कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?

कोरोना

चीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग आता जगभरातल्या 166 देशांमध्ये पोहोचला आहे आत्तापर्यंत . जगभरात सुमारे 2 लाख 7 हजार लोकांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून मृतांचा आकडा 8,657 वर पोहोचला आहे.

भारतात 30 जानेवारी रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत 151 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

चीननंतर या व्हायरसचे सगळ्यात जास्त बळी इटली, इराण, स्पेन आणि दक्षिण कोरियामध्ये आढळले आहेत.

कोरोना विषाणू आहे काय?

रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं.

कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे.

या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं. कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळलं आहे.

सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. 2002 साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता.

कोरोनाची लक्षणे

  • डोकेदुखी
  • नाक गळणे
  • खोकला
  • घसा खवखवणे
  • ताप
  • अस्वस्थ वाटणे
  • शिंका येणे, धाप लागणे
  • थकवा जाणवणे
  • न्युमोनिया, फुप्फुसात सूज

हा विषाणू अजूनही नियंत्रणात आणता येईल, असं यापूर्वी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटलं होतं.

कोरोना विषाणू किती गंभीर आहे?

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणं दिसतात. मात्र, लागण गंभीर असेल तर मृत्यूही ओढावू शकतो.

युनिवर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये प्राध्यापक असलेले मार्क वूलहाऊस म्हणतात, "हा नवीन कोरोना विषाणू आम्हाला आढळला तेव्हा आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्याचा परिणाम इतका घातक का आहे. सर्दीची सामान्य लक्षणं यात दिसत नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे."

कोरोना विषाणू आला कुठून?

हा विषाणुचा नवीन प्रकार आहे. हे प्राण्यांच्या एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात आणि त्यानंतर मानवालाही संसर्ग होतो. या संक्रमणावस्थेच्या काळात त्याचा शोध लागत नाही.

नॉटिंगम युनिवर्सिटीत वायरोलॉजीचे प्राध्यापक असलेले जोनाथ बॉल यांच्या मते, "हा अगदी नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आहे. या विषाणूची लागण प्राण्यांमधूनच माणसाला झाली असावी, अशी दाट शक्यता आहे."

सार्स हा विषाणू मांजरातून माणसांत आला होता. मात्र, या विषाणूचा मूळ स्रोत कोणता आहे, याची अधिकृत माहिती चीनने अजून दिलेली नाही.

Image copyright Kevin Frayer

चीनच का?

प्रा. वूलहाऊस यांच्या मते लोकसंख्येचं प्रमाण आणि त्याची घनता यामुळे चीममधले लोक लगेच प्राण्यांच्या संपर्कात येतात.

ते म्हणतात, "येणाऱ्या काळात चीनमध्येच पुन्हा असं काही ऐकायला मिळालं, तर त्यात आश्चर्य वाटणार नाही."

कोरोना विषाणूचा फैलाव सहज होतो का?

या विषाणुची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला झाल्याची अनेक उदाहरणं समोर आल्याचं चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

कोरोना विषाणुग्रस्त रुग्णांची देखभाल करणाऱ्या अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही या विषाणुची लक्षणं दिसली आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

या विषाणुविषयी चिंता वाटण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे या विषाणुमुळे सर्वांत आधी फुफ्फुसांवर परिणाम होतो. या विषाणुची लागण होताच व्यक्तीला खोकला सुरू होतो.

मात्र, सध्या जी आकडेवारी मिळते आहे तीच अंतिम असेल, असं आताच म्हणता येणार नाही.

विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे का?

या विषाणूचा परिणाम मर्यादित असेल, असं सुरुवातीला वाटलं होतं. मात्र, डिसेंबर नंतर अनेक प्रकरणं पुढे आली.

या संसर्गाची सुरुवात चीनमधल्या वुहान शहरातून झाली. मात्र, आता या विषाणुचा फैलाव चीनमध्यल्या इतर शहरात आणि चीनबाहेरही झालेला आहे.

थायलंड, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियातही कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. वुहान शहरातून आलेले लोक कोरोनाग्रस्त असण्याची शक्यता जास्त आहे.

कोरोनाची लागण झालेल्या सर्वच लोकांची ओळख पटली आहे, असं गरजेचं नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Image copyright EPA

नवीन वर्षांत चीन फिरायला गेलेल्या अनेक पर्यटकांच्या माध्यमातून या विषाणूचा फैलाव चीनबाहेरील अनेक देशांमधल्या लाखो लोकांमध्ये झाला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

उपाययोजना

कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर स्वतंत्र खोलीत उपचार सुरू आहेत, जेणेकरून इतरांना याचा संसर्ग होऊ नये. प्रवाशांना ताप आहे का, हे तपासण्यासाठी प्रवासी ये-जा करतात अशा सर्व ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय स्वच्छता राखता यावी आणि संसर्ग टाळवा, यासाठी सी-फूड मार्केट काही काळ बंद करण्यात आले आहेत.

Image copyright Getty Images

या सर्व उपाययोजना केवळ चीनमध्ये करण्यात आल्या आहेत, असं नाही. चीनव्यतिरिक्त आशियातील इतर अनेक देश आणि अमेरिकेतही असेच खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.

तज्ज्ञ काय सांगतात?

डॉ. गोल्डिंग म्हणतात, "सध्या आमच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार परिस्थिती किती चिंताजनक आहे, हे सांगणं कठीण आहे."

"कोरोना विषाणूच्या स्रोताची माहिती मिळत नाही तोवर अडचणी कायम राहणार आहेत."

माणसाला संसर्ग करणाऱ्या आणि विशेषतः पहिल्यांदाच संसर्ग करणाऱ्या प्रत्येक विषाणुविषयी चिंता करायला हवी, असं प्रा. बॉल यांचं म्हणणं आहे.

कारण जेव्हा पहिल्यांदाच एखाद्या विषाणूचा फैलाव होतो तेव्हा तो कसा रोखायचा, त्यावर कोणते उपचार आहेत, हे सगळं जाणून घेण्यात बराच वेळ जात असतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)