Donald Trump Impeachment: महाभियोग प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?

डोनाल्ड ट्रंप Image copyright Getty Images

डोनाल्ड ट्रंप महाभियोग प्रकरणादरम्यान ट्रंप यांची सिनेटमध्ये बाजू मांडण्यास रिपब्लिकन पक्षातर्फे वकिलांची टीम सज्ज आहे.

शुक्रवारी डेमोक्रेटिक पक्षाने आपली बाजू मांडली. डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचं म्हटलं.

डेमोक्रेटिक सदस्यांनी केलेल्या आरोपांचं खंडन करण्यासाठी आता ट्रंप यांची टीम सज्ज आहे. ट्रंप यांच्या पक्षाने सात पानांचे पुरावे सादर केले आहेत. तर त्यांच्या विरोधात डेमोक्रेटिक पक्षाने 100 पानांचे पुरावे सादर केले आहेत.

बीबीसीचे उत्तर अमेरिका रिपोर्टर अॅंथनी झर्कर सांगतात की डोनाल्ड ट्रंप यांना वाचवण्यासाठी बचाव पक्ष हा डेमोक्रेटिक नेते जो बिडेन यांच्यावर निशाणा साधू शकतो. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद संपल्यानंतर सिनेटमध्ये मतमोजणी होईल. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत आहे. सिनेटच्या एकूण सदस्यांची संख्या 100 आहे त्यापैकी 53 सदस्य हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत. ट्रंप यांना पदच्युत करण्यासाठी त्यांच्याविरोधात दोन तृतीयांश म्हणजेच 66 सिनेटर्सनं मतदान करणं आवश्यक आहे.

सिनेटर्सनी सभागृहातच घेतल्या डुलक्या

अमेरिकेच्या सिनेट सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या महाभियोग खटल्याच्या सुनावणी दरम्यान चक्क झोपा काढल्या, गेम खेळले आणि इतर नियम मोडले असा आरोप करण्यात आला आहे.

लांबलचक सुनावणीदरम्यान डुलकी घेणऱ्या सदस्यांमध्ये जिम रिच आणि जिम इनहोफ यांचा समावेश आहे.

महाभियोगाची सुनावणी सुरू असताना सभागृहात शब्दकोडे, फिजेट स्पिनर्ससारखे गेम खेळण्यात आले, तसंच याठिकाणी एक कागदी विमानसुद्धा आढळून आलं आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप आपल्या पदाचा गैरवापर करत असून त्यामुळे अमेरिकेच्या लोकशाही मूल्यांना धोका असल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात येत आहे.

ट्रंप यांना पदच्युत करायचं की नाही याचा निर्णय हे सिनेटर्स घेणार आहेत. पण त्यांचं लक्ष सुनावणीकडे नव्हतं असं रॉयटर्सनं म्हटलं आहे.

अमेरिकन संसदेचं वरिष्ठ सभागृह (सिनेट) हे लोकशाहीच्या दृष्टीने एक पवित्र ठिकाण मानलं जातं पण इथल्या सदस्यांनी महाभियोग सुनावणीदरम्यान एखाद्या खोडकर शाळकरी मुलासारखं वर्तन केल्याचा आरोप अमेरिकेतल्या माध्यमांनी केला आहे.

सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधक डेमोक्रेटीक पक्ष या दोन्ही पक्षातील लोक या गोष्टी करण्यात मागे नव्हते.

नियमानुसार महाभियोगाची सुनावणी होईपर्यंत सदस्यांनी आपल्या जागेवर बसून राहणं अपेक्षित होतं.

पण गुरुवारी तब्बल 9 डेमोक्रेटीक आणि 22 रिपब्लिकन सदस्यांनी आपल्या जागेवरून अनेकवेळा उठले, असं वृत्त रॉयटर्स न्यूज एजन्सीने दिलं आहे.

Image copyright Getty Images

यामध्ये डेमोक्रेटीक पक्षातील बर्नी सँडर्स, अमी क्लोबुचर आणि मायकल बेनेट यांसारख्या दिग्गज नेत्यांचाही समावेश असल्याचं रॉयटर्सने सांगितलं आहे.

टेनिसी रिपब्लिकन पार्टीच्या सदस्या मार्शा ब्लॅकबर्न या गुरुवारी सभागृहात पुस्तक वाचताना आढळून आल्या होत्या.

त्यांनी ट्वीट करून आपली बाजू स्पष्ट केली आहे.

त्या म्हणाल्या, "ट्रंप यांचा द्वेष करणारे अमेरिका कशा प्रकारे तोडत आहेत, हे आजच्या प्रकारातून दिसून आलं आहे."

"मल्टी टास्कींग करणारी लोकच सर्वोत्तम असतात," असंही त्या म्हणाल्या.

सिनेटच्या आंतरराष्ट्रीय संबंध समितीचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे सदस्य रिच हे सुनावणीदरम्यान निर्विकारपणे डुलकी घेताना दिसून आले होते.

इदाहो मतदारसंघातून सदस्य असलेल्या रिच यांच्या प्रवक्ताने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. "रिच डुलकी घेत नव्हते तर ते डोळे बंद करून शांतपणे सुनावणी ऐकत होते," असं त्यांनी सांगितलं.

ओकलाहोमाचे रिपब्लिकन सदस्य इनहोफ यांनाही बुधवारी किंचित झोप लागली होती. त्यांना इंडियानाचे रिपब्लिकन सदस्य टॉड यंग यांनी कोपर मारून शुद्धीवर आणलं, असं एनबीसीच्या वार्ताहराने पाहिलं.

व्हर्जिनियाचे मार्क वॉर्नर हे सुमारे 20 मिनिटं आपल्या उजव्या हातावर डोकं ठेवून डोळे झाकून शांतपणे बसलेले होते.

Image copyright Getty Images

गुरूवारी नॉर्थ कॅरोलिनाचे रिचर्ड बर यांनी आपल्या फिजेट स्पिनर हे मुलांसाठीचं खेळणं दिल्याचंही आढळून आलं.

साधारणपणे सिनेट सभागृहातील इतर सत्रांना मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबलेट यांसारखी उपकरणे नेण्यास परवानगी असते, पण महाभियोगाच्या सुनावणीदरम्यान सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सभागृहात बंदी घालण्यात आली होती.

नेमकं यामुळेच अनेकांना कंटाळवाणं वाटू लागलं होतं.

वर्मोंटचे सदस्य पॅट लॅथी यांनी आपला मोबाईल परत मिळाल्यानंतर चक्क सुटकेचा निःश्वास सोडला.

तर काही सदस्यांनी स्मार्ट घड्याळांचा वॉचचा वापर करून सभागृहातल्या कडक नियम असूनही आपलं जगणं सुसह्य करून घेतलं.

'शब्दकोडे सोडवलं'

केंटुकीचे रिपब्लिपक पक्षाचे सदस्य यांनी तर यापेक्षाही पुढची शक्कल लढवली. त्यांनी कागदांवर क्रॉसवर्ड पझल प्रकारचे कोडे खेळले. तसंच त्यांनी कागदी विमानसुद्धा बनवलं, असं वृत्त हाती आलं आहे.

2020 च्या निवडणुकीत डेमोक्रेटीक पक्षाचा संभाव्य चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅसॅच्युसेट्सच्या एलिझाबेथ वॉरेन यांना एबीसी न्यूजच्या वार्ताहराने कागदावर काहीतरी गेम खेळताना पाहिलं.

युक्तिवादादरम्यान कुणाशीही बोलण्यास बंदी असल्यामुळे सभागृहातील सिनेट सदस्यांना कैदेत असल्याचा अनुभव आला. त्यामुळेच त्यांची अस्वस्थता वाढली होती.

पण बुधवारी रिपब्लिकन पक्षाचे टीम स्कॉट णि बेन सासी हे काहीतरी कुजबूज करताना आढळून आले.

सभागृहात खाद्यपदार्थांवरही बंदी होती. पण अनेक सदस्य चुईंग गम आणि चॉकलेट चघळताना दिसून आले.

सुनावणीदरम्यान माध्यमांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. तरीसुद्धा काही कॅमेऱ्यांनी सिनेट सदस्यांच्या हालचाली टिपल्या.

दरम्यान काही सिनेट सदस्य गंभीरपणे सुनावणीकडे लक्ष देताना दिसून आले. काही जण त्यातून काही नोंदी घेत होते.

महाभियोग चालवण्यात आलेले ट्रंप हे अमेरिकेचे आजवरचे केवळ तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत. पण सध्याच्या सभागृहात त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या सहकाऱ्यांचं वर्चस्व आहे.

गुरुवारी डेमोक्रेटीक पक्षाने केलेल्या युक्तिवादात नवीन काहीच नसल्याचं रिपब्लिकन पक्षाचं म्हणणं होतं. ट्रंप यांच्यावर विश्वास असल्याचं ते सांगतात.

महाभियोगाच्या माध्यमातून ट्रंप यांना पदावरून हटवण्यासाठी सभागृहात दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे.

प्रतिमा मथळा BBC Indian Sportswoman of the Year

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)