पामतेलावरुन भारत आणि मलेशियात तणावः भारतासमोर झुकणार नसल्याचा महातीर यांचा पुनरुच्चार

मलेशिया, भारत, पाकिस्तान, आयात-निर्यात Image copyright Reuters
प्रतिमा मथळा महातीर मोहम्मद

पाम तेलाच्या मुद्यावरुन भारत आणि मलेशिया यांच्यातले संबंध ताणले गेले आहेत. मलेशिया आणि भारत यांच्यादरम्यान आधी काश्मीरच्या मुद्यावरुन आणि नंतर एनआरसी-सीएएवरुन विरोध वाढू लागला आहे.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा असलेलं कलम 370 रद्द करण्याचा निर्णय आणि एनआरसी आणि सीएएसंदर्भात मलेशियानं भारतावर कडाडून टीका केली आहे.

प्रत्युत्तर म्हणून भारताने मलेशियातून आयात होत असलेल्या पाम तेलावरच बंदी घातली. मलेशियाने भारताच्या या भूमिकेवर चिंता व्यक्त केली. मात्र आर्थिक नुकसान सोसावं लागलं तरी चालेल मात्र चुकीच्या गोष्टींविरुद्ध बोलत राहू या पवित्र्याचा मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी पुनरुच्चार केला.

भारत मोठ्या प्रमाणावर खाद्य तेल आयात करतो. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात भारताच्या व्यापाऱ्यांनी मलेशियाकडून रिफाइंड पाम तेलाची आयात कमी केली आहे. इंडोनेशियानंतर मलेशिया हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा पाम तेल उत्पादक आणि निर्यातदार देश आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पाम तेल

गेल्या काही दिवसात महातीर यांनी भारत आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांवर जोरदार टीका केली होती. जम्मू काश्मीर राज्याला असलेला विशेष दर्जा काढून घेण्यात आला तेव्हा महातीर मोहम्मद यांनी कठोर शब्दात टीका केली होती. भारताने काश्मीरवर हल्ला करुन स्वत:च्या ताब्यात ठेवलं आहे असं महातीर यांनी म्हटलं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पाम तेलाचे साठे

भारताने आयात रोखल्याने मलेशियाच्या पाम तेल रिफायनरीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. आम्ही याप्रश्नी लवकरच तोडगा काढू असं महातीर यांनी म्हटलं आहे.

"भारत हा आमच्या पाम तेलाचा मोठा ग्राहक आहे. मात्र काही चुकीचं घडत असेल तर आम्ही स्पष्टपणे ते मांडणं आवश्यक आहे. जे चूक आहे त्याला चूक म्हणू. आर्थिक फायद्याचा विचार करून चुकीच्या गोष्टी घडू दिल्या आणि काहीच बोललो नाही तर सगळंच चुकीच्या दिशेने जाऊ शकतं. मग आमच्याही हातून चुका घडू शकतात आणि बाकीच्यांनाही तसं वागणं भाग पाडेल", असं ते म्हणाले आहेत.

मलेशियाऐवजी इंडोनेशियाचा पर्याय

रॉयटर्सनुसार मार्च महिन्याकरता भारताचे पाम तेलाचे डिलिव्हरी कॉन्ट्र्ँक्ट 0.9 टक्क्यांवर आले आहे. मलेशियाकडून पाम तेलाची खरेदी करणं शक्यतो टाळा असा अनौपचारिक आदेश भारत सरकारने व्यापाऱ्यांना दिला होता. मलेशियाऐवजी भारताने आता इंडोनेशियाला प्राधान्य दिलं आहे.

भारताने आता इंडोनेशियाकडून प्रति टन 10 डॉलरहून अधिक दराने पाम तेलाची खरेदी केली आहे.

पाम तेलाची खरेदी कोणत्याही एका देशाशी जोडली जाऊ शकत नाही असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं. कोणत्याही देशाशी व्यवहार हा त्या देशाशी असलेल्या संबंधावर अवलंबून आहे. यावरुनच व्यापारी संबंधही पक्के होतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पाम तेल

2019 मध्ये मलेशियाच्या पाम तेलाचा भारत सगळ्यात मोठा ग्राहक आहे. गेल्या वर्षभरात भारताने मलेशियाकडून 40.4 लाख टन पाम तेल खरेदी केलं होतं. दोन्ही देशातले संबंध सुरळीत झाले नाहीत तर 2020 मध्ये मलेशियाकडून भारताला होणारी पाम तेलाची आयात 10 लाख टनांहून कमी होईल.

भारताच्या या पवित्र्याने मलेशियालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे असं मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. भारताशी व्यवहार घटणार असल्याने पाकिस्तान, फिलीपाईन्स, म्यानमार, व्हिएतनाम, इथिओपिया, सौदी अरेबिया, इजिप्त, अल्जीरिया, जॉर्डन यांना तेल विकून भरपाई करण्याचा मलेशियाचा प्रयत्न आहे.

मात्र प्रमुख ग्राहक बाजूला झाल्याने होणाऱ्या नुकसानीची भरपाई करणं अवघड आहे. चर्चा करुन भारताशी दुरावलेले संबंध सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे असा मलेशियाच्या ट्रेड युनियन काँग्रेसचा आग्रह आहे. यामध्ये पाम तेल क्षेत्रातील कामगारांचा समावेश आहे.

आमचा दोन्ही देशांच्या सरकारला आग्रह आहे की त्यांनी चर्चेच्या माध्यमातून याप्रश्नी मुत्सद्दीपणे मार्ग काढावा असं मलेशियाच्या ट्रेड युनियन काँग्रेसने म्हटलं आहे.

मलेशियात प्राथमिक उद्योग मंत्रालय परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं. पामतेलाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताशी चर्चा सुरु आहे असं उद्योग मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पाम तेलाची वाहतूक

महातीर मोहम्मद 1981 ते 2003 पर्यंत मलेशियाच्या पंतप्रधानपदी होते. 2018 मध्ये ते पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडून आले. ते निवडून आल्यानंतर मलेशिया आणि पाकिस्तान यांच्यात जवळीक वाढली आहे.

भारताशी व्यवहार कमी झाल्यानंतर त्याची भरपाई पाकिस्तानशी पाम तेलाचा व्यवहार करुन भरुन काढावी असा मलेशियाचा प्रयत्न आहे. पाकिस्तान आमच्या पाम तेलाचा नियमित ग्राहक आहे आणि या तेलासाठी ते आमच्यावर अवलंबून आहेत असं मलेशियाच्या उद्योग मंत्री टेरेसा कोक यांनी सांगितलं.

कोक यांनी पाकिस्तानचा दौराही केला. त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे व्यापारी, टेक्सटाईल, उत्पादन आणि गुंतवणूक सल्लागार अब्दुल रज्जाक दाऊद यांची भेट घेतली होती.

2018 मध्ये पाकिस्तानने 10.16 लाख टन पाम तेलाची आयात केली. हा व्यवहार 73 कोटी डॉलर्सचा होता. पाकिस्तानने आयात वाढवावी हा आमचा प्रयत्न आहे, असं मलेशियाच्या प्राथमिक उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पाम तेल

भारत आणि मलेशिया दरम्यानच्या ताणलेल्या संबंधासंदर्भात सिंगापूर इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्सचे राजकीय विश्लेषक डॉ. ओह ई सुन यांनी अरब न्यूजशी बोलताना सांगितलं की अशा पवित्र्यामुळे दोन्ही देशांदरम्यानचे संबंध बिघडतील. मलेशियाचे पंतप्रधान काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्याबाबत आणि एनआरसी आणि सीएएसंदर्भात बोलले आणि भारताने प्रत्युत्तर म्हणून पामतेल आयातीवर बंदी घातली.

मोदी सरकार वादग्रस्त इस्लामिक अभ्यासक झाकीर नाईक यांना भारतात आणू इच्छित आहे. मात्र ते आता मलेशियात नाहीत. महातीर यांनी झाकीर नाईक प्रकरणात कोणतीही मदत केलेली नाही. डॉ. ओह यांच्या मते भारत मलेशियाच्या पाम तेलाचा मोठा ग्राहक आहे, भारताने पाम तेलाची खरेदी कमी केली तर मलेशियाच्या पाम तेल उद्योगावर विपरीत परिणाम होऊ शकेल.

भारतात खाद्य तेलाचा वापर होणाऱ्या तेलापैकी पाम तेलाचा हिस्सा दोन तृतीयांश आहे. भारत दरवर्षी 90 लाख टन पाम तेल आयात करतो. ही आयात प्रामुख्याने मलेशिया आणि इंडोनेशिया यांच्याकडूनच होते.

मलेशिया-पाकिस्तान यांची जवळीक का?

साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ मलेशिया स्ट्रॅटेजिक स्टडीजचे तज्ज्ञ रविचंद्रन दक्षिणमूर्ती सांगतात, मलेशिया आणि पाकिस्तान यांचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून चांगले आहेत. 1957 मध्ये मलेशिया स्वतंत्र झाल्यानंतर या देशाला देश म्हणून मान्य केलं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा महातीर मोहम्मद यांनी इम्रान खान यांची भेट घेतली.

पाकिस्तान आणि मलेशिया या दोन्ही देशांमध्ये अनेक इस्लामिक संघटना आहेत आणि त्या एकमेकांना सहकार्य करतात. या दोन देशांच्या संबंधांमध्ये चीनचा मुद्दा सर्वस्वी वेगळा आहे. मलेशिया आणि चीनचे संबंध सर्वसाधारण आहेत. मात्र पाकिस्तान आणि चीनचे अतिशय चांगले आहेत. पाकिस्तानला सर्वाधिक आयुधांचा पुरवठा चीनकडून केला जातो. या दोन्ही देशांचे भारताशी चांगले संबंध नाहीत. जोपर्यंत महातीर सत्तेत आहेत तोपर्यंत मलेशियाचे पाकिस्तानशी संबंध चांगले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)