Iran Plane Crash: युक्रेनचं विमान पाडण्याच्या इराणच्या कृत्याचा खामेनींकडून बचाव

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
अयातुल्ला खामेनी यांनी दिला अमेरिकेला इशारा तर इराणच्या लष्कराची पाठराखण

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी युक्रेनचं प्रवासी विमान पाडल्याप्रकरणी आपल्या सैन्याची पाठराखण केली आहे.

8 जानेवारी रोजी जवळपास 180 प्रवासी असलेलं युक्रेनचं विमान कोसळलं होतं. हे विमान आपण चुकून पाडल्याची कबुली इराणने दिली होती. यात सर्वच्या सर्व 176 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचं बोईंग 737-800 विमान तेहरानहून युक्रेनची राजधानी किफला जाण्यासाठी निघालं होतं. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळलं. विमानात इराण, कॅनडा, स्वीडन आणि ब्रिटनचे नागरिक होते. ॉ

इराणने हे विमान पाडल्याच्या बातम्या आल्यानंतर परदेशामध्ये बरीच निदर्शनं झाली. त्यामुळे इराण सरकारवर दबाव वाढत होता.

मात्र, खामेनी यांनी शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर दिलेल्या भाषणात इराणच्या सैन्याचा बचाव करत त्यांच्यासाठी समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला. 2012 नंतर पहिल्यांदाच त्यांनी शुक्रवारच्या नमाज पठणाचं नेतृत्त्व केलं.

ते म्हणाले, "या अपघातानंतर आमच्या शत्रुंना तेवढाच आनंद झाला जेवढं आम्हाला दुःख झालं. रिवॉल्युशनरी गार्ड आणि आमच्या सैन्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यासाठी मुद्दा मिळाल्याने त्यांना आनंद झाला होता."

शत्रू म्हणजे त्यांचा इशारा अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांकडे होता.

Image copyright EPA

सुलेमानी यांच्या हत्येचा सूड

अमेरिकेने इराणचे सर्वोच्च लष्करी नेते कुड्स आर्मीचे प्रमुख असलेले जनरल कासीम सुलेमानी यांची इराकमधल्या बगदाद विमानतळाबाहेर ड्रोन हल्ला करत हत्या केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधला छुपा तणाव आता प्रकर्षाने समोर आला आहे.

या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणने इराकमधल्या दोन अमेरिकी सैन्य छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता.

या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर काही वेळातच युक्रेनचं प्रवासी विमान कोसळल्याची बातमी आली होती. सुरुवातीला या अपघातात आपला हात नसल्याची भूमिका इराणने घेतली होती.

मात्र, जागतिक स्तरावरून दबाव वाढल्यानंतर इराणच्या रिवॉल्युशनरी गार्डने कबुली दिली की त्यांनी क्रूझ मिसाईल समजून चुकून युक्रेनचं विमान पाडलं.

Image copyright AFP

खोमेनी काय म्हणाले?

इराणचे 80 वर्षीय सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी राजधानी तेहरानच्या मोसल्ला मिशिदीतून देशाला संबोधित केलं.

याआधी 2012 साली त्यांनी असं संबोधन केलं होतं. इराणच्या इस्लामिक क्रांतीला 33 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने तो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

वॉशिंग्टन इन्स्टिट्युट फॉर निअर ईस्ट पॉलिसीशी संबंधीत मेहदी खलजी यांचं म्हणणं आहे की शुक्रवारच्या नमाजचं नेतृत्व करणं विशेष आहे. इराणच्या नेतृत्वाला काही खास संदेश द्यायचा असेल, तेव्हाच असं संबोधन करण्यात येतं.

सामान्यपणे या नमाजचं नेतृत्व अयातुल्लाह यांचे निकटवर्तीय स्थानिक मौलाना करतात. प्रभावी वकृत्वशैलीसाठी ते ओळखले जातात.

यावेळी केलेल्या भाषणात खामेनी आणखी काय म्हणाले, पाहूया...

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'शैतान' सरकारवर टीका करत ते ट्रंप यांना 'खोडकर' म्हणाले.
  • आपण इराणी जनतेसोबत असल्याचं ट्रंप खोटं बोलले होते आणि अमेरिका आपल्यावर 'विषात बुडवलेल्या कट्यारीने' वार करेल, असंही ते म्हणाले.
  • ते पुढे म्हणाले, "इराकवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला अमेरिकेला लगावलेली चपराक आहे."
  • "कुड्स आर्मी एक कल्याणकारी संस्था आहे. या संस्थेचा मानवी मूल्यांमध्ये विश्वास आहे. अमेरिका तिला दहशतवादी संघटना मानतो," असंही ते म्हणाले.
  • जनरल सुलेमानी यांची अंत्ययात्रा आणि इराणच्या सैन्याने दिलेलं प्रत्युत्तर "इतिहास बदलणारं वळण आहे", असंही खामेनी म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)