Corona Virus: मास्क घातल्याने विषाणूचा संसर्ग रोखता येतो का?

मास्क घातल्याने विषाणुचा फैलाव रोखता येतो का? Image copyright Getty Images

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून n 95 masks उपयोगी ठरू शकतात का असा प्रश्न विचारला जात आहे. कुठल्याही विषाणूची साथ आली की हमखास दिसणारं चित्रं म्हणजे तोंडावर मास्क लावलेली माणसं.

विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जगातल्या अनेक देशांमध्ये लोक नाका-तोंडावर मास्क लावतात. चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. तिथेही लोकांनी तोंडावर मास्क बांधायला सुरुवात केली आहे.

n 95 masks हे वायू प्रदूषणापासून संरक्षण म्हणून वापरले जातात मात्र, हवेतून पसरणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी n 95 किंवा या सारखे मास्क खरंच उपयोगी पडतात का, याविषयी तज्ज्ञ साशंक आहेत.

मास्क वापरल्याने तोंडातून हातावाटे होणारं संक्रमण काही प्रमाणात टाळता येऊ शकतं, असं काही उदाहरणांवरून दिसतं.

सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरमध्ये असलेले सर्वजण जो सर्जिकल मास्क वापरतात त्याची सुरुवात अठराव्या शतकाच्या शेवटी-शेवटी झाली. मात्र, सामान्य लोकांनी सार्वजनिक ठिकाणी तो मास्क वापरायला सुरुवात केली ती 1919 सालापासून. त्यावर्षी स्पॅनिश फ्लूच्या साथीने जगभरात तब्बल 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता.

लंडनमधल्या सेंट जॉर्ज विद्यापीठातील डॉ. डेव्हिड कॅरिंग्टन बीबीसीशी बोलताना म्हणाले, "हवेतून पसरणाऱ्या विषाणू किंवा जिवाणूंचा फैलाव रोखण्यासाठी रुटीन सर्जरी मास्क फारसे प्रभावी ठरू शकत नाहीत." आणि बहुतांश विषाणू हवेतूनच संक्रमित होतात. रुटीन सर्जरी मास्क सैल असतात. त्यात हवा फिल्टर होण्याची यंत्रणा नसते आणि हे मास्क घातल्यावरही डोळे उघडेच राहतात.

मात्र, असे मास्क शिंकताना किंवा खोकताना नाकातून किंवा तोंडातून उडणाऱ्या शिंतोड्याद्वारे विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका काही प्रमाणात कमी करतात. शिवाय Hand-to-Mouth संसर्गलाही काही अंशी आळा घालतात.

ऑस्ट्रेलियातल्या न्यू साउथ वेल्समध्ये एक अभ्यास करण्यात आला होता. यात असं आढळलं की सामान्यपणे कुठलीही व्यक्ती एका तासात 23 वेळा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करते.

नॉटिंघम विद्यापीठीत मॉलिक्युलर व्हायरोलॉजीचे प्राध्यापक असलेले जोनाथन बॉल यांनी बीबीसीला सांगितलं, "हॉस्पिटल सेटिंगमध्ये (हॉस्पिटलसदृश्य वातावरणात) करण्यात आलेल्या एका अभ्यासात सामान्य सर्जरी मास्क इन्फ्लुएन्जाचा संसर्ग रोखण्यात खास बनवण्यात आलेल्या रेस्पिरेटर इतकाच प्रभावी असल्याचं आढळलं."

मात्र, जेव्हा सामान्य जनतेमध्ये हा अभ्यास करण्यात आला तेव्हा त्याचे निष्कर्ष फारसे उत्साहवर्धक नव्हते. डॉ. बॉल सांगतात की असे मास्क खूप जास्त वेळ घालता येत नाही.

रेस्पिरेटर हे एक प्रकारचं यंत्र किंवा मास्क असतो. यात खास एअर फिल्टर असतात. या एअर फिल्टरच्या माध्यमातून बाहेरची अशुद्ध हवा शुद्ध केली जाते आणि अशी शुद्ध केलेली हवा श्वाच्छोश्वासाद्वारे आत घेतली जाते. मानवी शरीरासाठी घातक ठरू शकतील, अशा धुलीकणांपासून संरक्षण मिळवण्यासाठी म्हणून रेस्पिरेटरचा शोध लावण्यात आला होता.

Image copyright Getty Images

क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टमधील वेलकम-वुल्फसन इन्स्टीट्युट फॉर एक्सपेरिमेंटल मेडिसनचे डॉ. कॉनॉर बॅमफोर्ड सांगतात की अभ्यासात मास्कपेक्षा स्वच्छतेचे साधे सोपे उपाय अधिक परिणामकारक ठरले.

ते म्हणतात, "शिंकताना तोंडावर हात ठेवणे, नियमित हात धुणे आणि हात धुवूनच जेवणे यासारख्या साध्या सवयींमुळे श्वसनमार्गे लागण होऊ शकणाऱ्या विषाणूच्या फैलावावर जास्त प्रतिबंध लावता येऊ शकतो."

युकेमध्ये आरोग्य सेवा पुरवणाऱ्या NHS नुसार फ्लूसारख्या विषाणूची लागण रोखण्यासाठीचे सर्वोत्तम उपाय आहेत -

  • नियमित कोमट पाणी आणि साबणाने हात धुणे
  • शक्य तेवढं डोळे आणि नाकांना स्पर्श करणे टाळणे
  • सदृढ आणि फिट जीवनशैली अंगीकारणे

डॉ. जेक डनिंग इंग्लंडमधल्या पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेत नव्याने शोध लागणारे संसर्गजन्य आजार आणि प्राण्यांमधून माणसाला होणारे संसर्ग या विषयावर काम करतात. ते सांगतात, "विषाणुची लागण रोखण्यासाठी मास्क परिणामकारक असल्याचं मानलं जात असलं तरी हॉस्पिटलसदृश्य वातावरणाव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी असे मास्क वारपण्याने फार फायदा झाला, याचे पुरावे नगण्य आहेत."

ते सांगतात सामान्य मास्कचा परिणामकारक उपयोग करायचा असेल तर तो नीट घातला पाहिजे. तो नियमितपणे बदलत राहिला पाहिजे आणि वापरलेल्या मास्कची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे.

ते पुढे सांगतात, "अभ्यासात असं आढळून आलं आहे की जेव्हा लोक मास्कचा दीर्घकाळापासून उपयोग करत असतात तेव्हा मास्क घालताना ज्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी (वर उल्लेख केलेल्या) त्याचा सहसा विसर पडतो."

तर आपल्याला खरंच काळजी घ्यायची असेल तर मास्क घालण्यापेक्षा शारीरिक आणि हाताच्या स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगी बाळगायला हव्या, असं डॉ. डनिंग म्हणतात.

प्रतिमा मथळा BBC Indian Sportswoman of the Year

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)