पाकिस्तानमध्ये मैद्याचा तुटवडा, ‘नान’ मिळणं झालं कठीण

पाकिस्तान नान Image copyright Getty Images

पाकिस्तानातल्या काही प्रांतांमध्ये गव्हाच्या पिठाचा तुटवडा भासतोय. परिणामी इथल्या लोकांना 'नान' मिळणं मुश्किल झालंय.

मैदा उपलब्ध नसल्याने खैबर पख्तुख्वा भागातली नान तयार करणारी अनेक दुकानं बंद झाली आहेत. खैबर प्रांतासोबतच बलुचिस्तान, सिंध आणि पंजाब प्रांतातही मैद्याचा तुटवडा आहे.

पाकिस्तान सरकारने आता या समस्येची दखल घेतलीय. पण या भागांमध्ये गव्हाचा किंवा पिठाचा तुटवडा नसून हे संकट जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आल्याचं या प्रांतांच्या सरकारचं म्हणणं आहे.

पण प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यास लोकांना मैद्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय आणि अनेक प्रांतातल्या नान (एक प्रकारची रोटी) विक्रीवर याचा मोठा परिणाम झालाय.

खैबर पख्तुनख्वामध्ये पिठाची चणचण

खैबर पख्तुनख्वा भागामधली परिस्थिती सगळ्यात गंभीर आहे. नानचा व्यवसाय करणारे 'नानबाई' म्हणजेच नान भाजणारे व्यावसायिक गव्हाच्या पिठाच्या किंमती वाढल्याने संपाव गेले आहेत. यामुळे पोलिसांनी 4 नानबाईंना ताब्यातही घेतलं होतं.

याप्रकरणी सरकारशी बातचित झालेली असली तरी परिस्थिती सुधारताना दिसत नसल्याचं पत्रकार अझीजुल्लाह खान यांनी म्हटलंय.

पेशावर शहरातलीही नान विक्री करणारी अनेक दुकानं सध्या बंद आहेत. त्यामुळे आता बहुतेकांकडे भात खाण्यावाचून पर्याय नाही.

रोजच्या जेवणात लागणारे नान विकत घेण्याची पद्धत पेशावरसह अनेक प्रांतांमध्ये आहे. आणि म्हणूनच एकट्या पेशावरमध्ये नान तयार करणारी अडीच हजारांपेक्षा जास्त दुकानं आहेत.

महिन्याभरापूर्वीपर्यंत 85 किलो मैदा जवळपास चार हजार पाकिस्तानी रुपयांना मिळत होता. पण सध्याच्या घडीला याची किंमत वाढून पाच हजारांच्याही पलिकडे गेली असल्याचं खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या नानबाई असोसिएशन (बेकर्स असोसिएशन)चे अध्यक्ष हाजी मोहम्मद इक्बाल यांनी बीबीसीला सांगितलं.

पण फक्त पिठाच्या वा मैद्याच्या किंमती वाढलेल्या नाहीत. गॅसच्या किंमतींतही प्रचंड वाढ झालेली आहे. याचा नान आणि रोटीच्या किंमतीवर परिणाम होणार हे नक्की आहे, पण असं असूनही रोटी - नानच्या किंमती वाढवण्यात येऊ नयेत, यासाठी सरकारकडून दबाव टाकण्यात येतोय.

Image copyright Getty Images

170 ग्रॅम मैद्यापासून तयार करण्यात आलेल्या नानची किंमती पेशावरमध्ये 2013 साली दहा रुपये निश्चित करण्यात आली होती. आजवर यात भाववाढ झाली नसल्याचं हाजी इक्बाल सांगतात. दरम्यानच्या काळात मैद्याच्या किंमती अनेकदा वाढलेल्या आहेत.

150 ग्रॅम मैद्यापासून तयार करण्यात आलेल्या रोटीची किंमत वाढवून 15 रुपये करण्यात यावी अशी मागणी नानबाईंनी सरकारकडे केली आहे. पण ही रोटी 170 ग्रॅम पिठाची असायला हवी असं सरकारचं म्हणणं आहे.

पेशावरमध्ये नान एका ठराविक किंमतीला विकले जात नाहीत. बहुतेक विक्रेते 100 ग्रॅम वजनाचे नान विकतात तर काही जण यापेक्षा कमी वजनाचे विकतात.

ही समस्या जुनी असली तरी सरकारने यावर अजून कोणताही तोडगा काढलेला नाही.

पाकिस्तानी सरकारने महिनाभरापूर्वी अफगाणिस्तानला मैद्याची निर्यात केली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या प्रांतांत मैद्याचा तुटवडा निर्माण झाल्याचं हाजी मोहम्मद सांगतात.

पेशावरच्या रामपुरा गेटजवळ एक मोठा बाजार आहे. इथं मैद्याची पोती उपलब्ध आहेत. पण विकत घेणारं कोणीही नाही. ज्या पोत्याची किंमत महिनाभरापूर्वी साडे आठशे रुपये होती तेच मैद्याचं पोतं आज अकराशे रुपयांना विकलं जातंय. किंमती वाढल्याने मागणी कमी झालीय.

तर लवकरच पंजाब प्रांतातून खैबरला मैद्याचा पुरवठा करण्यात येणार असून लवकरच खैबर प्रांतातला तुटवडा कमी होईल आणि किंमती नियंत्रणात येतील असं प्रांतीय सरकारांनी म्हटलंय.

बलुचिस्तानातही झाली भाववाढ

इतर प्रदेशांपेक्षा बलुचिस्तानातल्या मैद्याच्या किंमती जास्त वाढलेल्या आहेत.

Image copyright Getty Images

मैद्याच्या किंमतींवरूनच गेल्या वर्षअखेरीस सरकारने खाद्य सचिव आणि खाद्य संचालकांना निलंबित केलं होतं. वेळीच गहू खरेदी करण्यात न आल्याने मैद्याच्या किंमती वाढल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

सरकार या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बलुचिस्तानचे प्रवक्ते लियाकत शाहवानी यांनी म्हटलंय.

सिंध प्रांतातही तुटवडा

सिंध प्रांताची राजधानी असणाऱ्या कराचीमधल्या रहिवाशांनाही मैद्याच्या वाढलेल्या किंमतींचा सामना करावा लागत असल्याचं पत्रकार रियाद सोहेल सांगतात.

सध्याच्या घडीला थरची राजधानी मुथीमध्ये मैदा 55 रुपये किलोने विकला जातोय. तर नंगरहारसह सीमेलगतच्या इतर गावांमध्ये याची किंमत 70 ते 80 रुपये किलो आहे.

गेली अनेक वर्षं थरच्या वाळवंटामध्ये दुष्काळ आहे. कुपोषणामुळे महिला आणि लहान मुलांचे इथे मृत्यू झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

पण गेल्या वर्षी पाऊस पडल्यानंतर इथे बाजरीचं पीक झालं होतं. पण त्यावर पडलेला रोग, नंतर पडलेला पाऊस आणि वेगाने वाहणारे वारे याचा परिणाम या पिकांवर झाला.

सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत म्हणून पंजाब सरकारने खैबर पख्तुनख्वा प्रांताकडे रोज 5,000 टन मैदा पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)