चीनमध्ये शरीरविक्रय करणाऱ्यांना आता श्रमाची सक्ती नाही

चीन Image copyright Paula Bronstein/getty
प्रतिमा मथळा चीनमधील लासा प्रांतातील शरीरविक्रय करणाऱ्या महिलेचा संग्रहित फोटो

शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना कोठडीत असताना सक्तीचं कष्टाचं काम करण्याची पद्धत चीनमध्ये बंद करण्यात येणार आहे.

चीनमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना आणि त्यांच्या ग्राहकांना कोठडीत म्हणजेच कथित शिक्षण केंद्रात दोन वर्ष डांबून ठेवण्याची मुभा पोलिसांना देण्यात आली होती.

अटक करण्यात आलेल्या लोकांना सक्तीने खेळणी बनवणं तसंच घरगुती कामं करायला भाग पाडलं जात असे.

29 डिसेंबरपासून डिटेन्शन सिस्टम बंद होणार आहे. चीनच्या सरकारची माध्यमसंस्था झिनुआने दिलेल्या माहितीनुसार आता केंद्रात डांबण्यात आलेल्या लोकांची सुटका केली जाणार आहे. चीनमध्ये वेश्या व्यवसाय करणं बेकायदेशीर आहे.

वेश्या व्यवसाय करताना पकडलं गेल्यास 15 दिवसांकरता अटक तसंच 5,000 युआन दंडाची शिक्षा ठोठावली जाते.

का दिली जाते शिक्षा?

समाजातलं वातावरण नीट राहावं यादृष्टीने कोठडी आणि शैक्षणिक केंद्रात राहण्याची तरतूद 20 वर्षांपूर्वी करण्यात आली होती.

कालौघात ही व्यवस्था कालबाह्य आणि चुकीची ठरत गेली.

ही व्यवस्था खरंच उपयुक्त आहे का? यासंदर्भात 2013 मध्ये एशिया कॅटलिस्ट संस्थेने अभ्यास केला. दोन शहरातल्या शरीरविक्रय व्यवसायातील 30 महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले.

कोठडीत ठेवलं गेलेल्या काळात महिलांना नवं कौशल्य शिकता आलं नाही. अटक करून कोठडीत डांबण्यात आलेल्या महिलांकडून श्रमाचं काम करवून घेण्यात येत असल्याचं मुलाखतींदरम्यान स्पष्ट झालं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना वेगवेगळ्या कामांसाठी डांबलं जात असे.

अहवालात म्हटल्याप्रमाणे कोठडीत डांबण्यात आलेल्या सर्व महिलांनी केंद्रातून सुटका झाल्यावर पुन्हा शरीरविक्रय व्यवसाय करू लागल्या.

2013 मध्ये ह्यूमन राईट्स वॉच यांनी शरीरविक्रय क्षेत्रातील महिला, त्यांचे ग्राहक, पोलीस अशा 140 माणसांच्या विविध मुलाखती घेण्यात आल्या.

कबुलीजबाब देण्याच्या सक्तीसाठी पोलिसांनी अनेक महिलांना मारहाण केल्याचंही स्पष्ट झालं.

माफीनामा लिहून देण्यासाठी भाग पाडल्याचं एका महिलेनं सांगितलं.

Image copyright Paula Bronstein/getty
प्रतिमा मथळा चीनमधील लासा प्रांतातील शरीरविक्रय करणाऱ्या महिलेचा संग्रहित फोटो

नाव लिहून द्यायचं आणि माझी चार-पाच दिवसात सुटका होईल असं सांगण्यात आल्याचं एका महिलेने सांगितलं. मात्र प्रत्यक्षात सुटका होण्यासाठी कस्टडी-एज्युकेशन सेंटरमध्ये सहा महिने डांबण्यात आलं.

शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या हक्कांचे पालन होण्याच्या दृष्टीने डिटेन्शन सेंटरमध्ये महिलांना डांबून ठेवण्याची पद्धत बंद होणं पहिला टप्पा आहे असं एशिया कॅटलिस्टचे शेन टिंगटिंग यांनी सांगितलं.

चीनची न्याययंत्रणा शरीरविक्रय व्यवसायावर बंदी घालणं तसंच व्यवसाय कमी करत नेण्यावर भर देते. मात्र शरीरविक्रय व्यवसायात कार्यरत व्यक्तींच्या आरोग्याविषयी, सुरक्षिततेविषयी काहीही उपाययोजना नाही.

'काय आहेत लेबर कॅंप?'

लेबर कॅम्पच्या माध्यमातून गुन्हेगारांना नव्याने शिक्षण देण्याची योजना रद्द केल्याचं चीनने स्पष्ट केलं.

मुलीवर बलात्कार झालेल्या आईला लेबर कॅंपमध्ये धाडण्यात आलं. या आणि अशा प्रकारांनंतर न्याय होत नसल्याने ही व्यवस्था रद्दबातल करण्यात आली.

मात्र शरीरविक्रय व्यवसायिक महिला, त्यांचे ग्राहक यांच्यासाठी वापरली जाणारी कस्टडी आणि एज्युकेशन पद्धती बंद झाली नव्हती.

पुनर्शिक्षणाची पद्धत पूर्णत: बंद करण्याचा चीनचा विचार नाही. क्षिनजिआंग या चीनमधील उत्तर-पश्चिम भागात असे अनेक कॅंप सुरू आहेत. कट्टरतावादाला थोपवण्यासाठी शैक्षणिक कॅंप सुरू आहेत.

चीनमधील वीगर मुस्लिमांना अशा कॅंपमध्ये डांबण्यात आलं असल्याचा दावा उजव्या विचारसरणीच्या लोकांनी केला आहे. या कॅंपमध्ये त्यांना स्वत:च्या धर्मावर टीका करण्यास सांगितलं जातं किंवा धर्म सोडण्याचा आदेश दिला जातो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)