कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?

कोरोना व्हायरस Image copyright Getty Images

चीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग आता जगभरातल्या 203 देशा-प्रांतांमध्ये पोहोचला आहे. तर जगभरात सुमारे 7 लाख लोकांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून मृतांचा आकडा 33 हजारपेक्षा जास्त झाला आहे.

भारतातही 30 जानेवारी रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत 1200 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 32 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

पण हा कोरोना व्हायरस शरीरावर नेमकं कसं आक्रमण करतो? संक्रमणानंतर शरीरात कोणत्या प्रकारची लक्षणं पाहायला मिळतात?

कोरोना व्हायरसमुळे गंभीर आजारी पडण्याची किंवा मृत्यू होण्याची शक्यता किती आहे? यावर काय उपाय आहे?

चीनमधल्या वुहान शहरातील जिन्यितान हॉस्पिटलमधील कार्यरत डॉक्टरांनी या प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या 99 रुग्णांवर उपचार केल्यानंतरचा सविस्तर वृतान्त लॅन्सेट या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

वुहानमधील जिन्यितान हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 99 रुग्णांना आणण्यात आलं. त्यांच्यात न्यूमोनियाची लक्षणं दिसत होती. या रुग्णांना फुप्फुसात त्रास जाणवत होता. फुप्फुसातून ऑक्सिजन रक्तात सामील होतो. तिथे पाणी जमा झालं होतं.

अन्य लक्षणं

  • 82 जणांना ताप आला होता
  • 81 जणांना खोकला झाला होता
  • 31 लोकांना श्वास घेताना त्रास जाणवत होता.
  • 11 लोकांना स्नायूपेशींना त्रास होत होता
  • 9 जणांना भास होत होता
  • 8 जणांना डोकेदुखीचा त्रास जाणवत होता
  • 5 लोकांना गळ्यात फोड आले होते

मृत्यू होण्याची सुरुवातीची घटना

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे जे दोन रुग्ण सर्वांत आधी दगावले, ते अगदी निरोगी दिसत होते. त्यांना प्रदीर्घ काळापासून सिगारेटचं व्यसन होतं. या कारणामुळे त्यांची फुप्फुसं कमकुवत झाली असावीत.

61 वर्षीय रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, त्यांच्यात न्यूमोनियाची लक्षणं दिसत होती.

त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. माणसाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा त्यांच्या शरीरात होऊ शकला नाही.

Image copyright REUTERS

या व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. तरीही त्या व्यक्तीचं फुप्फुस बंद पडलं. त्यानंतर थोड्या वेळात त्या व्यक्तीचं हृदय काम करणंही थांबलं.

दुसऱ्या रुग्णाचं वय 69 होतं. त्या माणसालाही श्वास घ्यायला त्रास होत होता. कृत्रिम पद्धतीने त्याला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला.

त्या माणसाचा रक्तदाब कमी झालेला असताना न्यूमोनियाने त्याचं आयुष्य संपलं.

किरकोळ वाटणाऱ्या लक्षणांमुळे लोक स्वत:ला रुग्णालयात भरती करून घेत नसावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मार्केट स्टाफ

वुहानच्या हुआनान सीफूड मार्केटमध्ये मिळणारा समुद्री जीव कोरोना या व्हायरसमुळे हे सगळं होत असल्याचं स्पष्ट होत आहे.

वुहानमध्ये जिन्तियान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या 99 लोकांपैकी 49 जण सीफूड मार्केटशी संलग्न आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चीनमधील हॉस्पिटल

47 माणसं हुआनान सीफूड मार्केटमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते किंवा तिथे दुकान चालवत होते. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या दोनच व्यक्ती अशा होत्या ज्या ग्राहक होत्या.

लागण झालेल्यांमध्ये वयस्करांचं प्रमाण अधिक

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 99 रुग्णांपैकी बहुतांश वयस्कर होते - यापैकी एकूण 67 पुरुष होते तर सरासरी वय 56 वर्ष होतं.

ताज्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरसची लागण झालेल्या स्त्रीपुरुषांमध्ये फारसं अंतर नाही.

सहा पुरुषांच्या तुलनेत पाच महिला, असं हे प्रमाण असल्याचं चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचं म्हणणं आहे.

Image copyright kevin frayer
प्रतिमा मथळा कोरोनामुळे उद्धभवलेली परिस्थिती

कोरोना संक्रमणामुळे पुरुष गंभीररीत्या आजारी पडू शकतात. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागू शकतं.

सामाजिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे पुरुषांना या व्हायरसची लागण होण्याची शक्यता अधिक आहे.

जिन्तियान हॉस्पिटलचे डॉक्टर ली झांग म्हणतात, "महिलांमध्ये कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता कमी आहे. महिलांमधील एक्स क्रोमोजोम आणि सेक्स हॉर्मोनमुळे प्रतिरोधक क्षमता चांगल्या दर्जाची असते."

जी माणसं आधीपासून आजारी होती

99 लोकांपैकी बहुतांशांना आधी कोणता ना कोणता आजार होता. त्यामुळे त्यांना कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता वाढली. रोग प्रतिकारकक्षमता कमकुवत असल्याने, असं झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

40 रुग्णांचं हृदय कमकुवत होतं किंवा त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये काही आजार होता. काहींना याआधीच हृदयविकाराचा झटका आला होता. 12 लोकांना मधुमेहाचा आजार होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

महत्त्वाच्या बातम्या