Bushfire Bash: सचिन तेंडुलकर विरुद्ध एलिस पेरी कशी झाली ओव्हर?

सचिन तेंडूलकर

फोटो स्रोत, @twitter ICC

ऑस्ट्रेलियाची खेळाडू एलिस पेरी हिने सचिन तेंडुलकरला एक ओव्हर खेळून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान सचिनने स्वीकारलं.

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट टीम विरुद्ध सचिन तेंडुलकर अशी ही ओव्हर झाली. सचिनच्या खांद्याला दुखापत झालेली असल्यामुळे सचिनने लाँग शॉट्स खेळले नाहीत.

अॅडम गिलख्रिस्ट 11 विरुद्ध रिकी पाँटिंग 11 चा सामना सुरू असताना इनिंग ब्रेकमध्ये सचिन विरुद्ध पेरी हा सामना रंगला.

ऑस्ट्रेलियन महिला टीमचा सामना करण्यासाठी सचिन एकटाच मैदानात उतरला होता. प्रेक्षकांच्या आणि प्रसारमाध्यमांचं लक्ष या ओव्हरकडे लागलेलं होतं. या ओव्हरमध्ये सचिनने एक चौकार मारला. तेव्हा प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

स्वप्न प्रत्यक्षात साकारल्यावर काय होतं असं म्हणत आयसीसीने हा चौकाराचा क्षण ट्वीट केला आहे.

एलिस पेरीचं आव्हान सचिनने स्वीकारलं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

एलिस पेरी आणि सचिन तेंडुलकर

"सचिन, तू वणवा पीडितांसाठी होणाऱ्या बुशफायर बॅश सामन्यात सहभागी होतोय, याचा आनंद वाटतोय. तू एका संघाला मार्गदर्शन करणार आहे, हे मला माहिती आहे."

"पण, ब्रेकमध्ये तू माझ्या एका ओव्हरचा सामना करावा, अशी माझी इच्छा आहे," असं एलिसनं व्हीडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे.

आपल्या ट्वीटद्वारे त्यानं म्हटलंय, "एलिस, मला प्रत्यक्षात मैदानावर येऊन खेळायला आवडेल. माझ्या खांद्याच्या दुखण्यामुळे डॉक्टरांनी मला खेळण्यास मनाई केली आहे. तरीही मी मैदानात उतरेन. मला आशा आहे की, या चांगल्या कामातून बुशफायर पीडितांसाठी चांगली रक्कम जमा करता येईल आणि तुला मला बादही करता येईल."

'बुशफायर बॅश'

ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये काही दिवसांपूर्वी भीषण वणवे लागले होते. या वणव्यामुळे ऑस्ट्रेलियातील जंगलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे ग्रामीण तसंच शहरी भागात गंभीर पडसाद दिसून आले. वणवाग्रस्तांसाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. वणवाग्रस्तांच्या नुकसानीचा दाह कमी करण्याच्या दृष्टीकोनातून क्रिकेट ऑस्ट्रेलियानेसुद्धा एक पाऊल उचललं आहे.

वणव्याचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक सामना आयोजित केला आहे. या सामन्याच्या माध्यमातून कमावलेली रक्कम ही वणवापीडितांच्या मदतीकरिता वापरली जाईल.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा

वणवा पीडितांच्या मदतीकरिता बुशफायर बॅश या नावाने हा सामना खेळवण्यात येईल. रिकी पाँटिंग इलेव्हन आणि अॅडम गिलख्रिस्ट इलेव्हन या दोन खेळाडूंच्या संघांमध्ये हा सामना होईल.

दोन्ही संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज या देशांतील दिग्गज खेळाडूंचा समावेश असेल.

क्रिकेट जगताचा मेरुमणी असणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मार्गदर्शनाखाली रिकी पॉन्टिंग, वासिम अक्रम आणि ब्रायन लारा हे दिग्गज खेळताना दिसणार आहेत. या महारथींविरोधात अॅडम गिलख्रिस्ट, कोर्टनी वॉल्श, शेन वॉटसन आणि युवराज सिंह उभे ठाकणार आहेत..

कधी होणार सामना?

वार - रविवार

दिनांक - 9 फेब्रुवारी 2020

वेळ - सकाळी 9 वाजून 45 मिनिटे (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

कसे असतील संघ?

फोटो स्रोत, CRICKET AUSTRALIA TWITTER

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)