कोरोना व्हायरस: वुहानमध्ये अडकलेले भारतीय सांगतायत...

कोरोना Image copyright Getty Images

चीनमध्ये सध्या ल्युनर नवीन वर्षाचा उत्सव सुरू झाला आहे. मात्र या विषाणुमुळे अनेक ठिकाणी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

चीनमधल्या खुबे प्रांतातल्या वुहान शहरातून कोरोना विषाणुची साथ सुरू झाल्याचं सांगितलं जातं. याच वुहान शहरात सहा दिवसांत एक नवीन रुग्णालय उभारण्यांचं कामही सुरू आहे.

या शहरासह खुबे प्रांतातल्या अनेक भागात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं तर 1,287 लोकांना याची लागण झाल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

हा विषाणू युरोपपर्यंत पसरल्याची भीती व्यक्त होते आहे. फ्रांसमध्ये कोरोना विषाणुग्रस्त तीन रुग्ण आढळल्याचं सांगितलं जात आहे.

चीनच्या खुबे प्रांतात प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 10 शहरातील जवळपास 2 कोटी जनतेला याचा फटका बसला आहे.

भारतात अजूनतरी या आजाराच्या रुग्णांची अधिकृत नोंद झालेली नाही. मात्र अनेक भारतीय वुहान शहरात राहतात. प्रवास करण्यावर बंदी घातल्याने त्यांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे.

बीबीसी प्रतिनिधी गगन सबरवाल यांनी वुहान प्रांतात राहणाऱ्या काही भारतीय विद्यार्थ्यांशी फोन आणि व्हीडियो लिंकद्वारे तिथल्या परिस्थितीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांमध्ये घबराट

गगन सबरवाल यांनी चाँगथेम पेपे बिफोजीत नावाच्या विद्यार्थ्याशीही बातचीत केली. ते गेल्या दोन वर्षांपासून वुहानमध्ये शिकत आहेत. वुहान युनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधून ते पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कोरोना विषाणूच्या उपद्रवामुळे वुहानमध्ये एक नवं रुग्णालय बांधण्यात येत आहे.

ते सांगतात की गेल्या आठवड्यापर्यंत परिस्थिती पूर्णपणे स्थिर होती. मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून फार वेगाने गोष्टी बदलत आहेत. परदेशातून येऊन शिकत असल्यामुळे आपल्याला खूप काळजी वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

आजवर अशी परिस्थिती आपण बघितली नसल्याचं म्हणत विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासन उत्तम काम करत असल्याचं आणि सर्वांनाच आरोग्य आणि उपचारासंबंधी माहिती देऊन मदत करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

त्यांच्या विद्यापीठात रोज विद्यार्थ्यांचा ताप मोजला जातो. तसंच विद्यापीठातून विद्यार्थ्यांना मोफत मास्क वाटण्यात येत आहेत.

Image copyright Getty Images

गरज पडल्यास विद्यापीठाचं स्वःतचं रुग्णालय आणि रुग्णवाहिकाही आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

'दर तासाला हात धुवा'

विद्यार्थ्यांनी दर तासाला हात धुवावे आणि बाहेरचं खाऊ नये, अशा सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आल्या आहेत. तसंच खोलीतून बाहेर पडताना मास्क घालण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

बिफोजीत यांनी सांगितलं की बाजार आणि रस्त्यांवर शुकशुकाट आहे. मात्र हे चीनी नवीन वर्षामुळे आहे की कोरोना विषाणूच्या साथीमुळे हे त्यांना कळत नाहीय.

सबवे, मेट्रो बंद आहेत. ट्रेन आणि फ्लाईटही रद्द करण्यात आल्या आहेत.

सर्वच विद्यार्थी आपापल्या खोल्यांमध्ये आहेत. ते केवळ एकमेकांच्या खोलीतच जात आहेत. बाहेर पडत नाहीत.

त्यांनी सांगितलं की सगळे बरे आहेत. मात्र, सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गरजेच्या सर्व वस्तू उपलब्ध करून दिल्या जात असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

प्रतिमा मथळा सौरभ शर्मा वुहानमध्ये पी.एचडी करत आहेत.

बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेणारे

वुहानमध्ये शिक्षण घेणारे आणखी एक विद्यार्थी आहेत सौरभ शर्मा. सौरभ 17 जानेवारीला वुहानमध्ये दाखल झाले. त्याचदरम्यान या विषाणुविषयी माहिती मिळाली होती.

गेल्या अडीच वर्षांपासून चीनमध्ये असलेले सौरभ वुहानमध्ये पीएचडी करत आहेत.

वुहानमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याचं ते सांगतात. यापैकी बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. स्वतः सौरभ वुहान युनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकत आहेत.

सगळीकडे लोक मास्क घालून फिरत असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यापीठानेही विद्यार्थ्यांना बाहेर न पडण्याचे आणि शक्य तितका वेळ मास्क घालून ठेवण्याचे आदेश दिल्याचं ते म्हणतात.

हॉस्टेलबाहेर पडताना प्रत्येक विद्यार्थ्याने आपण कुठे जातोय, हे हॉस्टेलच्या रिसेप्शनवर सांगून जाणं बंधनकारक आहे.

कोरोना विषाणूविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कँटिनने मांसाहारी पदार्थ बनवणं बंद केलं आहे. आपल्या इतर मित्रांनाही शक्यतो हॉस्टेलच्या खोलीबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

चीनमध्ये ल्युनर नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान बाहेर खाण्या-पिण्याच्या वस्तूंची दुकानं सहसा बंद असतात. त्यामुळे सगळेच आपापल्या घरी, हॉस्टेलमध्ये खाद्यपदार्थांचा साठा करून ठेवतात.

योगायोगाने सर्वच विद्यार्थ्यांनी हा साठा करून ठेवला असल्याने त्यांच्या जेवणाची आबाळ होत नसल्यायचं सौरभ यांनी सांगितलं.

भारतीय दूतावासही संपर्कात

देवेश मिश्रा शिक्षणासाठी गेल्या चार वर्षांपासून वुहान शहरात आहेत. कोरोना विषाणूच्या साथीमुळे शहर ओसाड पडल्याचं ते सांगतात.

प्रतिमा मथळा देवेश मिश्रा गेली चार वर्षे वुहानमध्ये शिक्षण घेत आहेत.

"गेल्या 2-3 दिवसांपासून तिथे पाऊस पडतोय. अगदी मोजकी दुकानं उघडी आहेत. दरवर्षी दिसणारा चीनी नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह या वर्षी दिसत नाहीये," असं ते म्हणाले.

हे फारच खिन्न करणारं दृश्य आहे आणि अनेकजण वुहान सोडून गेल्याचं देबेश मिश्रा यांनी सांगितलं.

त्यांच्याप्रमाणेच इतर भारतीय विद्यार्थ्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे कुणीही बाहेर पडत नाहीय. प्रत्येकजण दर तासाला हात धुतो. नियमित सॅनिटायजरचा वापर करतो.

देबेश मिश्रा यांच्या विद्यापीठानेही विद्यार्थ्यांना सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचे आणि सतत मास्क घालण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिमा मथळा दिदेश्वर वुहान युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीमध्ये शिक्षण घेत आहेत.

भारतात असलेले त्यांचे कुटुंबीय काळजीत आहेत आणि आपल्याला भारतात जाण्याची परवानगी कधी मिळेल, याची कसलीच माहिती देबेश मिश्रा यांना नाही.

जवळपास संपूर्ण वुहान शहरात लॉकडाऊनसदृश परिस्थिती आहे. भारतीय दूतावासही आपल्या विद्यार्थ्यांना शहरातून बाहेर कसं काढता येईल, यासाठी प्रयत्न करत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून हे सर्व विद्यार्थी आपापल्या खोल्यांमध्येच आहेत. व्हॉट्सअॅप आणि इतर ऑनलाईन माध्यमातून कोरोना विषाणुविषयीच्या बातम्या बघत आहेत.

बरेच जण काल भारतात जाण्यासाठी निघणार होते. मात्र त्यांची फ्लाईट रद्द करण्यात आली. अनिश्चिततेच्या वातावरणामुळे सगळ्यांनाच काळजी लागून आहे.

चीनी प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव

चेन्नईच्या मोनिका सेतूरमण यादेखील वुहानमध्ये शिक्षण घेत आहेत. वुहानमध्ये 500 भारतीय विद्यार्थी आहे आणि सध्या यापैकी 173 विद्यार्थी शहरात असल्याचं त्यांनी सांगितलं. हे सर्व विद्यार्थी आपापल्या खोल्या किंवा डॉरमेट्रीमध्ये बंद आहेत.

या विषाणुमुळे एकप्रकारचा विनाश ओढावला आहे आणि चीनच्या ल्युनर नवीन वर्षाच्या उत्सवकाळात असं घडणं खेदाची बाब असल्याचं सेतूरमण यांचं म्हणणं आहे.

हा लॉकडाऊन प्राणघातक विषाणुचा सामना करण्यासाठी गरजेचा आहे आणि त्यांच्या विद्यापीठाने आणि चीनी प्रशासनाने योजलेले खबरदारीचे उपाय कौतुकास्पद असल्याचं त्या म्हणतात. आपल्याला मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटाईजर देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चीनमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांसाठी सहा दिवसांत हॉस्पिटल उभारण्याची मोहीम सुरू आहे.

त्यांनी दोन आठवडे पुरेल, इतका खाद्यसाठा करून ठेवला आहे. लवकरच परिस्थिती निवळेल, अशी आशा मोनिक सेतुरमण यांनी व्यक्त केली आहे.

173 विद्यार्थी आपापल्या हॉस्टेलमध्ये आहेत आणि कुटुंबीय तसंच भारतीय दुतावासाच्या संपर्कात असल्याची माहितीही मोनिका यांनी दिली. आपण सर्वांचे आभार मानतो तसंच सर्वांनीच वुहानसाठी प्रार्थना करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

दीदेश्वर मयूम मणिपुरी आहेत. तेसुद्धा वुहान युनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकतात.

आपल्यालाही हॉस्टेलमध्येच थांबण्याचे आणि मास्क घालण्याचे आदेश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

"उत्सवाच्या काळात असं उदास वातावरण खेदजनक आहे आणि हे सगळं कधीपर्यंत असंच राहील, हे सांगता येत नाही." मात्र आपापल्या खोल्या किंवा डोरमेट्रीमध्ये राहण्याने साथीवर नियंत्रण मिळवण्यात मदत होईल, अशी आशा त्यांना आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)