख्या नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

माझ्या सद्भावना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत, असं ते म्हणाले. या महिन्याच्या सुरुवातीलाच मोगादिशू येथील हॉटेलात झालेल्या हल्ल्यात 5 जण ठार झाले होते. हा हल्ला अल-शबाबने घडवून आणला होता.

सोमालियात नेमकं घडतंय काय?

सोमालियात गेल्या 20 हून अधिक वर्षांपासून प्रभावी सरकार अस्तित्वात नाही. तेही अशा वेळी, जेव्हा सोमालियातल्या मोठ्या भागावर युद्धजन्य स्थिती निर्माण झालीय.

अल-कायदाशी संलग्न असलेल्या 'अल शबाब' ही संघटना लोकांना सुरक्षेचं आश्वासन देऊन पाठिंबा मिळवते. मात्र, प्रत्यक्षात ही संघटना उलट काम करते.

2011 साली सोमालियात भीषण दुष्काळ असताना पाश्चिमात्य देशांनी दिलेली मदत नाकारण्यात आली, त्यावेळीच अल शबाबची विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाला.

मोगादिशू आणि इतर शहरांमध्ये आता सरकारचं नियंत्रण आहे. तेथील लोकांच्याही आशा पल्लवीत झाल्यात. शिवाय, हद्दपार करण्यात आलेले अनेक सोमालियन देशता परतायला लागलेत. त्यामुळं पैसा आणि कौशल्य दोन्हीही देशाकडे वळतंय.

रस्त्यांवरची वीज, कचरा संकलना यांसारख्या सेवाही सोमालियाच्या राजधानीत म्हणजेच मोगादिशूमध्ये सुरू झाल्यात. मात्र, तरीही सोमालियात लोकशाही माध्यमातून निवडणुका घेण्यास धोकायदायक वातावरण आहे. सोमालियात 1969 साली लोकशाही माध्यमातून शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या.

सोमालियात संसदेतील खासदार आणि अध्यक्ष निवडण्याची व्यवस्था अजूनही गुंतागुंतीची आहे. वयानं ज्येष्ठ असणारे लोक या निवडीत महत्त्वाची भूमिका बजावतात.

एका दशकानंतर पहिली निवडणूक - विश्लेषण : अँड्र्यू हार्डिंग, बीबीसी प्रतिनिधी, आफ्रिका

सोमालियातल्या मोगादिशूसारख्या मोठ्या शहरांना अल-शबाबसारख्या कट्टरतावादी संघटनांपासून सुरक्षित ठेवणं किती कठीण आहे, याचं उदाहरण म्हणजे हा बॉम्बस्फोट आहे. अल शबाब हल्ल्यांमधून नागरिकांना लक्ष्य करताना मागचा पुढचा विचार करत नाही.

या स्फोटामुळं अनेक वर्षांपासूनच्या चिंतेला दुजोरा दिलाय, कारण अल शबाबनं सोमाली राज्य आणि त्यांच्या सुरक्षा दलात घुसखोरी केलीय. यामुळं अल शबाब मोगादिशूत अशाप्रकारच्या कारवाया करत राहतं.

आफ्रिकन युनियन (AU) आणि सोमालिया सरकारसोबतच्या लढाईत आपलं क्षेत्र गमावल्यानंतरही अल शबाब प्रभावी संघटना म्हणून समोर आली. सोमालिया सरकारच्या संस्था आणि प्रादेशिक हितांना उद्ध्वस्त करण्यात यशस्वी झालीय. शिवाय, त्यांनी सोमालियाच्या सुरक्षेला आणि एकतेलाही कमजोर केलंय.

मोगादिशूमधील रक्तपात म्हणजे येत्या वर्षासाठी वाईट संकेत आहेत. अनेक दशकांनंतर सोमालियामध्ये महत्त्वाच्या अशा 'एक मतदार-एक मत' निवडणूक येत्या वर्षात होणार आहेत.

त्याचसोबत, अॅमिसन या आफ्रिकन युनियनच्या 20 हजार सैनिकांचं काय होणार, हाही चिंतेचा विषय आहे. ते सोमालियाच्या सुरक्षव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात, पण आता याच AU सैन्याची जागा सोमालियाचं नवीन सैन्य घेणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)